मोदी-शहांनी मुख्यमंत्री केलेले भजनलाल शर्मा यांचे हे किस्से तुम्ही कधीच ऐकले नसतील….
Bhajanlal Sharma भजनलाल शर्मा (वय ५४) यांची राजस्थानच्या (Rajsthan CM) मुख्यमंत्रीपदी १२ डिसेंबर २०२३ ला निवड झाली. या पदाच्या शर्यतीत असलेल्या वसुंधराराजे यांनाच त्यांचे नाव सुचविण्यास भाग पाडण्यात आले. खुद्द शर्मा यांच्यासाठीदेखील हा धक्का होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नजरेने शर्मा यांना टिपले. देशातील एका मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी त्यांना बसवले. राजस्थानमध्ये या निवडीसाठी आमदारांची बैठक बोलविण्यात आली. जेव्हा वसुंधराराजे यांनी आपल्या हाती आलेल्या चिठ्ठीतून शर्मा यांचे नाव वाचले तेव्हा समोर बसलेले आमदार टाळ्या वाजविण्याचे देखील विसरले. कारण त्यांचा त्यांच्या कानावरच विश्वास बसत नव्हता. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेला थेट मुख्यमंत्री कसा काय होऊ शकतो, हे त्यांनाही उमगत नव्हते.
शर्मा यांच्या राजकीय कारकिर्दीचे वर्णन करायचे तर पक्षाचा एकनिष्ठ सैनिक असेच करावे लागेल. पक्ष देईल ती जबाबदारी सांभाळणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची आतापर्यंत ओळख होती. पण अमित शहांच्या नजरेने त्यांना हेरले आणि त्यांचे करियरच बदलून गेले. त्याचाही किस्सा भन्नाट आहे.
आमदार व्हायची इच्छा
शर्मा हे मूळचे भरतपूरचे. येथून आपल्याला विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून ते फार प्रयत्न करत होते. भरतपूर हा मतदारसंघ भाजपसाठी कधीच अनुकूल राहिला नाही. येथील सामाजिक रचनाच अशी आहे की भाजपचा उमेदवार निवडून येणे अशक्यप्राय असते. तरीही शर्मा हे या मतदारसंघातून तरी उमेदवारी मिळावी म्हणून अनेक नेत्यांकडे चकरा मारत होते. उमेदवार निश्चित करण्यासाठी झालेल्या एका संध्याकाळच्या बैठकीत शर्मा यांच्यासाठी ही जागा निश्चित करण्यात आली. या बैठकीला अमित शहा, जे. पी. नड्डा हे पण उपस्थित होते.
Rajasthan : मोदी शाहंच्या मनाचा अंदाज लागेना; पहिल्यांदा आमदार झालेले भजनलाल शर्मा थेट CM
दुसऱ्या दिवशी पुन्हा वरिष्ठ नेते उमेदवारांची पुढील नावे निश्चित करण्यासाठी भेटले. त्या वेळी अमित शहा यांनीच शर्मा यांना आपण धोक्याच्या जागेवर का पाठवत आहोत, असा सवाल विचारला. त्याऐवजी आपण त्यांना भाजपसाठी सर्वाधिक सुरक्षित असलेला सांगानेर हा मतदारसंघ देऊ, असे शहांनी सांगितले. शहा यांचा अंदाज बरोबर आला. सांगानेर येथून शर्मा हे सुमारे ४८ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. भरतपूरमधून भाजपच्या उमेदवाराचा पराभव अपेक्षेनुसार झाला. येथे राष्ट्रीय लोकदलाच्या सुभाष गर्ग यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. खुद्द अमित शहा यांनीच त्यांच्यासाठी योग्य असा मतदारसंघ निवडला होता, हे पण आता स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ आज ना उद्या शर्मा यांना महत्वाची जबाबदारी द्यायची, हे शहांच्या मनात पक्के असावे.
शर्मा आणि अमित शहा किंवा मोदी यांचा संबंध कसा आला, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. शर्मा हे भाजपचे सरचिटणीस म्हणून २०१४ पासून काम पाहत होते. यात प्रमुख नेत्यांच्या सभांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष जे. पी. नड्डा या बड्या नेत्यांच्या सभा म्हणजे प्रचंड नियोजनाचे काम असते. पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क, सुरक्षा व्यवस्था, गर्दी जमविणे आणि त्यासाठीचे व्यवस्थापन, निधीची उपलब्धता अशा अनेक बाबींवर काम करावे लागते. या निमित्ताने शर्मा यांनी पंतप्रधान कार्यालयाशी संवाद सुरू होता. त्यातून त्यांचे काम आणि नावही बड्या नेत्यांपर्यंत पोहोचत होते.
सरपंच ते मुख्यमंत्री
आमदार होण्यापूर्वी शर्मा हे २००० मध्ये आटारी गावचे सरपंच बनले. त्यानंतर २०१० ते २०१५ या काळात पंचायत समितीचे सदस्य होते. भरतपूर भाजयुमोचे चिटणीस, सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष यासह नंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. २०१४ पासून प्रदेश कार्यालयात सरचिटणीस म्हणून ते कार्यरत होते.
राज्यात २०२३ च्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यानंतर स्वतः निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याची त्यांची मनीषा होती. तशी इच्छा त्यांनी राष्ट्रीय संघटनेतील नेत्याकडे व्यक्त केली. हा नेता थेट नड्डा, शहा आणि मोदी यांच्या संपर्कातील आहे. त्यावेळी या नेत्याने शर्मा यांच्या कामाचे कौतुक करत तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या आदेशानुसार काम करत असतात. त्यांना पक्ष कोठेच स्थान देत नाही, अशी व्यथा व्यक्त केली. अशा कार्यकर्त्यांमुळे पक्ष टिकून राहिला आहे, अशी भावना मांडली. पण शर्मा यांना तिकिट मिळेलच, असेही ते काही बोलले नव्हते. त्यामुळे शर्मा यांनाही तिकिटाबाबत काही आशा वाटत नव्हती. पण याच बैठकीत त्यांच्या भाग्याची रेषा आखल्याचे दिसून येते.
आमदार झाल्यानंतर शर्मा पक्षातील अनेक नेत्यांना भेटत होते. सर्वच जण त्यांचे अभिनंदन करत होते. अशा नेत्यांकडे बोलताना आपल्याला राज्यमंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करत होते. ते नाहीच मिळाले तर अशोक गेहलोत यांच्या काळात उच्च जातींसाठी स्थापन झालेल्या महामंडळाचे अध्यक्षपद तरी मिळावे, अशीच त्यांची माफक इच्छा होती.
शर्मा यांच्यावर २०२३ या वर्षात मात्र भाग्यवर्षाव झाला. भाजप आमदारांची नेता निवडीसाठी जी बैठक झाली त्या वेळी एक छायाचित्र काढण्यात आले. साहजिकच प्रथम आमदार म्हणून निवडून आलेले शर्मा हे शेटवच्या रांगेत होते. तो फोटो क्लिकही झाली. पण त्यानंतर काही तासांत शर्मा यांच्या नावाची विधीमंडळ नेता म्हणून घोषणा झाली आणि शेवटच्या रांगेतील शर्मांना पहिल्या रांगेत स्थान मिळाले.
वसुंधराराजे, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल अशा नेत्यांची नावे राजकीय वर्तुळात चर्चेत होती. या सर्वांना दूर सारत मोदी-शहांनी एका कार्यकर्त्याला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिली.