हाय-सिक्युरिटी झोनमध्ये मोठी दुर्घटना; मुंबई विमानतळावर शॉर्टसर्किटमुळे आग, उड्डाण सेवा विस्कळीत
विलेपार्ले परिसरातील टर्मिनल 1 मध्ये सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
Fire at Mumbai airport due to short circuit : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली असून, विमानतळाच्या सुरक्षेवर आणि उड्डाण व्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे समोर आले आहे. विलेपार्ले परिसरातील टर्मिनल 1 मध्ये सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. आगीची माहिती मिळताच विमानतळ पोलीस, तसेच मुंबई अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
हाय सिक्युरिटी झोन असलेल्या विमानतळांवर ही घटना घडल्याने तातडीने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करण्यात आली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आणि जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम हाती घेतले. या आगीमुळे टर्मिनल 1 परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला असून, प्रवाशांमध्ये भीती आणि घबराट निर्माण झाली. खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळावरील सर्व प्रवेशद्वार जवळपास तासभराचा बंद करण्यात आली होती. तसेच काही उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली असून, विमानतळावरील हालचालींवर मोठा परिणाम झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, टर्मिनलच्या आतील केबल ट्रे आणि स्विच बॉक्समध्ये ही आग लागली होती. रवींद्र आंबुलगेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत आणि परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. दरम्यान, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरुवातीला विमानतळाच्या अंतर्गत अग्निशमन यंत्रणेने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात येताच मुंबई अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले.
घटनेदरम्यान विमानतळ परिसरातील इंटरनेट सेवा देखील काही काळासाठी बंद पडल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे समन्वय साधण्यात अडचणी निर्माण झाल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत असून, कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमुळे विमानतळाच्या सुरक्षेविषयी आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील चौकशीमध्ये आगीचे नेमके कारण आणि संभाव्य निष्काळजीपणा समोर येण्याची शक्यता आहे.