शेटजी-भटजींचा पक्ष ते ब्राह्मण समाजावर ‘अन्याय’ : भाजपमध्ये ब्राह्मण नेत्याचं महत्व कमी केलं जातंय का?

  • Written By: Published:
शेटजी-भटजींचा पक्ष ते ब्राह्मण समाजावर ‘अन्याय’ : भाजपमध्ये ब्राह्मण नेत्याचं महत्व कमी केलं जातंय का?

सध्या राज्यभरात पुण्यातील पोटनिवडणुकीच्या (Pune Bypoll Election) चर्चा आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर त्या जागेवर जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये टिळक यांच्या घरातील उमेदवार देण्याऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ब्राह्मण समाज नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी तशी प्रतिक्रियाही दिली.

राज्यात साडेतीन टक्के असलेल्या ब्राह्मण समाजाची पुण्यातील कसबा पेठ आणि कोथरुड या दोन मतदार संघात ब्राह्मण समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. कोथरूड मध्ये हे प्रमाण २५%पेक्षा जास्त तर कसबा मतदारसंघात हे प्रमाण १०%पेक्षा जास्त आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांना उमेदवारी नाकारुन चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) उभे राहिले. त्यावेळी देखील ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. 

चिंचवडमध्ये वेगळा तर कसब्यात वेगळा न्याय का ?

पुण्यात जाहीर झालेल्या दोन पोटनिवडणुकीमध्ये भाजपकडून वेगवेगळा निर्णय घेतला आहे. चिंचवड मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. पण कसबा पेठ मतदारसंघात मात्र टिळक यांच्या घरात उमेदवारी न देता रासने यांना संधी दिली आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्यात. 

कसबा पोटनिवडणुकीत भाजपने दिलेल्या उमेदवारीवरून ब्राह्मण समाजात तीव्र नाराजी आहे. तसेच भाजपकडून चिंचवडमध्ये एक न्याय तर कसब्यात दुसरा असे का, हा ब्राह्मण समाजावर अन्याय केल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केला आहे.

दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने त्यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी मिळायला हवी होती. त्यामुळे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आनंद दवे यांनी कसबा पोटनिवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

ब्राह्मण समाजाची नाराजी, पुण्यात बॅनरबाजी

कसबा पोटनिवडणुकीसाठी आज हेमंत रासने हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वीच कसब्यात ‘कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदारसंघ गेला आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार?’ अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागल्याचे दिसताहेत. या बॅनरवर कोणाचंही नाव नाही. कसब्यातील एक जागरूक मतदार इतकेच लिहलंय. पण यामधून ब्राह्मण समाज भाजपवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. 

सध्या भाजपमध्ये किती ब्राह्मण नेते ?

सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असून अतुल भातखळकर, पराग अळवणी, सुधीर गाडगीळ, संजय केळकर हे ब्राह्मण समजातील आमदार आहेत.

तर केंद्रात नितीन गडकरी महाराष्ट्राचा दिल्लीतील मोठा आवाज आहेत. यांच्यासोबत पूनम महाजन, गिरीश बापट, प्रकाश जावडेकर हे ब्राह्मण समजातील खासदार आहेत.

शेठजी-भटजींचा पक्ष ते सर्वसमावेशक प्रतिमा

पूर्वाश्रमीचा जनसंघ आणि नंतर ८० च्या दशकात भाजपची स्थापना झाल्यांनतर पक्षाची ओळखच शेठजी-भटजींचा पक्ष अशी होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातूनच भाजपची मोट बांधली जात होती. राज्यात प्रमोद महाजन यांच्या कार्यकाळात भाजपची सर्वसमावेशक पक्ष अशी प्रतिमा व्हावी आणि बहुजन चेहरा समोर आणण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांचा महाराष्ट्र भाजपचा चेहरा केलं गेलं. त्याचा पक्ष विस्तारासाठी बराच उपयोग झाला.

प्रमोद महाजन यांच्यानंतर राज्यात गेल्या काही वर्षात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांना महत्त्वाची पदे मिळाली. पण मागच्या काही काळात सर्वसमावेशक प्रतिमा तयार करताना राज्यातील ब्राह्मण नेत्यांची अन्याय होत आहे अशी भूमिका ब्राह्मण समाजाकडून घेतली जात आहे.  गेल्या काही वर्षांमध्ये सत्तेमध्ये त्यांचा सहभाग देखील कमी होताना दिसतो आहे.

मागील केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रकाश जावडेकर यांना डच्चू देण्यात आला. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये विनय सहस्त्रबुद्धे यांना राज्यसभेची पुन्हा उमेदवारी न देता ओबीसी समाजातील डॉ. अनिल बोंडे यांना संधी देण्यात आली. राज्यात देवेंद्र फडणवीस नंबर एकचे नेते आहेत. राज्यातील जातिसमीकरने विरोधात असतानाही देवेंद्र फडणवीस यांना आधी मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री अशी जबाबदारी दिली आहे. 

राज्यात सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारातही अनेक वर्षे भाजपमध्ये सक्रिय असलेल्या व प्रदेश सरचिटणीसपद सांभाळलेल्या अतुल भातखळकर यांच्यासारख्या नेत्यांना संधी दिली गेली नाही. 

सर्वसमावेशक प्रतिमा आणि राजकीय फायदा

भाजप सत्तेत आल्यांनतर सत्तेमध्ये सर्व समाजाला स्थान देण्याचा प्रयत्न केला गेला. सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी नव्या लोकांना संधी दिली गेली. सर्व जातीतल्या लोकांना सामावून घेताना ब्राह्मण समाजावर अन्याय होत आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज त्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की पक्षाने टिळक कुटुंबा व्यतिरीक्त उमेदवारी देण्यामागे काही कारणे असू शकतात. त्यांनी काही वेगळा विचार केला असेल. मात्र, याचा अर्थ असा होत नाही की टिळक कुटुंबाला डावलले आहे. पक्ष प्रत्येक कार्यकर्ता, नेत्याचा व्यवस्थित विचार करतोच. ब्राह्मण समाजाने पक्षासाठी खूप काही दिले आहे.

याबाबत भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा चेहरा भाजपने पुढे केला आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ब्राह्मण नेतृत्व खऱ्या अर्थाने राज्याच्या कारभार हाकत आहेत. फडणवीसांनी देखील आपले नेतृत्व सर्वसमावेशक ठेवले आहे. कसब्याचं निर्णय स्थानिक समीकरणातून घेतला आहे. त्याचा ब्राह्मण समाजाच्या प्रश्नांची संबंध जोडणे योग्य नाही. मात्र कोथरूड, सांगली, पार्ले अशा भागात ब्राह्मण समाजाची संख्या जास्त असल्याने तेथे तरी आपल्याला संधी मिळावी असे ब्राह्मण समाजाच्या कार्यकर्त्यांना वाटतं. इतर पक्षात ब्राह्मण कार्यकर्त्याना संधी मिळण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे भाजपशिवाय ब्राह्मण समाजातील कार्यकर्त्यांना पर्याय राहत नाही, आणि त्यातुनच पुन्हा कसबा, कोथरूड सारखा निर्णय झाला तर नाराजी वाढते.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube