Jayant patil : आंबेडकरांच्या ‘त्या’ विधानावरुन राष्ट्रवादी आक्रमक

Jayant patil : आंबेडकरांच्या ‘त्या’ विधानावरुन राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)हे भाजपचेच असल्याचं मोठं विधान वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केल्यानं राष्ट्रवादी कॉंग्रेसनं (NCP)आक्रमक भूमिका घेतली आहे. पवार हे भाजपचेच आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी आंबेडरांना प्रत्युत्तर दिलंय. वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेशी (Shivsena) युती झाली आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीच्या सहभागाबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निषाणा साधलाय.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शरद पवार हे आजही भाजपासोबत आहेत. शरद पवारांवरील प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर सध्या उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा करत असल्यानं विधान करण्याचा अधिकार राखून ठेवतो. पण, अजित पवार (Ajit Pawar) असं कुठं बोलले असतील वाटत नाही. तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पर्याय नसल्याने, ही खेळी असू शकते. मात्र, नंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली काम केलं. राष्ट्रवादीत बंडखोरी झाली नाही. शिवसेनेचे आमदार गेल्यानं सरकार कोसळलं. राष्ट्रवादीनं शिवसेनेला शेवटपर्यंत साथ दिली, असंही जयंत पाटील यांनी सांगितलंय.

काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेची गरज होती, शिवसेनेला नाही, असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. त्याबद्दल जयंत पाटील म्हणाले, शिवसेना आमच्याबरोबर आली कारण त्यांना गरज होती. आम्ही त्यांच्यासोबत गेलो कारण आम्हाला सत्तेची गरज होती. उलटपक्षी भाजपाला रोखण्याचं काम शरद पवारांनी केलं, याचं प्रकाश आंबेडकर कौतुक का करत नाही? प्रकाश आंबेडकर भाजपचे विरोधक असतील, तर त्यांनी शरद पवारांचं स्वागतच करायला हवं होतं, असंही जयंत पाटील म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांची भाजपविषयीची भूमिका नक्की काय आहे? याला मी जास्त महत्व देतो. त्यांचा पवारांना विरोध ही भूमिका जुनीच आहे. मात्र भाजप विरोधात लढण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. महाराष्ट्रात भाजपचा पराभव होऊ शकतो, त्यासाठी सहाय्यभूत व्हायला हवंय, असंही आवाहन जयंत पाटील यांनी केलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube