परीक्षांमध्ये गैरप्रकार थांबता थांबेना! पुणे मनपाच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत थेट चष्म्यात छुपा कॅमेरा 6 जणांवर गुन्हा

Malpractice in PMC's Junior Engineer exam गेल्या काही महिन्यांपासून विविध परीक्षामध्ये गैरप्रकार केल्याची प्रकरणं वारंवार समोर येत आहेत.

Malpractice In PMC's Junior Engineer Exam

Malpractice in Pune Municipal Corporation’s Junior Engineer exam A hidden camera was found inside a pair of glasses : गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह देशामध्ये विविध परीक्षांचे पेपर फुटणे त्याचबरोबरवर परीक्षामध्ये गैरप्रकार केल्याची प्रकरणं वारंवार समोर येत आहेत. त्यात नीट, एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षांनंतर आता पुणे मनपाच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत देखील असाल गैरप्रकार केल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणी सहा जणांविरूद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुणे महापालिकेने कनिष्ठ अभियंता पदाच्या तब्बल 169 रिक्त जागांसाठी 2024 मध्ये भरती प्रक्रिया जाहीर केली होती. एप्रिल 2026 मध्ये परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या सात शहरांमधील परीक्षा केंद्रांवर पार पडली. 22, 23 आणि 29 एप्रिल या तीन दिवशी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेला विविध शहरांमधून 22 हजारांपेक्षा जास्त उमेदवारांनी हजेरी लावली होती. मात्र, परीक्षा झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेशी संबंधित मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पुणे महापालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. परीक्षा आयोजनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या टीसीएस (TCS) आणि आयबीपीएस (IBPS) या संस्थांकडे महापालिकेच्या वतीने तक्रार नोंदवण्यात आली.

गैरप्रकार कसा केला?

पुणे महापालिकेच्या तक्रारीनंतर IBPS कडून परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा येथील परीक्षा केंद्रात तीन उमेदवारांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे दिसले. या तिघांनी वापरलेल्या चष्म्यांमध्ये गुप्त कॅमेरे बसवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.परीक्षा सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या सुमारे अर्ध्या तासात या उमेदवारांनी प्रश्न सोडवण्याऐवजी वेळ घालवल्याचे फुटेजमध्ये दिसून आले.

डॉ. रुपनवर मृत्यू प्रकरणात माजी मंत्र्यांच्या PAचं कनेक्शन? रोहित पवारांची कठोर कारवाईची मागणी

त्यानंतर चष्म्यातील कथित गुप्त कॅमेऱ्याच्या मदतीने प्रश्नपत्रिकेची छायाचित्रे टिपण्यात आल्याचे तपासात समोर आले.यानंतर तिघेही बाथरूमला जाण्याचे कारण सांगून परीक्षा कक्षाबाहेर गेले. बाथरूममध्ये त्यांना मोबाईल फोन उपलब्ध करून देण्यात आला होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. त्या मोबाईलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकेतील माहिती बाहेर पाठवण्यात आल्याचा संशय आहे. काही काळ बाहेर राहिल्यानंतर हे तिघे पुन्हा परीक्षा कक्षात परतले आणि त्यांनी प्रश्नपत्रिका सोडवण्यास सुरुवात केली.

तीन विद्यार्थ्यांसह सहा जणांवर गुन्हा दाखल…

या प्रकरणात तीन परीक्षार्थींसह त्यांना मदत केल्याच्या संशयावरून टीसीएसच्या दोन कर्मचाऱ्यांवर आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन पाचे, शिवशंकर शेळगावे आणि विष्णूकांत वाघमारे अशी संशयित तीन उमेदवारांची नावे आहेत. विशेष म्हणजे, या तिघांनी परीक्षेत ९० हून अधिक गुण मिळवले असून कनिष्ठ अभियंता पदासाठी त्यांची निवड झाल्याची माहिती समोर आली आहे. तपासात टीसीएस कंपनीत इलेक्ट्रिशियन म्हणून कार्यरत असलेला योगेश राठोड आणि परीक्षा केंद्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असलेला विकास गायकवाड यांनी या गैरप्रकारात मदत केल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित पाच जणांसह एका अज्ञात व्यक्तीविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुणे महापालिकेचा संपूर्ण परीक्षा रद्द करण्यास नकार

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे महापालिकेने संपूर्ण कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा रद्द करण्यास नकार दिला आहे. महापालिकेच्या भूमिकेनुसार, आतापर्यंतच्या तपासात केवळ तीन उमेदवारांचा या गैरप्रकारात थेट सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण परीक्षेवर परिणाम झाल्याचे मानण्यास प्रशासनाने नकार दिला आहे.दुसरीकडे, परीक्षा दिलेल्या शंभरहून अधिक अभियंता उमेदवारांनी या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. हा गैरप्रकार केवळ तीन विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नसून यात आणखी व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता असल्याचा दावा उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

follow us