अरे देवा! शंभर रुपये दिले नाही म्हणून विद्यार्थ्याचा हात कापला…

अरे देवा! शंभर रुपये दिले नाही म्हणून विद्यार्थ्याचा हात कापला…

पुणे : शंभर रुपये दिले नाही म्हणून एका विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पाषाण परिसरात घडलीय. 31 डिसेंबरच्या रात्री एका हॉटेलमध्ये दोघे मित्र जेवणासाठी गेले असताना फुटपाथवर ही घटना घडलीय. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंकज तांबोळी असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून तो अहमदनगरमधील जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो सध्या शिक्षणासाठी पुण्यात राहत आहे. 31 डिसेंबरच्या रात्री मेस बंद असल्या कारणाने जखमी विद्यार्थी आणि त्याचा मित्र पाषाण परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते.

जेवण केल्यानंतर दोघे मित्र फुटपाथवर थांबलेले असताना त्यांच्याजवळ दोन अनोळखी तरुण आले. या दोघांनी त्यांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोघांनीही या विद्यार्थ्यांकडे शंभर रुपये देण्याची मागणी केली.

शंभर रुपये देण्यासाठी विद्यार्थ्यांनी नकार दिला असता या दोघांनीही त्यांच्यावर जबरदस्ती केली. त्यांच्या खिशात हात घालून पैसे घेण्याचा प्रयत्न केला. जबरदस्ती करुनही पैसे न दिल्याने यातील एका तरुणाने एका विद्यार्थ्याच्या हातावर कुऱ्हाडीने वार करुन त्याचा मनगटापासून हात कापला.

विद्यार्थ्याचा हात कापल्यानंतर हे दोघेही तेथून पसार झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करत असताना अक्षरश: विद्यार्थ्याचा हात पिशवीत भरुन नेण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे जखमी विद्यार्थ्याचा जीव वाचला. पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

दरम्यान, पुण्यात गुन्हेगारांची मनमानी वाढल्याचं चित्र असताना सक्रिय असलेल्या कोयता गॅंगच्या एकाला मोठ्या शिताफीने पोलिसांकडून पाठलाग करुन पकडण्यात आले आहे. अशातच ही दुर्देवी घटना घडल्याने गुन्हेगारांवर पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube