चंद्रपूरमध्ये काँग्रेस खासदार आणि आमदारांमध्येच जुंपली; विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर संघर्ष शिगेला

पदांची मांडणी आणि गटनेतृत्वावरून सुरू असलेला हा संघर्ष आता नगरसेवकांना दोन वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवण्यापर्यंत गेला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (303)

vijay wadettiwar and mp pratibha dhanorkar : चंद्रपूरमध्ये काँग्रेस पक्षातील अंतर्गत सत्तासंघर्ष उघडपणे समोर आला असून आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचल्याचे चित्र आहे. नगरपालिकांपासून थेट महापालिकेपर्यंत तिकीट वाटप, पदांची मांडणी आणि गटनेतृत्वावरून सुरू असलेला हा संघर्ष आता नगरसेवकांना दोन वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवण्यापर्यंत गेला आहे.

नगरपालिका व महापालिका निवडणुकांच्या काळातच वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील मतभेद उफाळून आले होते. तिकीट वाटपावरून दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र संघर्ष झाला. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे आणि अपक्ष आमदार सुधाकर अडबाले यांना सोबत घेत, वडेट्टीवार गटाशी जवळीक असलेल्या काही नगरसेवकांची तिकीट कापल्याचा आरोप आहे.

घुग्घुस नगरपालिकेतील सत्तास्थापनेदरम्यान हा वाद अधिकच वाढला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला उपाध्यक्ष करण्याचा आग्रह धानोरकर यांनी धरला होता. मात्र स्थानिक काँग्रेस नेत्यांची भूमिका लक्षात घेत आमदार विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचाच उपाध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोन्ही नेत्यांमधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाला.

वडेट्टीवार गप्प बसेनात…. नागपूरमधील महापौरपदाच्या आरक्षणावरून थेट फडणवीस यांना घेरले

दरम्यान, चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे एकूण 27 नगरसेवक विजयी झाले आहेत. यामध्ये 12 नगरसेवक खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले जाते, तर 15 नगरसेवक आमदार विजय वडेट्टीवार गटात आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही गटातील नगरसेवकांना स्वतंत्रपणे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले असून महापौरपद आणि गटनेतेपद आपल्या मर्जीतील व्हावे यासाठी दोन्ही नेत्यांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मंगळवारी नागपुरात माध्यमांशी बोलताना आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर गंभीर आरोप केले. “विजयी मिरवणुकीदरम्यान काँग्रेसच्या नगरसेवकांना उचलून नेण्यात आले. अशा पद्धतीने पक्षाच्या नगरसेवकांना घेऊन जाणे योग्य नाही,” अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस पक्षातील हा उघड अंतर्गत संघर्ष आता जिल्हा पातळीवरून राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत असून, याचा परिणाम महापालिकेतील सत्तास्थापनेवर काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us