Gold and Silver Rate : सोने एक लाख 30 हजारांपर्यंत आले ! चांदीत मोठी घसरण
सोन्याच्या दरात चार दिवसांत 6,110 रुपयांची घसरण झाली आहे. 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्यासह चांदीचे आजचे दर जाणून घ्या.
Gold and Silver Rate : देशातील सराफ बाजारात गुरुवारीही सोने आणि चांदीच्या (Gold and Silver Rate) दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झालीय. अमेरिकन डॉलर मजबूत होणे, अमेरिकेतील सरकारी रोख्यांवरील परतावा (Treasury Yields) वाढल्याने सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅममागे 2,570 रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचा दर 1,30,690 रुपयांवर आला आहे. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे तब्बल 6,110 रुपयांची घसरण झाली आहे. म्हणजेच सोन्याच्या किमतीत सुमारे 4.5 टक्क्यांची घट झाली आहे.
दागिन्यांसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 235 रुपयांनी घसरून 11,980 रुपयांवर आला आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम 192 रुपयांची घट झाली आहे. सध्या 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,802 रुपये आहे. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी चांदीचा दर प्रति ग्रॅम 5 रुपयांनी कमी होऊन 180 रुपयांवर आला आहे. बुधवारी हा दर 185 रुपये होता. म्हणजेच एका दिवसात चांदीच्या किमतीत सुमारे 2.7 टक्क्यांची घट झाली आहे. दिवाळीच्या आठवड्यात चांदीचा दर प्रति किलो जवळपास 2.05 लाख रुपयांपर्यंत होता. मात्र, त्यानंतर चांदीच्या दरात घसरण झाली असून, एक लाख 80 हजारांपर्यंत दर आला आहे.
MCX वर सोने-चांदीचे दर किती?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही सोन्या-चांदीच्या वायदे दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. सकाळच्या व्यवहारात सोन्याचे वायदे 0.78 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,29,440 रुपयांवर व्यवहार करत होते. तर चांदीचे वायदे 0.51 टक्क्यांनी घसरून प्रति किलो 1,60,670 रुपयांवर आले. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.
सोने आणि चांदीच्या दरात घसरण का होत आहे?
अमेरिकेच्या आर्थिक धोरणांमुळे सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याचे संकेत मिळत असल्याने डॉलर अधिक मजबूत झाला आहे. त्याचबरोबर अमेरिकन सरकारी रोख्यांवरील परतावाही वाढला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीऐवजी इतर पर्यायांकडे वळत असल्याचे दिसत आहे. रिद्धिसिद्धी बुलियन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनी याबाबत महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. त्यांच्या मते मजबूत अमेरिकन डॉलर आणि डिसेंबरमध्ये फेडरल रिझर्व्हकडून 25 बेसिस पॉइंट्सची व्याजदरवाढ होण्याची 95.7 टक्के शक्यता आहे. यामुळे सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव कायम आहे. गेल्या दिवसातील मोठ्या विक्रीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांचे जवळपास 400 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.