मोठी बातमी : पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर जाहीरपणे बोलणे वैशाली मानेंना नडलं ! आता बदली रद्द, नवी नियुक्तीही नाही
Vaishali Mane यांची वीस दिवसांपूर्वी गुन्हे अन्वेषण विभागाच्या (पुणे) पोलिस अधीक्षकपदावरून मिरा भाईंदरला बदली करण्यात आली होती. आता त्यांची बदली गृहविभागाने रद्द केली आहे.
Vaishali Mane transfer controversy :पोलिस खात्यातील बदल्यांबाबत गंभीर आरोप करणारे पोलिस अधिकारी वैशाली माने (Vaishali Mane) यांना नडलं आहे. त्यांची वीस दिवसांपूर्वी गुन्हे अन्वेषण विभागाच्या (पुणे) पोलिस अधीक्षकपदावरून मिरा भाईंदरला बदली करण्यात आली होती. आता त्यांची बदली गृहविभागाने रद्द केली आहे. त्यांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेली नाही.
पोलिस खात्यातील बदल्यांबाबत अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चा होत असते. अनेकदा अधिकारी राजकीय लॉबिंगचा वापर करून पोस्टिंग मिळवत असतात. नुकताच पोलिस अधिकाऱ्यांच्या काही बदल्या झाल्या होत्या. त्यात गुन्हे अन्वेषण विभागच्या (सीआयडी) अधीक्षक वैशाली माने Vaishali Mane) यांची मिरा भाईंदर येथे बदली झाली होती. या बदलीनंतर एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये वैशाली माने यांनी पोलिस खात्यातील बदल्यांबाबत गंभीर आरोप केले होते.
India-Bangladesh Border Dispute : घुसखोरी करण्याचा प्रयत्न; भारत-बांगलादेश सीमेवर तणाव
अनेक पुरुष अधिकारी पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे याच परिसरात वर्षानुवर्षे फिरत राहतात-माने
राज्य पोलीस दलातील बदल्यांच्या राजकारणावर आणि महिला अधिकाऱ्यांवरील कथित अन्यायावर वैशाली माने यांनी आक्रमक भूमिका घेतली. नुकताच अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांना न्याय मिळाला नसल्याचा थेट आरोप वैशाली माने यांनी केलाय. महिला अधिकाऱ्यांना साईड पोस्टिंग दिली जाते किंवा इतक्या दूरच्या ठिकाणी पाठवले जाते की तिथे प्रत्यक्ष जाऊन काम करणे कठीण होते. दुसरीकडे अनेक पुरुष अधिकारी पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे याच परिसरात वर्षानुवर्षे फिरत राहतात, असा त्यांचा आरोप होता. त्यांच्या आरोपाची दखल मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत या संदर्भात पोलिस महासंचालक लक्ष घालतील, असे सांगितले होते. त्यानंतर नव्या बदल्यांच्या आदेशामध्ये वैशाली माने यांची बदली रद्द करण्यात आली आहे.
सात अधिकाऱ्यांच्या बदल्या, बारी पुणे सीआयडीला
मुंबईतील पोलिस उपआयुक्त दिनेश गिरीधर बारी यांची पुणे सीआआयडीला पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर येथील यशवंत सोळंके यांची अमरावती शहर, संदीप जाधव यांची राज्य पोलिस नियंत्रण कक्षात अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माने यांची बदली झालेल्या मिरा भाईंदर या ठिकाणी शशिकांत बोराटे यांची बदली झाली आहे. तर स्मिता अभिषेक पाटील यांची राज्य सुरक्षा महामंडळ येथून सागरी सुरक्षा उपआयुक्त म्हणून बदली झाली आहे. तर मितेश घट्टे यांची 15 मे झालेली बदली रद्द करून त्यांना मुंबई शहर उपआयुक्त पदस्थापना दिली आहे.