जेपीसीच्या मागणीवरून शरद पवारांचे घुमजाव! म्हणाले…
Sharad Pawar : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अडाणी यांच्या प्रकरणात जेपीसीची मागणीला विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांनी सातत्याने जेपीसीच्या मागणीला विरोध करत सर्वोच्च न्यायालयाची समितीच कशी याेग्य आहे, अशी भूमिका मांडली होती. मात्र, मंगळवारी एबीपी माझा या खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी आपली भूमिका बदलल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत शरद पवार म्हणतात की, जर आमच्या मित्र पक्षांचा आग्रह असेल तर यापुढे आम्ही जेपीसीच्या मागणीला विरोध करणार नाही.
जेपीसीच्या मागणीला विरोध करणाऱ्या शरद पवार यांनी आपली ही भूमिका आवघ्या चारच दिवसांत बदलली आहे. हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेनं अडाणी समूहावर केलेल्या आरोपांची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससह इतर पक्षांनी केली होती. विरोधी पक्षातील फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळीच भूमिका मांडत जेपीसीची मागणी कशी चुकीची असल्याचे म्हटले होते. मात्र, आता शरद पवार यांनी घुमजाव केले आहे. आमच्या मित्र पक्षांचा आग्रह असेल तर मी जेपीसी चौकशीला विरोध करणार नाही, असे त्यांनी म्हटलेले आहे.
शरद पवार यांचे अडाणी प्रकरणात जेपीसीसंदर्भात सूर बदलले आहेत. शरद पवार म्हणाले की, आमच्या सहकारी मित्र पक्षांना अडाणी प्रकरणात जेपीसी आवश्यक वाटत असेल तर आम्ही यापुढे विरोध करणार नाही. आम्हाला विरोधी पक्षातील सर्व मित्र पक्षामध्ये ऐक्य ठेवायचे आहे. जेपीसी संदर्भात मला जेव्हा माझं मत विचारलं गेलं तेव्हा मी माझं मत मी मांडलं आहे. पण, यापुढे आमच्या सहकारी पक्षांना वाटत असेल तर जेपीसीच्या मागणीला मी विरोध करणार नाही.