हल्ल्यामागे कोरोनातील भ्रष्टाचाराचे मूळ, हल्लेखोर आम्हाला माहिती; संदीप देशपांडेंचे आरोप

हल्ल्यामागे कोरोनातील भ्रष्टाचाराचे मूळ, हल्लेखोर आम्हाला माहिती; संदीप देशपांडेंचे आरोप

मुंबई : माझ्यावर कुणी हल्ला केला हे आम्हाला माहिती आहे. याबाबत पोलिसांना सगळी माहिती दिली आहे. पोलीस याचा तपास करत आहे, ते त्यांना शोधून काढतील. त्यामुळे आता त्यांची नावे मी घेणे योग्य ठरणार नाही. मात्र, कोविड संदर्भात मी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 48 तासांच्या आत ही घटना घडली. कोरोनातील भ्रष्टाचाराचा कदाचित त्यांना सुगावा लागला असेल, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला.

देशपांडे यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्रकार परिषद घेत या हल्ल्याबाबत अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला. ते म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माझी विचारपूस केली. तसेच पोलीस संरक्षणही देऊ केले आहे. मात्र, माझे त्यांना सांगणे आहे की आता आम्हाला संरक्षणाची गरज नाही. तेव्हा आमचे संरक्षण काढून त्यांना संरक्षण द्या.

वाचा : Sandeep Deshpande यांच्यावरील हल्ला प्रकरणी 2 जण ताब्यात; भांडूप परिसरातून क्राईम ब्रांच ची कारवाई

कोरोना (Corona) काळात झालेला भ्रष्टाचार मी दोन दिवसात बाहेर काढणारच होतो. या भ्रष्टाचारात कोणती वीरप्पन गँग आहे हे समोर आणणार होतो. कदाचित याचा त्यांना सुगावा लागला असेल. महावीर फर्निचर आणि ग्रेस फर्निचर या दोन फर्मचा हा घोटाळा होता.

या दोन फर्मचा टर्न ओव्हर कोविड आधीपर्यंत दहा लाख रुपये होता. कोविडनंतर मात्र करोडोत झाला. त्यांना कोविड सेंटरमध्ये गाद्या आणि कॉट पुरवठा करण्याचे कंत्राट दिले. पण, त्यांनी ते कधीच केले नाही. त्यांची बिले मात्र गेली. स्वतःकडे कोणतीही खरेदी नसताना त्या गोष्टी दिल्या गेल्या. या प्रकरणी मी आयुक्तांना भेटून या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली.

Sandeep Deshpande यांचं संजय राऊतांना पत्र, दिला ‘हा’ सल्ला!

या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. त्यांनी दोन लोकांना अटक केल्याचे  प्रसारमाध्यम्यातूनच कळले. पोलिसांना सविस्तर चौकशी करू द्या. आम्हाला माहिती आहे, कोणी हल्ला केला ते. यावर आताच बोलणे योग्य होणार नाही. क्रिकेट खेळायला आले ते क्रिकेटर नव्हे तर त्यांचे कोचही कळतील, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राऊतांचा मेंटल बॅलन्स गेला

संजय राऊत यांचा मेंटल बॅलन्स गेला आहे. त्यामुळे मी पत्र लिहून पण काळजी व्यक्त केली आहे. सतत कोणीतरी हल्ला करेल असं त्यांना वाटतं. मग याला शिव्या घाल आणि त्याला शिव्या घाल हे त्यांचे सुरू असते. जर सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात गेला तर मग ते त्यांना पण शिव्या घालतात असा टोला देशपांडे यांनी हाणला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube