शिंदे गटाचे नेते सचिन अहिर यांच्या निवासस्थानी 2.65 कोटींची चोरी; गुन्हे शाखेच्या तपासात नोकराची कबुली

सचिन अहिर यांच्या कुटुंबाशी संबंधित मुंबईतील निवासस्थानी झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या चोरीमुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (89)

Theft at Sachin Ahir’s residence : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या कुटुंबाशी संबंधित मुंबईतील निवासस्थानी झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या चोरीमुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे. घरातून तब्बल 2 कोटी 65 लाख रुपयांचा मौल्यवान ऐवज गायब झाल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली असून पोलिसांनी घरातील एका नोकराला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी एकाचवेळी न देता दीर्घ कालावधीत टप्प्याटप्प्याने करण्यात आली. घरातील काही मौल्यवान वस्तू कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी याबाबत पडताळणी केली. त्यावेळी घरातील सोन्या-चांदीचे दागिने, सोन्याची बिस्किटे, हिऱ्यांचे दागिने, चांदीची मौल्यवान भांडी आणि रोख रक्कम असा एकूण 2 कोटी 65 लाख रुपयांचा ऐवज गायब असल्याचे समोर आहे.

यानंतर सचिन अहिर यांनी मुंबई गुन्हे शाखेकडे अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत घरातील नोकर प्रवीण रमेश सोलंकी याला ताब्यात घेतले. सोलंकी हा गेल्या 24 वर्षांपासून अहिर कुटुंबाकडे काम करत होता. दीर्घकाळापासून विश्वासू कर्मचारी म्हणून काम करत असल्याने त्याच्यावर घरासह कार्यालयातील काही महत्वाच्या जबाबदाऱ्या देखील सोपवण्यात आल्या होत्या.

धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का? उपोषणानंतर सोनम वांगचुक स्पष्टच म्हणाले

तपासादरम्यान सोलंकी  याच्यावर संशय बळावला आणि चौकशीत त्याने चोरीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. चोरी केलेला माल विकून त्यातून मिळालेली रक्कम काही साथीदारांमध्ये वाटल्याचे देखील त्याने कबूल केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचा देखील तपास सुरू आहे.

सचिन अहिर यांचा मुलगा कृष्णा अहिर हे कुटुंबासह मुंबईतील वरळी सी फेज परिसरातील गुलरूख इमारतीत वास्तव्यास आहेत. प्रवीण सोलंकी हा तेथे साफसफाई आणि इतर कामे पाहत होता. घरातील मौल्यवान वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत, कुटुंबातील सदस्यांची ये-जा कधी असते आणि घरातील हालचालींची माहिती त्याला असल्याने त्यानेच संधी साधून चोरी केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेचे उपयुक्त राज टिळक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून चोरी केलेला माल आणि त्यातून मिळालेली रक्कम शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच चोरीच्या पैशांचा वापर कुठे करण्यात आला आणि त्याचा लाभ आणखी कोणाला झाला का, याचा देखील शोध घेतला जात आहे. एका वरिष्ठ राजकीय नेत्याच्या आणि विधान परिषदेच्या उपसभापतीसारख्या घटनात्मक पदावर असलेल्या लोकप्रतिनिधींच्या कुटुंबाशी संबंधित घरातच एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे, या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us