अष्टविनायकातील रांजणगाव महागणपती मंदिर तीन महिने बंद राहणार? विकासकामांसाठी मोठा प्रस्ताव चर्चेत

अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने हा निर्णय विचाराधीन आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 79

Will Maha Ganapati Temple remain closed for three months? : अष्टविनायकातील प्रसिद्ध रांजणगाव महागणपती येथील मंदिर तब्बल 3 महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेत आहे. अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने हा निर्णय विचाराधीन आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय आज होणाऱ्या देवस्थान ट्रस्टच्या महत्वपूर्ण बैठकीत घेतला जाणार आहे.

या प्रस्तावामागील प्रमुख कारण म्हणजे भाविकांची सुरक्षा आणि कामांची गती. मंदिर परिसरात गाभारा दुरुस्ती, आवारातील सुधारणा, दगडी फरसबंदी, तसेच नगारखान्याच्या बांधकामासारखी महत्वाची कामे केली जाणार आहेत. ही कामे सुरू असताना मंदिर खुले ठेवणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे पुरातत्व विभागाने मंदिर काही काळ पूर्णपणे बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. अंदाजे 3 महिन्यांच्या कालावधीत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

विशेष म्हणजे, या विकास आराखड्यामुळे भविष्यात भाविकांना अधिक सुरक्षित, सुटसुटीत आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. मंदिर परिसरात गर्दी व्यवस्थापन, स्वच्छता, वाहतूक सुलभता आणि मूलभूत सुविधा यामध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने हा निर्णय भाविकांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

दरम्यान, स्थानिक व्यापारी आणि भाविकांमध्ये या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीजण मंदिर बंद ठेवण्यास विरोध करत असून, यामुळे स्थानिक अर्थव्यावस्थेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे, अनेक भाविकांनी विकासकामांना प्राधान्य देत तात्पुरत्या असुविधा सहन करण्याची तयारी दर्शवली आहे. यासोबतच, पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिर येथे देखील पुनरुज्जीवन आणि सुरक्षा दृष्टीने काम सुरू असून, 9 एप्रिल ते 31 या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी ही अधिकृतरीत्या माहिती दिली आहे. दोन्ही तीर्थक्षेत्रांमध्ये सुरू असलेली कामे पाहता, राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांच्या विकासासाठी प्रशासन गांभीर्याने पावले उचलत असल्याचे दिसून येते. आगामी गणेशोत्सव आणि इतर सणांपूर्वी ही कामे पूर्ण करून भाविकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. एकूणच, काही काळासाठी मंदिर बंद राहणार असले तरी, भविष्यातील सुधारित आणि सुरक्षित दर्शनव्यवस्थेसाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

follow us