फायरब्रॅन्ड नेते शहाजीबापू नवीन रुपात, आठ दिवसात केले नऊ किलो वजन कमी

फायरब्रॅन्ड नेते शहाजीबापू नवीन रुपात, आठ दिवसात केले नऊ किलो वजन कमी

सोलापूर : राज्यातील सत्तानाट्याच्या वेळी शिंदे गटाचे सांगोल्यातील बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांचा ‘काय झाडी, काय डोंगर’ हा डायलॉग प्रसिद्ध झाला होता. आता त्यांच्या फिटनेसची जोरदार चर्चा होतेय.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी गेलेले बापू दोन दिवसानंतर गायब झाले होते. यानंतर त्यांनी थेट बंगळुरू येथील हॅपिनेस कार्यक्रम गाठला होता. दहा दिवस पंचकर्म उपचार घेतल्यानंतर शिंदे गटाचे फायरब्रँड नेते शहाजीबापू पाटील यांनी तब्बल 9 किलो वजन कमी केले आहे.

24 डिसेंबरपासून शहाजीबापू त्यांचे मित्र महेश पाटील यांच्यासोबत बंगळुरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करण्यासाठी गेले होते. त्यामुळे गेले 8 दिवस विरोधकांवर धडाडणारी ही तोफ शांत होती.

बंगळुरू येथील आश्रमात शहाजीबापू पाटील यांचा दिनक्रम असा होता. पहाटे पाच वाजता उठून रोज दोन तास योगासने, त्यानंतर उकडलेल्या पालेभाज्या, कडधान्ये याचा नाश्ता दुपारी बौद्धिक गोष्टी ऐकणे आणि ध्यानधारणा, वाफेवर उकडलेल्या पालेभाज्या आणि चपातीचे पौष्टिक आणि शुद्ध शाकाहारी भोजन करायचे. दुपारी सुदर्शन प्रक्रिया आणि व्यायाम, संध्याकाळी मेडिटेशन. अशाप्रकारच्या भरगच्च कार्यक्रमात बापूंना श्वास घ्यायलाही उसंत नव्हती.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हा कोर्स पूर्ण झाला. त्यानंतर शहाजीबापू पाटील आज बंगळुरू येथून पुन्हा सांगोल्याकडे परत जाण्यासाठी निघाले आहेत.

या आठ दिवसाच्या कार्यक्रमामुळे शहाजीबापूंचे तब्बल नऊ किलो वजन कमी झाले आहे. त्यामुळे नव्या उत्साहाने बापू महाराष्ट्र गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube