ASI ला ज्ञानवापीचे सर्वेक्षण करण्यास परवानगी, वाराणसी न्यायालयाचा मोठा निर्णय

ASI ला ज्ञानवापीचे सर्वेक्षण करण्यास परवानगी, वाराणसी न्यायालयाचा मोठा निर्णय

Gyanvapi Case: यूपीच्या वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी मशीद परिसराच्या ASI ला (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) सर्वेक्षण करण्यासंदर्भात मोठा निर्णय दिला आहे. वाराणसी जिल्हा न्यायालयाने वजूखाना वगळता संपूर्ण ज्ञानवापी मशीद परिसराचे ASI कडून सर्वेक्षण करण्याची हिंदू पक्षाची मागणी मान्य केली आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून शुक्रवारी जिल्हा न्यायाधीश डॉ.अजय कृष्ण विश्वेश कोर्टाने हा निर्णय दिला.

हिंदू पक्षाने वादग्रस्त वजूखानाचा (नमाजापूर्वी हात, चेहरा स्वच्छ करण्याचे ठिकाण) भाग वगळता संपूर्ण मशीदीचे वैज्ञानिक सर्वेक्षण म्हणजेच ASI सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. त्यावर तीन दिवस सुनावणी होऊन 14 जुलै रोजी निर्णय राखून ठेवला होता.

या निर्णयाच्या संदर्भात, हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, न्यायालयाने हिंदू पक्षाची मागणी मान्य केली आहे आणि ती न्याय्य आहे. आता वादग्रस्त भाग वगळता संपूर्ण कॅम्पसचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एएसआयला सर्वेक्षण परवानगी देत ​​न्यायालयाने 4 ऑगस्टपर्यंत अहवाल मागवला आहे. वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या आधारे अहवाल आल्यानंतर या प्रकरणावर न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. तसेच शृंगार गौरीच्या नियमित पूजेसाठी महिलांच्या वतीने करण्यात आलेल्या याचिकेवर यानंतर निर्णय होणार आहे.

‘इतिहासातील गाडलेली मढी उकरून ज्यांचा धर्म…’; मणिपूर घटनेवरून आव्हाडांचे मोदींवर टीकास्त्र

सर्वेक्षण कसे केले जाते?
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) जुन्या इमारती आणि अवशेषांच्या सर्वेक्षणात ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. या तंत्राद्वारे सर्वेक्षण क्षेत्राच्या भूतकाळाचा सखोल अभ्यास केला जातो. ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणातही हेच तंत्र वापरले जाणार आहे.

ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मशिदीचे सर्वेक्षण केले जाईल, असे हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी सांगितले. याशिवाय, ASI ची एक टीम भूतकाळातील मानवी हस्तक्षेप पुरावे शोधतात. त्यात भिंती किंवा पाया, कलाकृती किंवा मातीमधील रंग बदलाचा अभ्यास केला जातो. संशोधक किंवा टीम पृष्ठभागावरील कलाकृती किंवा इतर पुरातत्व संकेतांचा शोधत घेऊन पर्यावरणाच्या पैलूंची नोंद करतात. सर्वेक्षण पथक ते सर्व पुरावे जतन करून अंतिम अहवाल तयार करते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube