महाशक्तीने मुडद्यांमध्ये प्राण फुंकले; संजय राऊतांची घणाघाती टीका
नवी दिल्लीः महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्य, केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. केंद्रातील महाशक्तीने मुडद्यांमध्ये प्राण फुंकून शिंदे-फडणवीस सरकार बनवले असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.
राऊत म्हणाले, महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार आहे. हे सरकार भ्रष्टाचार करत आहे. आमची बाजू न्यायाची आहे. सत्येची आहे. सत्याच्या पलीकडे आम्ही काहीच मागत नाही. एक सरकार पाडण्यात आले. एक पक्ष फोडण्यात आला. पैशाचा वापर करण्यात आला. आमदार पळून नेण्यात आले. त्या आमदारावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगासमोर आहे.
कोर्टात तारखांवर तारखा मिळत आहे. हे घटनाबाह्य सरकार आहे. तरीही हे सरकार मिश्कीलपणे हसत आहे. आमच्यावर कोणतीच कारवाई होऊ शकत नाही. एक महाशक्ती आमच्या पाठीशी असल्यासारखे सरकार वागत असल्याचे राऊत म्हणाले. फेब्रुवारी अखेरपर्यंत या खटल्याचा निकाल लागेल. त्यानंतर हे सरकार पडेल, असा दावाही राऊत यांनी केला आहे.
राहुल गांधी, उर्फी जावेद यांच्या कपड्यावरून वाद घालणाऱ्यांना राऊत यांनी सुनावले आहे. कपड्यावरून, चपलावरून, खाण्यावरून वाद निर्माण करणारे लोक दोष पसरवत आहे. राहुल गांधी यांनी प्रेमासाठी भारत जोडो यात्रा काढली आहे. मी पण पंजाबमध्ये यात्रेत सहभागी होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.