अदानींची वीज तयार होते मग, विरोधकांची एकजूट कशी खराब होईल? ; पवारांचा मिश्कील प्रश्न
Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल एका कार्यक्रमात हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानींवर (Gautam Adani) झालेल्या आरोपाप्रकरणी मोठे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषदेत या प्रकरणात जेपीसी ऐवजी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेली समितीच जास्त योग्य असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने अदानींच्या चौकशसाठी जेपीसी नियुक्त करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेससह अन्य पक्षांना मोठा धक्का बसला आहे.
या पत्रकार परिषदेत एका पत्रकारने त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की काल तुम्ही एका कार्यक्रमात अदानींचे कौतुक केले. त्यावर पवार यांनी त्या पत्रकाराला थांबवत म्हटले, ‘कौतुकाचा विषय येतो कुठे ?, अदानींकडून वीज तयार केली जाते. या विजेचा मोठा पुरवठा हा महाराष्ट्रात होतो मग ही राज्याच्या फायद्याची गोष्ट नाही का ?, जे आहे ते आहे.’
त्यानंतर पत्रकाराने यामुळे विरोधकांच्या एकता प्रभावित होत नाही का असे विचारले. त्यावरही पवार यांनी अत्यंत मिश्कील शब्दांत पत्रकारालाच गुगली टाकली. ते म्हणाले, ‘वीज तयार होते त्यातून विरोधकांची एकता कशी खराब होईल ?’ असा प्रश्न केला.
जेपीसीला विरोध नाही पण..
शरद पवार पुढे म्हणाले, ‘माझा जेपीसीला विरोध नाही. मात्र, या समितीत सत्ताधारी पक्षाचेच लोक जास्त असल्याने या चौकाशीतून किती सत्य बाहेर येईल याची शंका आहे. आपल्यासमोर आणखी अत्यंत महत्वाच्या अशा तीन समस्या आहेत. त्या म्हणजे बेरोजगारी, वाढती महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न. या तीनही समस्यांकडे लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आम्ही विरोधक म्हणून या समस्यांकडे जास्त लक्ष केंद्रीत करणार आहोत’, असे पवार म्हणाले.
ते म्हणाले, ‘जेपीसीला मी विरोध करत नाही. मी स्वतः काही जेपीसींचा चेअरमन होतो. पण या समितीची स्थापना बहुमताच्या संख्येवर होणार असल्याने सत्य कितपत बाहेर येईल याची शंका आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांना यात जास्त प्रतिनिधीत्व मिळणार नाही. तसेच जे पक्षांची सदस्य संख्या अत्यंत कमी आहे त्यांचा तर या समितीत विचारही होणार नाही. त्याऐवजी सुप्रीम कोर्टाची समिती योग्य आहे असे माझे मत आहे.’
‘या समितीत निवृत्त न्यायमूर्तींसह अन्य काही लोकांचा समावेश आहे. तसेच न्यायालयाने किती दिवसात अहवाल द्यायचा हेही सांगितले आहे.’ हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर अदानींच्या कंपन्यांतले वीस हजार कोटी कुणाचे हा मुद्दाही चर्चेत आहे. ‘या प्रकरणाची आपल्याला जास्त माहिती नाही. त्यामुळे माहिती घेऊन बोलेन’, असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले.
सावरकरांचा विषय संपला
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरही पवार यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘दिल्लीत बैठक झाली. तेथे विरोधी पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी सुद्धा या बैठकीत उपस्थित होते. या विषयावर मला जे काही सांगायचे ते सांगितले आहे. त्यामुळे आमच्यासाठी आता हा विषय संपला आहे. काही मुद्द्यांवर मतभिन्नता असू शकते. परंतु, यावर मला जे काही सांगायचे होते ते मी या बैठकीत सांगितले.’