Pune By-Poll Results 2023 : ‘पक्ष नाही तर मी कमी पडलो’, पराभवानंतर हेमंत रासनेंची प्रतिक्रिया
पुणे : कसबा विधानसभेत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 72599 मतांनी विजयी झाले आहेत. तर भाजपचे हेमंत रासने यांना 61771 मते मिळाली आहेत. रवींद्र धंगेकर या निवडणुकीत विजयी झाले आहेत. धंगेकर यांनी पहिल्या फेरीपासून आपल्या मतांची आघाडी कायम ठेवली होती. रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव सुरु केला आहे. यावर भाजपच्या हेमंत रासने यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या निकालावर मी आत्मपरीक्षण करणार, असे ते म्हणाले आहेत.
कसबा विधानसभा मतदारसंघात पराभवाच्या छायेत असलेले भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी आपला पराभव मान्य करत मी कुठे कमी पडलो, याचे आत्मपरीक्षण करणार असे म्हटले आहे. हा पराभव आपला असल्याचे सांगत या वेळी थेट दुरंगी लढत झाल्याने भाजपला फटका बसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये तिरंगी लढत झाली होती. त्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून येणे सोपे होते. पण पहिल्यांदाच दुरंगी लढत झाली, असे ते म्हणाले.
Kasba By Election : भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर
तसेच या निवडणुकीत पैसे वाटप झाल्याचा आरोप करण्यात आला. ईव्हीएम मशीनवर टीका करण्यात आली. आमच्या नेत्यांनी मला उमेदवार म्हणून संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझ्या पक्षाने पूर्ण ताकद लावली. पण उमेदवार म्हणून मी कमी पडलो, अशी माझी भावना आहे.
दरम्यान पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने निकालाकडे बघताना फारसा उत्साह वाटत नसल्याची प्रतिक्रिया अश्विनी जगताप यांनी दिली आहे. आज साहेबांची खूप आठवण येतेय. निकालाकडे बघितलं तर फार उत्साह नाही. पण लोकांना न्याय द्यावा, त्यांच्या पाठीवर हात फिरवणारं कुणीतरी आपलं असावं, त्यांची कामं वेळच्यावेळी व्हावीत, त्यांना भक्कम आधार देणारं कुणीतरी असावं यासाठी खरंतर मी निवडणुकीसाठी उभी राहिले. ही साहेबांनी केलेल्या कामाची पावती आहे.