गेट्स, स्टीव्ह जॉब्स आणि आता सॅम ऑल्टमन; सर्वांचा एकच सूर – मुलांना मोबाईलपासून लांब ठेवा!

आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्रांतीचा चेहरा असलेले सॅम ऑल्टमन यांनी नुकतंच एक असं विधान केलंय, ज्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय.

  • Written By: Published:
WhatsApp Image 2026 04 06 At 11.58.55 AM

Keep children away from mobile phones! : आजच्या डिजिटल युगात आपण सर्वजण आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल बोलतोय. या क्रांतीचा चेहरा असलेले OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनी नुकतंच एक असं विधान केलंय, ज्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय. ज्या माणसाने जगाला ‘ChatGPT’ सारखं प्रगत साधन दिलं, तोच माणूस आता म्हणतोय की, माझ्या मुलाने आयपॅडवर नाही, तर मातीत खेळायला हवं. तंत्रज्ञानाच्या शिखरावर असलेल्या एका व्यक्तीने असं का म्हणावं? यामागे पालकांसाठी कोणता मोठा संदेश दडला आहे, हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत…

सॅम ऑल्टमन आणि ऑलिव्हर मुलहेरिन यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून आपल्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. अलीकडेच ‘मोस्टली ह्युमन’ या पॉडकास्टमध्ये बोलताना सॅम यांनी आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल आणि त्याच्या संगोपनाबद्दल काही महत्त्वाचे विचार मांडले. त्यांनी सांगितलं की, जेव्हा ते आजूबाजूच्या लहान मुलांना पाहतात, तेव्हा त्यांना खूप चिंता वाटते. विशेषतः अशी मुलं जी तासनतास स्क्रीनला चिकटलेली असतात आणि ज्यांच्याकडून आयपॅड किंवा मोबाईल हिसकावून घेणं पालकांसाठी एक मोठं आव्हान बनलं आहे.

सॅम ऑल्टमन यांच्या मते, आजची पिढी मैदानी खेळांपेक्षा डिजिटल जगात जास्त रमतेय. मुलं खेळणी, निसर्ग आणि प्रत्यक्ष संवाद विसरून केवळ टॅब्लेट आणि फोनच्या आहारी गेली आहेत. जेव्हा मी लहान मुलांना आयपॅडचे व्यसन लागलेले पाहतो, तेव्हा मला खूप वाईट वाटते, असे सॅम यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांना भीती वाटते की तंत्रज्ञानाचा अतिवापर मुलांच्या नैसर्गिक विकासात अडथळा ठरू शकतो. म्हणूनच त्यांनी ठरवलंय की, त्यांच्या मुलाला सुरुवातीच्या काळात या डिजिटल व्यसनापासून लांब ठेवायचं आणि त्याला बाहेरच्या जगात मुक्तपणे बागडू द्यायचं.

गंमत म्हणजे, तंत्रज्ञान बनवणारे हे दिग्गज स्वतःच्या घरात मात्र अतिशय कडक नियम पाळतात. सॅम ऑल्टमन हे पहिलेच व्यक्ती नाहीत ज्यांनी ही चिंता व्यक्त केली आहे. याआधी मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांनी आपल्या मुलांना वयाच्या 14 वर्षांपर्यंत मोबाईल दिला नव्हता. स्टीव्ह जॉब्स, ज्यांनी जगाला आयपॅडची ओळख करून दिली, त्यांनी स्वतःच्या घरात मुलांच्या आयपॅड वापरावे मर्यादा घातल्या होत्या. अगदी ‘अँथ्रोपिक’चे जॅक क्लार्क सुद्धा आपल्या मुलाला यूट्यूबपासून लांब ठेवतात. यावरून हेच सिद्ध होतं की, तंत्रज्ञानाचे निर्माते त्याच्या दुष्परिणामांबाबत सामान्य पालकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त जागरूक आहेत.

सॅम ऑल्टमन हे तंत्रज्ञानाच्या विरोधात नक्कीच नाहीत. त्यांनी स्वतः कबूल केलं की मुलाच्या संगोपनासाठी त्यांनी चॅटजीपीटीची मदत घेतली होती. त्यांना खात्री आहे की भविष्यात AI मुळे शिक्षण पद्धती अधिक वैयक्तिक आणि सोपी होईल. पण त्यांचा मुख्य मुद्दा हा आहे की, “वेळ”. मुलांच्या मेंदूचा विकास होत असताना त्यांना नैसर्गिक अनुभवांची गरज असते. मातीत खेळणं, पडणं-लागणं, प्रत्यक्ष मित्र बनवणं यातून जे शिक्षण मिळतं, ते जगातील कोणताही प्रगत आयपॅड किंवा एआय देऊ शकत नाही.

सॅम ऑल्टमन यांचं हे विधान आजच्या प्रत्येक पालकासाठी डोळे उघडणारं आहे. आपण मुलांना शांत ठेवण्यासाठी किंवा जेवण भरवण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल देतो, पण त्यामुळे आपण त्यांचं बालपण हिरावून घेत आहोत का? याचा विचार करण्याची गरज आहे. तंत्रज्ञान हे आयुष्याचा भाग असावं, पण ते संपूर्ण आयुष्य असू नये. सॅम यांचा हा सल्ला पाळून आपणही आपल्या मुलांना थोडा वेळ स्क्रीनपासून लांब ठेवून निसर्गाच्या कुशीत खेळण्यासाठी प्रवृत्त करायला हवं. शेवटी, मातीत खेळून तयार झालेलं बालपण हे डिजिटल जगापेक्षा कधीही समृद्ध असतं.

follow us