दिशा सालियन प्रकरण… सत्ताधाऱ्यांचा सीबीआयवर विश्वास नाही का?
नागपूर : सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालावे म्हणून विरोधी पक्षातील आमदार प्रयत्न करतायत. अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात येत आहेत. मात्र सत्ता पक्षातील आमदारांनी दिशा सालियन मृत्य प्रकरणावरून नौटंकी चालवली आहे. अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
पवार म्हणाले, आम्ही सरकारमध्ये होतो. त्यामुळे दिशा सालियन हे प्रकरण सीबीआयकडे नेले. सीबीआयने तपास केला आणि तिने आत्महत्या केली असे त्या ठिकाणी सांगितले. त्यामध्ये कुणाचाही संबंध नाही. असे सीबीआयने स्पष्ट केले. जे प्रकरण संपले आहे तरी ते पुन्हा खुसपट काढून सभागृहाचा वेळ वाया घालवला जातो. आम्हाला या विषयी बोलायला दिले जात नाही. यांचा सीबीआयवर विश्वास नाही का, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
केंद्रसरकारच्या हातात सीबीआय आहे. मग त्यांनी चौकशी करून देखील जाणीवपूर्वक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हे लोकशाहीला घातक आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विरोधक मुद्दा काढतील. प्रतिज्ञापत्र आल्यामुळे त्यांना उत्तर द्यायला जागा राहणार नाही. त्यामुळे ही नौटंकी चालली आहे, असा आरोपही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.