Narayan Patil: पाटलांचा रखडलेला अधिकृत प्रवेश मुख्यमंत्र्यांनी उरकून घेतला
Mahrashtra Politics सोलापूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आपला गट राज्यात मजबूत करताना दिसत आहे. ते माजी आमदार, स्थानिक कार्यकर्ते आपल्या गटात घेत आहेत. आता सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदारसंघातील माजी आमदार नारायण (Narayan Patil) पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृत प्रवेश पक्षात करून घेतला आहे.
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश शिंदे गटात झाला आहे. त्यावेळी करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे ही उपस्थित होते. त्यावेळी त्यांचा प्रवेशही मुख्यमंत्र्यांनी करून घेतला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर नारायण पाटील यांनी मी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असल्याचे म्हटले होते. परंतु जाहीर प्रवेश मात्र केला नव्हता. तरीही नारायण पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या रुपाने मदत केली होती.
आर्थिक अडचणीत असलेल्या करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोने चालविण्यासाठी घेतला होता. परंतु कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखाना भाडेतत्वावर न देण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे पवारांना हा धक्का होता. त्यात हा कारखाना सुरू करण्यासाठी नारायण पाटील यांना एकनाथ शिंदेंकडून मदत झाली. त्यामुळे कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला होता. त्यावेळेच माजी आमदार नारायण पाटील हे शिंदे गटात जातील, असे बोलले होते. आता त्यांचा अधिकृत प्रवेश मुख्यमंत्र्यांना उरकून घेतला आहे.
तानाजी सावंतामुळे विधानसभा उमेदवारीतून पत्ता कट
२०१४ मध्ये नारायण पाटील शिवसेनेकडून निवडून आले होते. पण २०१९ मध्ये शिवसेनेने त्यांचे तिकिट कापले होते. राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश करून विधानसभेचे तिकिट मिळविले होते. आता मंत्री असलेले तानाजी सावंत यांनी बागल यांना पक्षात आणले होते. त्या निवडणुकीत नारायण पाटील यांना ७५ हजार मते होती. शिवसेनेचे अधिकृत पराभूत उमेदवार रश्मी बागल यांच्यापेक्षा २५ हजार मते पाटील यांना जास्त होते. पराभूत झालेले पाटील हे शिवसेनेत कार्यरत होते. त्यांना एकनाथ शिंदे हे मदत करत होते.
पक्षात बंडाळी झाल्यानंतर माजी आमदार नारायण पाटील यांनी प्रथमच शिंदेंना पाठिंबा दिला होता. मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी मला आजही आदर आहे, नारायण पाटील हे म्हणाले होते. आता ते अधिकृतपणे शिंदे यांच्याबरोबर गेले आहेत. त्यामुळे करमाळा विधानसभा मतदारसंघाची राजकारण बदलणार आहे.