हा तर फसवणुकीचा अमृतकाल ! कॅबिनेट बैठकीवर ठाकरे गटाचा हल्लाबोल

हा तर फसवणुकीचा अमृतकाल ! कॅबिनेट बैठकीवर ठाकरे गटाचा हल्लाबोल

Uddhav Thackeray : छत्रपती संभाजीनगर शहरात आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची मोठी बैठक होत आहे. या बैठकीत मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाच्या औचित्याने अमृत महोत्सवाचे निमित्त साधून ही बैठक होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने राज्य सरकारवर सामनातून टीकेचे बाण सोडले आहेत.

मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीआधी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवून घेतले. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याबाबत त्यांनी सरकारला तीस दिवसांची मुदत दिली असून उपोषण सुटले तरी आंदोलन चालूच राहणार अशी भूमिका घेतली आहे. उपोषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावं असं त्यांनी म्हटलं होतं. पण, दोन उपमुख्यमंत्री गेले नाहीत. संभाजीनगरमधल्या बैठकीत कुठलेच अडथळे नकोत, सरकारी वाहनांवर हल्ले नकोत म्हणून सरकारने वेळ मारून नेली आहे. मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ आहे. मंत्रिमंडळ बैठकीचे सोपस्कार पार पाडले जातात पण हातात काहीच लागत नाही.

मोठी बातमी! आता ‘छत्रपती संभाजीनगर’, ‘धाराशिव’ जिल्हा; शहरांनंतर जिल्ह्यांचेही नामकरण

अमृत महोत्सवाच्या एका सोहळ्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा संभाजीनगरात येणार होते पण, प्रशासनाने कार्यक्रमाची संपूर्ण आखणी केल्यानंतर अचानक शहा यांनी मराठवाड्यात येणे टाळले आहे. मुख्यमंत्री मिंधे काय किंवा केंद्रीय गृहमंत्री शहा काय, शहरात येऊन त्यांनी लोकांच्या तोंडाला पानेच पुसली असती. गेल्या आठ महिन्यात राज्यात दीह हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील 685 शेतकरी फक्त मराठवाड्यातले आहेत. बीड जिल्ह्यात किमान 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सव काळातले हे चित्र विदारक आहे. मोदी हे स्वातंत्र्याचा अमृतकाल त्यांच्या पद्धतीने साजरा करत आहेत. त्यात जनतेसाठी अमृत कमी व फसव्या घोषणांचा विषाचा प्यालाच जास्त आहे. मराठवाड्याच्या बाबतीत त्यापेक्षा वेगळं काय आहे. त्याच घोषणा आणि तीच फसवणूक, अशी जळजळीत टीका ठाकरे गटाने केली आहे.

फडणवीसांच्या घोषणांचं काय झालं ?

फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी घोषणांची बरसात केली. आता बेकायदेशीर मुख्यमंत्री श्रीमान मिंधे तेच करतील. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2016 मध्ये त्यांनी संभाजीनगरात मंत्रिमंडळात बैठक घेऊन साधारण 50 हजार कोटींच्या घोषणा केल्या होत्या. त्या घोषणांचं काय झालं, असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube