साक्षी मलिक, संगीता आणि विनेश फोगटची सुटका, बजरंग पुनिया अजूनही कोठडीत

साक्षी मलिक, संगीता आणि विनेश फोगटची सुटका, बजरंग पुनिया अजूनही कोठडीत

Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्याविरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी आज दुपारी ताब्यात घेतले होते. त्यापैकी साक्षी मलिक, संगीता फोगट आणि विनेश फोगट या महिला कुस्तीपटूंची सुटका करण्यात आली आहे, तर बजरंग पुनिया अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे. सर्व पैलवानांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तात ठेवले होते.

23 एप्रिलपासून देशातील अनेक कुस्तीपटू ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी जंतरमंतरवर आंदोलन करत होते. एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंसह सात महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेसाठी कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु होते.

Wrestlers Protest : ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करा, दिल्ली महिला आयोगाने घेतली दखल…

आज, 28 मे रोजी, नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी कुस्तीपटूंची येथे ‘महिला सन्मान महापंचायत’ होणार होती. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या पैलवानांनी शांततेत मोर्चा काढणार असल्याचे सांगितले होते. मात्र, पोलिसांकडून जंतरमंतरवरच पैलवानांना थांबवण्यात आले. कुस्तीपटूंना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला होता. ठिकठिकाणी बॅरिकेडिंगही लावण्यात आले होते.

मोर्चा काढण्यासाठी कुस्तीपटूंनी पोलिसांचे बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला. नवीन संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी फरफटत नेले. यामध्ये विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह सर्व कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंच्या जंतरमंतरवरील सर्व तंबू देखील हटवले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube