स्वस्तात सोन्याची लालच पडली महागात, रायगडच्या जि. प. सदस्यासह तिघांना अहिल्यानगरमध्ये ५० लाखांना लुटले

जिल्हा परिषद सदस्यासह तिघांना स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून तब्बल 50 लाख रुपयांची रोकड आणि 16 तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 40

Robbers looted property worth lakhs : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यासह तिघांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून तब्बल 50 लाख रुपयांची रोकड आणि 16 तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी 15 जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडचे जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलवाडे, प्रकाश जंगम आणि सोनालाल माळी यांना काही व्यक्तींनी स्वस्त दरात सोने उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार संबंधितांनी व्यवहारासाठी मोठी रक्कम आणि सोने सोबत घेतले होते. मात्र, हा व्यवहार प्रत्यक्षात दरोड्याचा सापळा ठरला. काल म्हणजेच 4 जून रोजी रात्री उशिरा अहिल्यानगर तालुक्यातील अरणगाव बायपास चौक परिसरात ही घटना घडली. आरोपींनी नियोजनबद्ध पद्धतीने तिघांना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडील 50 लाख रुपयांची रोकड तसेच 16 तोळे सोने बळजबरीने हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर पीडितांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे या दरोड्याच्या कटात अविनाश नलवाडे यांच्या कामगाराचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले असून पोलिसांकडून अंतर्गत माहिती देणाऱ्या व्यक्तींचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

विदेशी गुंतवणूकदारांना सरकारी बाँडवरील व्याज आणि नफ्यावर करमाफी, रुपयाच्या घसरणीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

या प्रकरणात राजू मोहिते, अक्षय मोहिते यांच्यासह एकूण 15 जणांविरोधात अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली असून काही संशयितांवर देखरेख ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे आणि हितेश बलदोटा यांनी घटनास्थळी धाव घेत पीडितांची भेट घेतली. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेत पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक करून लुटलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा, अशी मागणी केली.

दरम्यान, स्वस्तात सोने मिळवून देण्याच्या आमिषातून घडलेली ही मोठी फसवणूक आणि दरोड्याची घटना अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, आरोपींना पीडितांच्या हालचालींची माहिती कशी मिळाली आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास सध्या अहिल्यानगर तालुका पोलीस करत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. पोलिस तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us