पायाभूत सुविधांचे तीन-तेरा! 6 तास ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर तांबेनी लोकलने गाठलं विधिमंडळ

पायाभूत सुविधांचे तीन-तेरा! 6 तास ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर तांबेनी लोकलने गाठलं विधिमंडळ

मुंबई : नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांना काल मुंबईमधील ट्राफिकचा सामना करावा लागला. तब्बल 6 तास ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर अखेरील लोकलने विधिमंडळ गाठण्याची वेळ त्यांच्यावर आली. भिवंडी ते नरिमन पॉईंट या 2 तासांच्या प्रवासाला त्यांना तब्बल 8 तास लागले. दरम्यान, यानंतर त्यांचं एक ट्विट प्रचंड व्हायरल होतं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुंबईतील पायाभूत सुविधांचा कसा बोजवारा उडाला याबद्दल भाष्य केलं आहे. तसंच सामान्य मुंबईकर, नोकरदार यांच्या मुंबईतील प्रवासाविषयी चिंता व्यक्त केली आहे. (Nashik graduate MLC Satyajit Tambe face traffic in Mumbai yesterday and went with mumbai local)

काय म्हणाले सत्यजीत तांबे?

दुपारपासून संगमनेरवरुन मुंबईला अधिवेशनास उपस्थित रहाण्यासाठी निघालो. नाशिक-मुंबई हायवे वर भिवंडी येथे ३-४ तास ट्रॅफिकमध्ये अडकलो, शेवटी एका मित्राने सल्ला दिला की, कल्याणवरुन लोकल ट्रेनने लवकर पोहोचशील, मग काय भिवंडी बायपासवरुन कल्याणच्या दिशेने प्रवास सुरु झाला, तेथेही ३० मिनिटांच्या प्रवासाला ३ तास लागले व अखेर आता ट्रेनने मुंबईकडे निघालोय. खरंतर आज माझा मुंबई महानगर प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या पालघर पासून पनवेल पर्यंत तर कल्याण-डोंबिवली पासून मुंबई पर्यंतच्या जनतेविषयी प्रचंड आदर वाढलाय, किती सहनशील जनता आहे ! मुंबईच्या अवतीभवती पायाभूत सुविधांचा पुरा बोजवारा उडालाय, माणसाची जीवनशैलीची ऐंशी की तैशी झालीय, पण आपली सहनशिलता अजूनही संपायचे नाव घेत नाही. या ट्विटला त्यांनी #शहरी_विकास असा हॅशटॅगही दिला आहे.

दरम्यान या ट्विटनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना तांबे म्हणाले, गेले अनेक वर्ष आपण मुंबईचा विकास होताना पाहत आहे. मात्र हा विकास होत असताना पायाभूत सुविधा वाढलेल्या नाहीत. संध्याकाळी बीकेसी किंवा नरिमन पॉईंटला टॅक्सी, बस पकडण्यासाठी रांगा लागलेल्या असतात. सकाळी कामावर निघण्याच्या वेळी आणि सुटल्यानंतर लोकलचाही बोजवारा उडालेला पाहतो. परवाच बाळाच्यासंबंधी घटना घडली होती. या सगळ्यात मुंबईची जनता खूप सहनशील झाली आहे. मुंबईकर यात काही बोलायला तयार नाहीत. राजकीय नेते बोलत नाहीत.

आगामी काळात मेट्रो हा मुंबई आणि इतर शहरांमधील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी 100 टक्के उपाय ठरु शकते. याशिवाय मुंबईच्या आजूबाजूला कोस्टल रोड, हायवे, फ्लायओव्हरची काम सुरु आहेत. पण ते प्रकल्प पूर्ण कधी होणार हा प्रश्न आहे. 2011 मध्ये मंजूर झालेले मेट्रोची कामं आज 12 वर्ष झाली तरी अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे शासनाने हे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याकडे भर देणं गरजेचं आहे, असं मतही आमदार तांबे यांनी व्यक्त केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube