ट्रॅफिक नियम मोडल्यास पॉईंट कट; मर्यादा ओलांडताच लायसन्स रद्द, गडकरींची मोठी घोषणा

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाच्या आरसीसाठी ग्रेडेड पॉईंट सिस्टिम सुरू करण्याची योजना आखत आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 09T120105.043

Gadkari’s major announcement : कायमच वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना आता मोठा डंका बसण्याची शक्यता आहे. वाहतूक नियम मोडल्यास फक्त चलान किंवा दंड आकारण्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता सरकार निगेटिव्ह पॉईंट सिस्टिम लागू करण्याच्या तयारीत आहे. या व्यवस्थेत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्राशी संबंधित निगेटिव्ह पॉईंट नोंदवले जातील. नियमभंगाचे पॉईंट ठरावीक मर्यादेपलीकडे गेल्यास संबंधित वाहनचालकाचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी SIAM च्या 66 व्या वार्षिक कार्यक्रमात याबाबत माहिती दिली. देशातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत शिस्त निर्माण करण्यासाठी सरकार कठोर पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाच्या आरसीसाठी ग्रेडेड पॉईंट सिस्टिम सुरू करण्याची योजना आखत आहे. प्रस्तावित व्यवस्थेत चालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्या नोंदीत निगेटिव्ह पॉईंट जमा होतील. वारंवार नियम मोडल्यामुळे हे पॉईंट ठरावीक मर्यादेपर्यंत पोहोचल्यास संबंधित चालकावर कठोर कारवाई केली जाऊ शकते.

ठरविलेली मर्यादा ओलांडल्यानंतर पोलीस किंवा संबंधित वाहतूक प्रशासनाला ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची कारवाई करता येईल. त्यामुळे सातत्याने सिग्नल तोडणे, अतिवेगाने वाहन चालवणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचक निर्माण होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे ही पॉईंट सिस्टिम केवळ नियम मोडणाऱ्यांना शिक्षा करण्यापुरती मर्यादित राहणार नाही. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या आणि चांगला ड्रायव्हिंग रेकॉर्ड असलेल्या वाहनचालकांना त्याचा फायदा मिळण्याचीही शक्यता आहे.

कुकडी’च्या डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती; वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

अशा चालकांना विम्याच्या प्रीमियममध्ये सवलत तसेच अन्य आर्थिक फायदे देण्याची योजना विचाराधीन आहे. सुरक्षित वाहन चालवणारे आणि सातत्याने नियम मोडणारे चालक यांच्यात फरक करून चांगल्या वाहनचालकांना प्रोत्साहन देणे, तर नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे हा या व्यवस्थेमागील उद्देश आहे. याच कार्यक्रमात गडकरी यांनी जुन्या BS-IV वाहनांबाबतही महत्त्वाची माहिती दिली. जुन्या वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार नवीन एमिशन कंट्रोल डिव्हाइस आणण्याच्या तयारीत आहे. या उपकरणाची अंदाजे किंमत 4 ते 5 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते. या उपकरणाची चाचणी पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

जुन्या वाहनांमध्ये हे उपकरण बसवल्यानंतर त्यातून होणारा धूर आणि प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न असून, उत्सर्जन BS-VI वाहनांच्या पातळीच्या जवळ आणण्याचे उद्दिष्ट आहे. वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई, नियम पाळणाऱ्या चालकांना प्रोत्साहन आणि जुन्या वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा विविध पातळ्यांवर सरकारकडून उपाययोजना करण्याची तयारी सुरू असल्याचे गडकरी यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे.

follow us