डी. वाय. पाटील महाविद्यालयात ICEC2NT-2026 आंतरराष्ट्रीय परिषद; विदेशातील संशोधकांचा सहभाग
पुण्यातील आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये दोन दिवसीय ICEC2NT-2026 आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली.
Pune News : इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटिंग, कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि ऑटोमेशन तंत्रज्ञानातील अत्याधुनिक संशोधनाला व्यासपीठ उपलब्ध करून देणारी IEEE International Conference on Electronics, Computing, Communication and Networking Automation Technologies (ICEC2NT-2026) ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डी येथे ३ व ४ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडली. परिषदेत देश-विदेशातील संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग नोंदविला.
परिषदेत ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने तब्बल २८७ संशोधन निबंधांचे सादरीकरण करण्यात आले. भारतातील २९ राज्यांमधील विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधकांसह विविध NITs आणि नामांकित संस्थांमधील संशोधकांनी सहभाग घेतला. तसेच अमेरिका, ब्रिटन, इराक आणि सौदी अरेबियातील संशोधकांनीही आपले संशोधन सादर केले. या परिषदेसाठी ३०० हून अधिक ज्येष्ठ प्राध्यापक व उद्योगतज्ज्ञांनी पेपर रिव्ह्यू कमिटीमध्ये योगदान दिले.
संत गजानन महाराजांच्या आशीर्वादाचे स्मरण करून वंदे मातरमने परिषदेची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. पी. मालती यांनी उपस्थित मान्यवर, संशोधक व सहभागींचे स्वागत केले. संशोधन व विकासाच्या क्षेत्रात संस्थेकडून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देताना त्यांनी उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील परस्पर सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
परिषदेच्या उद्घाटनपर मनोगतात डॉ. रुतुजा देशमुख यांनी इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटिंग, कम्युनिकेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन या क्षेत्रातील वेगाने होत असलेल्या बदलांवर प्रकाश टाकला. संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना नवीन कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी ICEC2NT-2026 हे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले.
परिषदेचे प्रमुख पाहुणे डॉ. मनीष बाली, वरिष्ठ संचालक व प्रमुख, Semiconductor and AI CoE, UST Global, Bengaluru यांनी विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण कल्पना आणि संशोधनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात “Innovation” ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेचा संदर्भ देत देशांतर्गत तंत्रज्ञान विकासावर त्यांनी भर दिला. इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटिंग, कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि ऑटोमेशन यांचा समन्वय हा समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
परिषदेचे सन्माननीय अतिथी मयूर कौलावकर, Head–India Operations, Tenstorrent Inc., Bengaluru यांनी “Reimagining SoC Design for the AI Era” या विषयावर मार्गदर्शन केले. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे चिप आर्किटेक्चरमध्ये होत असलेल्या आमूलाग्र बदलांची त्यांनी माहिती दिली. भविष्यातील AI प्रणालींसाठी अधिक कार्यक्षम, ऊर्जा-बचत करणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर विस्तारक्षम Systems-on-Chip (SoCs) विकसित करण्यासाठी हार्डवेअर-सॉफ्टवेअरच्या समन्वित रचनेची गरज त्यांनी अधोरेखित केली.
परिषदेत विविध विषयांवर मान्यवर तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने झाली. अमेरिकेतील University of South Florida चे प्रा. भुवन उनेलकर यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानातील वेगवान बदलांचा आढावा घेतला. विविध क्षेत्रांतील समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी नावीन्यपूर्ण विचार, आंतरविद्याशाखीय सहकार्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
University of Wales, UK चे प्रा. एझेंडू अरिवा यांनी कम्युनिकेशन आणि कॉम्प्युटिंग क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची वाढती भूमिका स्पष्ट केली. AI-आधारित उपाययोजना, बुद्धिमान नेटवर्क्स आणि डेटा-केंद्रित तंत्रज्ञानामुळे भविष्यात अधिक वेगवान, स्मार्ट आणि विश्वासार्ह प्रणाली विकसित होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फिलिप्स इंडिया लिमिटेड, पुणेचे R&D संचालक आशिष शाह यांनी ऑटोमेशन तंत्रज्ञानाच्या वाढत्या महत्त्वावर भाष्य केले. कार्यक्षमता, अचूकता आणि विस्तारक्षमता वाढविण्यासाठी बुद्धिमान ऑटोमेशन, एम्बेडेड सिस्टिम्स आणि प्रगत कॉम्प्युटिंगची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. भविष्यातील उद्योग अधिक स्मार्ट आणि शाश्वत बनविण्यासाठी या तंत्रज्ञानांचा प्रभावी वापर आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
IEEE Pune Section चे चेअर डॉ. अमर बुचाडे यांनी ICEC2NTच्या दुसऱ्या आवृत्तीला IEEE Pune Section कडून मिळालेल्या सहकार्याचा उल्लेख केला. Industry 5.0 हे औद्योगिक परिवर्तनाचे पुढील पर्व असून या बदलासाठी सर्वांनी सज्ज राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच २०२७ मध्ये होणाऱ्या ICEC2NTच्या तिसऱ्या आवृत्तीसाठीही प्रायोजकत्वाचे सहकार्य कायम ठेवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कॅम्पस संचालक रिअर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांनी या परिषदेचा विशेष फायदा कोअर इंजिनिअरिंग शाखांतील विद्यार्थ्यांना झाल्याचे सांगितले. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, AI & Data Science तसेच AI & Machine Learning या क्षेत्रांतील आधुनिक तंत्रज्ञान आणि त्याच्या अनुप्रयोगांची माहिती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतेज पाटील, आकुर्डी कॅम्पस विश्वस्त तेजस पाटील, सौ. स्नेहा तेजस पाटील, संचालिका (ऑपरेशन्स) रिअर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त), कॅम्पस संचालक, डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्स; तसेच अभिजित खुरपे, सचिव, IEEE पुणे विभाग. यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती तृप्ती वाघ, Institute IEEE Coordinator यांनी केले. परिषदेच्या आयोजनात डॉ. प्रीती पाटील यांनी Co-Convener म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली, तर डॉ. बी. बी. मुसमाडे, Convener यांनी आभार प्रदर्शन केले.
दोन दिवस चाललेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप ज्ञानाची देवाणघेवाण, संशोधन सहकार्य आणि उद्योग-शैक्षणिक क्षेत्रातील संवाद अधिक दृढ करण्याच्या सकारात्मक वातावरणात झाला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात नावीन्यपूर्ण संशोधन आणि उद्योग-अकादमी सहकार्याच्या माध्यमातून भविष्यातील तंत्रज्ञानाला दिशा देण्याचा संदेश ICEC2NT-२०२६ने दिला.