मे महिन्यात वाहन विक्रीचा ऐतिहासिक विक्रम; प्रवासी वाहनांच्या विक्रीत 27 टक्क्यांची वाढ, ग्रामीण भागामुळे वाहन विक्रीला बूस्टर !
Auto sales- मे 2026 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक वाहनांची मासिक विक्री नोंदविली गेली आहे. हा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.
नवी दिल्ली : भारतामध्ये वाहने वापरण्याची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे वाहन उद्योग क्षेत्राचा विस्तार होत आहे. आता मे 2026 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक वाहनांची मासिक विक्री नोंदविली गेली आहे. हा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. प्रवासी वाहने, दुचाकी आणि तीनचाकी या तिन्ही प्रमुख वाहन श्रेणींमध्ये जोरदार मागणीमुळे ही वाढ झाली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून हे समोर आले आहे. (indias-auto-sales-hit-record-high-in-may-as-pvs-jump-27)
प्रवासी वाहनांची सर्वाधिक विक्री
मे 2026 मध्ये देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री वार्षिक आधारावर 27.3 टक्क्यांनी वाढली आहे. 4,38,854 वाहने विकली गेली आहे. मागील वर्षी याच महिन्यात ही विक्री 3,44,656 युनिट्स होती.
दुचाकी वाहनांची विक्रीही मोठी
दुचाकी वाहनांच्या विक्रीतही उल्लेखनीय वाढ झाली आहे. महिन्यातभरात ती 14.8 टक्क्यांनी वाढून 19,02,209 युनिट्स झाली. तर तिनचाकी वाहनांची विक्री 31.1 टक्क्यांनी वाढून 70,720 युनिट्सवर पोहोचली आहे. दुचाकी विभागात मे महिन्यातील विक्रीनेही नवा विक्रम प्रस्थापित झाला. विशेषतः स्कूटरला मोठी मागणी आहे. स्कूटर विक्री 27.4 टक्क्यांनी वाढून 7,39,667 युनिट्स झाली आहे. तर मोटारसायकल विक्री 7.2 टक्क्यांनी वाढून 11,13,973 युनिट्स झाली. मोपेड विक्रीतही 30.3 टक्क्यांची वाढ नोंदवत ती 48,569 युनिट्सवर पोहोचली.
तीनचाकी वाहन विक्रीत वाढ
तीनचाकी वाहन विभागातही मजबूत वाढ कायम राहिली. प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीनचाकी वाहनांची विक्री 30 टक्क्यांनी वाढून 57,649 युनिट्स झाली, तर मालवाहू तीनचाकी वाहनांच्या विक्रीत 35.3 टक्क्यांची वाढ होऊन ती 11,802 युनिट्सवर पोहोचली.
इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांना पसंती
इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ई-रिक्षा विक्रीत 38.9 टक्क्यांची वाढ होऊन ती 1,000 युनिट्स झाली, तर ई-कार्ट विक्रीत तब्बल 81.8 टक्क्यांची वाढ नोंदवत ती 269 युनिट्सवर पोहोचली. यावरून देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीचा स्वीकार वेगाने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
वाहन विक्री कशामुळे वाढली ?
याबाबत SIAM चे महासंचालक राजेश मेनन यांनी सांगितले की, मे महिन्यात प्रवासी वाहने, दुचाकी आणि तिन्ही प्रमुख वाहन विभागांनी आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री नोंदवली आहे. मे 2025 मधील तुलनेने कमी विक्रीचा आधार (लो बेस इफेक्ट), वस्तू आणि सेवा कर (GST) दरांतील कपात तसेच वाहन कर्जासाठी उपलब्ध झालेल्या सुलभ वित्तपुरवठ्यामुळे वाहनांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.
ग्रामीण भागांमध्ये वाहन बाजाराचा विस्तार
ग्रामीण भागांनी वाहन बाजाराच्या विस्तारात अधिक महत्त्वाची भूमिका बजावलीय. ग्रामीण बाजारपेठेतील वाढीचा वेग शहरी भागांपेक्षा अधिक राहिला. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, वाढते उत्पन्न, पायाभूत सुविधांमध्ये होत असलेली सुधारणा आणि वाहन खरेदीसाठी वित्तपुरवठ्याची वाढती उपलब्धता यामुळे महानगरांबाहेरील भागांत वाहन मालकीला मोठी चालना मिळत आहे. दुचाकी वाहनांच्या विक्रीनेही सातत्याने सकारात्मक वाढ कायम राखलीय. एकूण वाहन विक्रीत त्यांचा सर्वाधिक वाटा राहिला. दैनंदिन प्रवासाची गरज तसेच लहान शहरे आणि ग्रामीण भागांमध्ये वाढत असलेला वापर यामुळे दुचाकी वाहनांची मागणी मजबूत राहिली. पेट्रोल, डिझेल एेवजे पर्यायी इंधनावर चालणाऱ्या आणि ऊर्जा कार्यक्षम वाहनांकडे ग्राहकांचा वाढता कल. इंधनाच्या वाढत्या किमती, पर्यावरणाविषयीची जागरूकता आणि दीर्घकालीन वापर खर्चात बचत या कारणांमुळे इलेक्ट्रिक वाहने आणि कमी प्रदूषण करणाऱ्या तंत्रज्ञानावरील ग्राहकांचा विश्वास वाढत आहे.