ट्रम्पपेक्षा तुमचा मुलगा आमच्याकडे सुरक्षित, इराणकडून अमेरिकन आईला संदेश; बेपत्ता पायलटवरून आंतरराष्ट्रीय वाद पेटला

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करत म्हटलं आहे की, तुमचा मुलगा इराणच्या ताब्यात असेल, तर तो ट्रम्प यांच्यासोबत असण्यापेक्षा अधिक सुरक्षित असेल.

  • Written By: Published:
Untitled Design 39

International controversy erupts over missing pilot : मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्शवभूमीवर एक धक्कादायक आणि संवेदनशील घटना समोर आली आहे. इराणने शुक्रवारी अमेरिकेचे दोन फायटर जेट पाडल्याचा दावा केला आहे. यामध्ये F-15 आणि A -10 थोरबोल्ट २ या दोन अत्याधुनिक लढाऊ विमानांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यातील एका पायलटला सुरक्षितरित्या वाचवण्यात आलं असलं, तरी दुसरा पायलट अद्याप बेपत्ता आहे. या बेपत्ता पायलटच्या आईने सोशल मीडियावरून भावनिक आवाहन करत आपल्या मुलाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, काल युद्धादरम्यान पाडल्या गेलेय पायलट्ससाठी प्रार्थना करा. माझा मुलगा त्यापैकी एक असून अद्याप त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. कृपया सर्व पायलट्स आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करा.

दरम्यान, या भावनिक पोस्टनंतर इराणच्या परदेशातील दूतावासांकडून आशचर्यकारक प्रतिक्रिया देण्यात आली आहे. विशेषतः पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका येथील इराणी दूतावासाने सोशल मीडियावरून उत्तर देत वादग्रस्त विधान केलं आहे. या प्रतिसादात थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करत म्हटलं आहे की, तुमचा मुलगा इराणच्या ताब्यात असेल, तर तो ट्रम्प यांच्यासोबत असण्यापेक्षा अधिक सुरक्षित असेल. इतकच नव्हे, तर इराणकडून असा दावा करण्यात आला की, त्यांच्या ताब्यातील कैद्यांशी सन्मानाने आणि मानवी मूल्यांनुसार वागणूक दिली जाते.

पाकिस्तानमधील इराणी दूतावासाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आम्ही मुसलमान आणि सभ्य इराणी आहोत. आम्ही कैद्यांशी सन्मानाने वागतो. प्रार्थना करा की तुमचा मुलगा इराणच्या ताब्यातच राहावा आणि अमेरिकन रेस्क्यू टीमच्या हाती लागू नये. तर दक्षिण आफ्रिकेतील दूतावासाने आपल्या भूमिकेचं समर्थन करत म्हटलं आहे की, इराणमध्ये प्राचीन काळापासून युद्धकैद्यांचे अधिकार मान्य करण्यात आले आहेत. आम्ही आमच्या कैद्यांशी तसं वागत नाही, जसं आमचे शत्रू वागतात.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कायद्यांचा देखील मुद्दा पुढे आला आहे. जिनिव्हा कन्व्हेक्शन 1949 नुसार, युद्धादरम्यान शत्रू राष्ट्राच्या ताब्यात सापडलेल्या सैनिकांना युद्धकैदी म्हणून मान्यता दिली जाते. अशा कैद्यांना कायदेशीर संरक्षण, मानवी वागणूक आणि त्यांच्या हक्कांची हमी दिलेली असते. त्यामुळे, जर बेपत्ता अमेरिकन पायलट इराणच्या ताब्यात असल्याचं स्पष्ट झालं, तर त्याला युद्धकैदी म्हणूनच वागणूक दिली जाणं आवश्यक आहे. सध्या या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, बेपत्ता पायलटच्या शोध आणि त्याच्या सुरक्षिततेबाबतची चिंता अधिक गडद होत चालली आहे.

follow us