पनीरच्या नावाखाली होणारी फसवणूक आता थांबणार; ‘चीज ॲनालॉग’ वापरल्यास मेन्यूवर स्पष्ट उल्लेख बंधनकारक
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आदेशानुसार, 27 एप्रिल 2026 पासून राज्यभर विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
Fraud in the name of paneer will now stop : हॉटेलमध्ये पनीरच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार आहे. स्वस्त आणि बनावट चीज ॲनालॉग पनीर म्हणून खपवण्यावर लगाम घालवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आदेशानुसार, 27 एप्रिल 2026 पासून राज्यभर विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेनुसार, जर हॉटेल किंवा रेस्टोरंटमध्ये नैसर्गिक पनीरऐवजी चीज ॲनालॉग वापरला जात असेल, तर त्याचा स्पष्ट उल्लेख मेन्यूकार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर करणे आता कायदेशीररित्या बंधनकारक असेल.
या निर्णयाची दखल घेत फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच FSSAI ने देखील 21 एप्रिल 2026 रोजी परिपत्रक काढत हा नियम देशभर लागू केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राने घेतलेला हा निर्णय आता संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. विधानसभा सभागृहात देखील या मुद्द्यावर चर्चा झाली होती. पनीरच्या नावाखाली वनस्पतीजन्य तेलापासून तयार केलेले ॲनालॉग विकले जात असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी मांडल्या होत्या. ग्राहकांची होत असलेली दिशाभूल लक्षात घेऊन सरकारने तातडीने पारदर्शकतेचे आदेश लागू केले.
नवीन नियमांनुसार, प्रत्येक हॉटेल आणि रेस्टोरंटला ग्राहकांना अचूक माहिती देणे बंधनकारक असेल. दुधापासून बनवलेल्या पनीरऐवजी वनस्पतीजन्य घटकांपासून बनवलेले चीज ॲनालॉग वापरल्यास त्याची स्पष्ट नोंद करावी लागेल. 1 मे 2026 पासून या नियमांची कडक अंमलबजावणी होणार असून, माहिती लपवणाऱ्या हॉटेल्सवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. आवश्यक असल्यास त्यांचा परवाना रद्द देखील केला जाऊ शकतो.
प्रकाशकाला धमकी प्रकरणी आमदार गायकवाड मवाळ; पुस्तक प्रकाशक प्रशांत आंबी यांची दिलगिरी व्यक्त
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. ग्राहकांना आपण काय खात आहोत, हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार, चीज ॲनालॉग पुरवठादारांना विक्री बिलावर त्याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. हॉटेल संघटनांशी चर्चा करून सर्व विभागीय अधिकाऱ्यांना काटकोर अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच रेस्टोरंट आणि केटरर्सना बालक मेसेजद्वारे नव्या नियमांची माहिती दिली जात आहे.
पनीर आणि चीज ॲनालॉग यातील फरक देखील महत्वाचा आहे. अन्न सुरक्षा मानकांनुसार पनीर हा फक्त दुधापासून तयार होणार पदार्थ आहे. तर चीज ॲनालॉग हा वनस्पतीजन्य फॅट्स, स्टार्च, इमल्सिफायर यांसारख्या घटकांपासून तयार केला जातो. दिसायला सारखा असला तरी तो पनीर नसतो. ग्राहकांनी देखील जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पदार्थ घेताना त्यावरील लेबल नीट वाचावे आणि ॲनालॉग असा उल्लेख आहे का, ही तपासावे. जर कोणतीही फसवणूक आढळल्यास ग्राहकांनी 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे आता हॉटेलमधील ‘शाही पनीर’ खरोखरच शुद्ध मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.