दोस्तीची ताकद, जुन्या आठवणींना उजाळा देताना बापट-नांदगावकरांचे डोळे पाणावले

दोस्तीची ताकद, जुन्या आठवणींना उजाळा देताना बापट-नांदगावकरांचे डोळे पाणावले

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट (Girish Bapat) मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी गिरीश बापटांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. एकमेकांना भेटून जुन्या आठवणींना उजाळा देताना दोघांचेही डोळे पाणावले, असे बाळा नांदगावकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

बाळा नांदगावकर लिहितात, पुण्याचे खासदार आणि माझे अत्यंत जवळचे मित्र खासदार गिरीश बापट म्हणजे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. आम्ही 20 वर्षे विधानसभेत एकत्र काम करतांना एकदम पक्के मित्र झालो. गिरीश भाऊंची तब्येत मागील अनेक महिन्यांपासून नरम आहे. तसेही पुण्यात आल्यावर जमेल तेव्हा भाऊंना भेटतच असतो.

यावेळी सुद्धा पुणे दौऱ्यावर असताना गिरीश भाऊंची मनसोक्त भेट झाली. एकमेकांना भेटून जुन्या आठवणींना उजाळा देताना दोघांचेही डोळे पाणावले. सध्या जेव्हा राजकारणाचा स्तर अतिशय खालावला असताना गिरीश भाऊंच्या पक्षनिष्ठेला तोडच नाही. गप्पा दरम्यान भाऊंच्या मनात त्यांच्या पक्षाबद्दल असलेली भावना बघून गिरीश भाऊ बद्दल असलेला आदर अजूनच वाढला, असे नांदगावकर यांनी म्हटले आहे.

फक्त शहराचच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर

ते पुढं लिहितात, पक्ष मला काय देईल हा विचार करणाऱ्या गर्दीत मी पक्षाला काय देऊ शकतो असा विचार करणारे गिरीश भाऊ म्हणजे अद्भुत रसायन. लढवय्या असलेले गिरीश भाऊ या दुखण्याला ही हारवून पुन्हा एकदा स्वस्थ होवो हीच सगळ्यांची सदिच्छा.

दरम्यान, गिरीश बापट यांची प्रकृती खराब असतानाही ते पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते. यावेळी भाजपवर मोठी टीका देखील झाली होती. रविवारी कसबा पोटनिवडणुकीत नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हिल चेअरवर असतानाही आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गिरीश बापट आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube