मुंबईतील जे. जे. महानगर रक्तपेढी आणि माया ब्लड सेंटरवर एफडीएची कारवाई, दोन्ही रक्तपेढ्यांचे कामकाज तात्काळ बंद

मुंबईतील सर जे. जे. महानगर रक्तपेढी आणि बदलापूर येथील माया ब्लड सेंटर यांना पुढील आदेशापर्यंत कामकाज बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design 49

Tukaram Mundhe’s stern warning to blood banks : रुग्णांच्या जीवाशी थेट संबंधित असलेल्या रक्तपेढ्यांमधील गंभीर अनियमितता उघड झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील सर जे. जे. महानगर रक्तपेढी आणि बदलापूर येथील माया ब्लड सेंटर यांना पुढील आदेशापर्यंत संपूर्ण कामकाज बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दोन्ही रक्तकेंद्रांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत एफडीए आणि केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या संयुक्त पथकाने दोन्ही रक्तपेढ्यांची सखोल तपासणी केली. तपासणीत औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम 1940 आणि औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम 1945 मधील अनेक तरतुदींचे गंभीर उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.

तपासणीमध्ये रक्त संकलन, रक्ताची साठवणूक, रक्तघटकांची निर्मिती, गुणवत्ता नियंत्रण, प्रयोगशाळा प्रक्रिया तसेच आवश्यक नोंदी ठेवण्यामध्ये गंभीर त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले. या अनियमिततेमुळे रक्त व रक्तघटकांच्या सुरक्षितता, गुणवत्ता आणि शुद्धतेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईमधील सर जे. जे. महानगर रक्तपेढीमध्ये रक्त व रक्तघटकांच्या साठवणूक व्यवस्थेतील त्रुटी, प्रतिक्रियाशील आणि कालबाह्य रक्तपिशव्यांच्या हाताळणीतील निष्काळजीपणा, जैवधोकादायक कचऱ्याच्या विल्हेवाटीतील कमतरता, गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीतील अपयश, नादुरुस्त उपकरणे आणि रक्तघटका निर्मिती विभागात आवश्यक निर्जंतुकीकरण नियंत्रणाचा अभाव आढळून आला.

तर बदलापूर येथील माया ब्लड सेंटरमध्ये रक्तदान शिबिरांतून संकलित रक्ताच्या वाहतुकीसंदर्भातील आवश्यक नोंदी उपलब्ध नसणे, रक्तपिशव्यांच्या शोधक्षमतेतील त्रुटी, रक्तसंक्रमण अधिकारी आणि आवश्यक तांत्रिक कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, उपकरणांचे कालबाह्य प्रमाणीकरण, गुणवत्ता नियंत्रण चाचण्यांचा अभाव, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनातील अनियमितता तसेच रक्तदान शिबिरांसाठी आवश्यक मंजुरी आणि अभिलेख नसल्याचे आढळले.

खासदार हेमंत सावरा यांच्या विकासकामांच रिपोर्ट कार्ड; कोट्यवधींचा निधी, तरी विकासाची गती संथ

संयुक्त तपासणी पथकाच्या अहवालानुसार या गंभीर त्रुटींमुळे रक्तदाता आणि रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच स्वैच्छिक रक्तदान आणि रक्त वितरणाच्या संपूर्ण पारदर्शक प्रक्रियेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या अनुज्ञप्ती प्राधिकाऱ्यांनी दोन्ही रक्तपेढ्यांना रक्तसंकलन, रक्तघटक निर्मिती, परीक्षण, साठवणूक, वितरण, विक्री, रक्तदान शिबिरांचे आयोजन तसेच रक्तपेढीशी संबंधित सर्व प्रकारचे कामकाज पुढील आदेशापर्यंत तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय संबंधित परवाण्यांबाबत पुढील कायदेशीर कारवाही देखील करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही स्पष्ट इशारा दिला आहे. ते म्हणाले, औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांप्रमाणेच रक्त ही जीवनरक्षक बाब आहे. त्यामुळे रक्ताच्या संकलन, प्रक्रिया आणि वितरणामध्ये सर्वोच्च दर्जाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि पारदर्शकता राखणे अत्यावश्यक आहे. रक्तदाता आणि रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणाला किंवा नियमभंगाला अन्न व औषध प्रशासन अजिबात सहन करणार नाही. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांनी कायद्याच्या तरतुदींचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर नियामक कारवाई करण्यात येईल. नागरिकांना सुरक्षित रक्त उपलब्द्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

दरम्यान, राज्यातील इतर रक्तपेढ्यांसाठीही ही कारवाई स्पष्ट इशारा मानली जात असून, पुढील काळात अशाच प्रकारच्या संयुक्त तपासण्या आणि नियमभंग करणाऱ्या रक्तपेढ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

follow us