भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनचा प्रवास फक्त 5 रूपयात; मार्ग अन् वैशिष्ट्ये वाचाच…
Hydrogen Train डिझेल किंवा ओव्हरहेड वीजवाहिन्यांवर अवलंबून राहण्याऐवजी ही ट्रेन हायड्रोजन फ्युएल सेलद्वारे स्वतःच वीज तयार करते.
India’s First Hydrogen Train Fare Starts At Just Rs 5 : भारताने हरित रेल्वे वाहतुकीच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत पहिली स्वदेशी हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणारी प्रवासी रेल्वे सुरू केली आहे. हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.17 ) या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे चर्चेत असलेल्या या ट्रेनची आणखी एक खास गोष्ट म्हणजे तिचे तिकीट. या ट्रेनचे किमान प्रवासभाडे अवघे 5 रुपये असून, कमाल भाडे 25 रुपये आहे. विशेष म्हणजे, अनेक रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटापेक्षाही हे भाडे कमी आहे.
अवघ्या 5 रुपयांत हरित प्रवास
जिंद-सोनीपत या सुमारे 90 किलोमीटरच्या मार्गावर धावणाऱ्या या ट्रेनचे भाडे प्रवासाच्या अंतरानुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार याचे किमान भाडे 5 रुपये तर, कमाल भाडे हे 25 रुपये आहे.
कोणत्या मार्गावर धावणार?
मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेली हायड्रोलिक ट्रेन ही उत्तर रेल्वेच्या जिंद-सोनीपत मार्गावर धावणार असून, सुमारे 90 किलोमीटरचे अंतर दोन तासांत पूर्ण करेल. जिंद जंक्शन, जिंद सिटी, पांडू पिंडारा, ललित खेड़ा हॉल्ट, भांभेव्हा, इसापूर खेरी हॉल्ट, बुटाना हॉल्ट, खंडराई हॉल्ट, रबरा हॉल्ट, लाठ, मोहाना, बरवासनी हॉल्ट आणि सोनीपत या ठिकाणांवर या ट्रेनचा थांबा असेल.
ट्रेनची खास वैशिष्ट्ये
– भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन एकूण 10 डब्यांची
– यामध्ये 2 हायड्रोजन ड्रायव्हिंग पॉवर कार आणि 8 ट्रेलर कोच
– एकावेळी सुमारे 2,600 प्रवासी या ट्रेनमधून प्रवास करू शकतात.
– या ट्रेनचा कमाल वेग : 75 किमी प्रतितास
– तर, डिझाइननुसार कमाल वेग : 110 किमी प्रतितास
– 1,200 किलोवॅट क्षमतेची हायड्रोजन फ्युएल सेल प्रणाली
– हायड्रोजन गळती, धूर, ज्वाला आणि तापमानावर लक्ष ठेवणारी अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था
इतर ट्रेनपेक्षा हायड्रोजन ट्रेन वेगळी कशी?
डिझेल किंवा ओव्हरहेड वीजवाहिन्यांवर अवलंबून राहण्याऐवजी ही ट्रेन हायड्रोजन फ्युएल सेलद्वारे स्वतःच वीज तयार करते. फ्युएल सेलमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या रासायनिक प्रक्रियेतून वीज निर्माण होते. या प्रक्रियेत कार्बन उत्सर्जन होत नाही आणि उपउत्पादन म्हणून केवळ पाण्याची वाफ आणि उष्णता तयार होते. त्यामुळे ही रेल्वे पूर्णपणे पर्यावरणपूरक मानली जाते.
भारतातील सर्वात मोठे हायड्रोजन रिफ्युएलिंग स्टेशन
हायड्रोजन ट्रेन प्रकल्पासाठी हरियाणातील जिंद येथे भारतातील सर्वात मोठे रेल्वे हायड्रोजन साठवण आणि रिफ्युएलिंग केंद्र उभारण्यात आले आहे. येथे जवळपास 3,000 किलो हायड्रोजन साठवण्याची क्षमता असून, ही सुविधा आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार विकसित करण्यात आली आहे.
जगातील मोजक्या देशांच्या यादीत भारत
हायड्रोजन ट्रेनच्या माध्यमातून भारताने हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वे तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. यापूर्वी जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, इटली, जपान, चीन आणि अमेरिका या देशांमध्ये हायड्रोजन रेल्वेची चाचणी किंवा सेवा सुरू झाली आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला चालना देणारा हा प्रकल्प भारतीय रेल्वेसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. स्वच्छ ऊर्जा, कमी कार्बन उत्सर्जन आणि परवडणारे भाडे यांचा संगम घडवत भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन भविष्यातील हरित रेल्वे वाहतुकीची दिशा ठरू शकते.