व्हिडिओकॉनचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक, आयसीआयसीआय बँक फसवणूक प्रकरण

  • Written By: Last Updated:
व्हिडिओकॉनचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक, आयसीआयसीआय बँक फसवणूक प्रकरण

मुंबईः व्हिडिओकॉन समूहाचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांना सोमवारी सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज फसवणूकप्रकरणी ही कारवाई झाली आहे.

सीबीआयने शुक्रवारी आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर यांना कर्ज फसवणूक प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर वेणूगोपाल धूत यांना सीबीआयने अटक केली आहे. वेणूगोपाल धूत हे शिवसेनेचे तीन टर्म राज्यसभा खासदार राहिलेले राजकुमार धूत यांचे बंधू आहेत.

चंदा कोचर या बँकेच्या सीईओ असताना त्यांनी कर्ज वाटपात गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. कोचर यांनी २००९ मध्ये वेणूगोपाल धूत यांच्या मालकीची व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सला ३०० कोटींचे २०११ मध्ये व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडला ७५० कोटींचे कर्ज मंजूर केले होते.

कर्ज मंजूर झाल्यानंतर लगेच एनआरएल या कंपनीच्या खात्यात ६४ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. एनआरएल ही कंपनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि वेणूगोपाल धूत यांनी स्थापन केली होती.

वेगवेगळ्या वेळी व्हिडिओकॉन समूहाला ३ हजार २५० कोटी रुपये कर्ज दिल्याचा आरोप कोचर व धूत यांच्यावर आहे.मुळात व्हिडिओकॉन कंपनीला बँकेने दिलेले कर्ज नियम व अटी भंग करून देण्यात आल्याचा आरोप आहे. यापूर्वी धूत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.

गेल्या आठवड्यात कोचर दाम्पत्याला सीबीआयने अटक केली असून, दोघांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी आहे. त्यानंतर धूत यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube