पुणे, पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेवकांच्या डोक्याची मंडई; म्हणतात, लोकसभेनंतर बघू…
विष्णू सानप
पुणे : ओबीसी आरक्षण तथा अन्य कारणाने महानगरपालिका निवडणुका (Municipal elections) प्रलंबित आहेत. त्यातच या निवडणुका संदर्भातील सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) सुनावणी लांबणीवर पडत असल्याने माजी नगरसेवक तथा इच्छुकांचा मोठा हिरमोड होत आहे.
दरम्यान, राज्यातील नवीन आघाड्या आणि युती यांनी त्यात आणखीनच भर घातल्याने दिवसेंदिवस बदलत असलेली राजकीय समीकरणांमुळं सर्वच पक्षांचे माजी नगरसेवक तथा इच्छुक संभ्रमावस्थेत पडले. निवडणूक लागल्यास कुठला पक्ष आणि उमेदवाराच्या विरोधात लढावं लागेल या विचाराने त्यांच्या डोक्याची मंडई झाल्याचं ही मंडळी खाजगीत बोलताना सांगतात.
संपूर्ण राज्यातील परिस्थिती पाहिली तर सारखीच आहे. मात्र पुणे,पिंपरी-चिंचवड महापालिकेचं पाहायचं झाल्यास सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक नेते टेन्शनमध्ये आहेत. याचं कारण असं की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत असते. मात्र, शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीमध्येही दोन गट पाडल्याने आणि अजित पवारांनी भाजप सोबत युती केल्याने पक्षातील स्थानिक नेत्यांची मात्र चांगलीच गोची झाली आहे.
अजितदादांचा स्वभाव दादागिरीचा, मलाईच्या वाटणीत गडबडी; नाना पटोलेंचा हल्लाबोल
शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गट तर राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजित पवार गट झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या फुटीचा मोठा परिणाम या दोन्ही शहरावर पडलेला पाहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवडमधील सर्वच 36 तर पुण्यातील 80 टक्के माजी नगरसेवक हे अजित पवार गटात सामील झाल्याचा दावा केला जात आहे. यामुळे भाजपसह राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्यांपुढे आगामी पालिका निवडणुकीत जागा वाटपाचा मोठा पेच निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपची आज घडीला राज्यात युती आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच युतीच्या फॉर्मुल्याने लढवायच्या झाल्यास स्थानिक नेत्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता 2017 उलथवून भाजप सत्तेत आली होती. त्यामुळे या दोन्ही शहरात भाजप आपली ताकद बाळगून आहे, तर राष्ट्रवादीची देखील कमी-अधिक प्रमाणात तितकीच ताकत असल्याने दोन्हीही पक्षांमध्ये जागा वाटपावरून संघर्ष होवू शकतो. नेमके हेच स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक तथा इच्छुकांच्या चिंतेचं कारण आहे.
दरम्यान, निवडणुका लागल्या तर जागा वाटपाचा तिढा कसा सोडवणार?, असा सवाल भाजपसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना केल्यास ते ‘वेट अँड वॉच’ सांगत असून लोकसभा निवडणूक होऊ द्या त्यानंतर पाहा, असाच सूर सगळेजण आवळत आहेत. त्यानंतर काय होईल तर (नाव न सांगण्याच्या अटीवर) त्यांच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदे, अजित पवार गट आणि भाजपची युती लोकसभेपर्यंत टिकेल त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व विधानसभा निवडणुकीत हे स्वतंत्र लढतील, असा अंदाज त्यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये काय आहे राजकीय परिस्थिती
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची ताकद जवळपास तुल्यबळ आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर देखील या दोन्ही शहरावर अजित पवार गटाचा वरचष्मा पाहायला मिळतो. त्यातही पिंपरी-चिंचवडमध्ये तर सर्व नगरसेवक तथा पदाधिकारी अजित पवारांसोबत आहेत. तर दुसरीकडे आमदार महेश लांडगे आणि शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यामुळे भाजपही भक्कम आहे. त्यामुळे विरोधक कमकुवत असूनही या दोन्ही गटातच जागा वाटपावरून तू तू मै मै होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे पुण्यातही अजित पवार गट मजबूत आहे. मात्र शरद पवार गटाकडे अजूनही काही नगरसेवक आणि एकसंघ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काही माजी नगरसेवक तथा पदाधिकारी असल्याने भाजप सह अजित पवार गटाला ते टक्कर देऊ शकतात. मात्र, इथे देखील तोच जागा वाटपाचा प्रश्न आणि पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या स्थानिक नेत्यांमध्ये कशी दिलजमाई करायची हा मोठा प्रश्न आहे. आता राज्य पातळीवरील महायुती महापालिका निवडणुकीपर्यंत टिकेल का आणि टिकली तर जागा वाटपाचा तिढा कसा सोडला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे