‘MH-12’ची गोष्ट आता शेवटाकडे, पुणेकरांसाठी भावनिक क्षण…नेमकं काय बदलणार समजून घ्या…
Pune RTO MH 12 Series पुण्याची ओळख म्हटलं की शनिवारवाडा, विद्येचं माहेरघर, मिसळ... आणि रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांवरील 'MH-12' हा नंबर
Pune RTO MH 12 Registration Series Ending Soon : पुण्याची ओळख म्हटलं की शनिवारवाडा, विद्येचं माहेरघर, मिसळ… आणि रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांवरील ‘MH-12’ हा नंबर होय. पण, काही गोष्टी या केवळ आकडे किंवा अक्षरे नसतात… त्या शहराची ओळख असतात. पुण्याच्या बाबतीत असाच एक नंबर म्हणजे ‘MH-12’. महाराष्ट्रात कुठेही ‘MH-12’ नंबरची गाडी दिसली की समोरच्याच्या तोंडून सहज शब्द बाहेर पडतात, “अरे, पुण्याची गाडी!” पण आता हीच ओळख बदलण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे.
पुणेकरांच्या अस्मितेचा भाग बनलेली ‘MH-12’ नंबर मालिका आता संपत आली आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत पुण्यात नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांसाठी पूर्णपणे नवीन नंबर प्रणाली लागू होण्याची शक्यता आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) त्यासाठी तयारी करत असून राज्य परिवहन विभागाकडे प्रस्तावही पाठवण्यात आला आहे.
‘MH-12’ची ओळख आता शेवटच्या टप्प्यात
सध्या दुचाकींसाठी ZY आणि चारचाकींसाठी ZW ही मालिका सुरू आहे. नियमानुसार ZZ ही शेवटची दोन अक्षरी मालिका पूर्ण झाल्यानंतर विद्यमान नंबर प्रणाली संपणार आहे. दुचाकींची मालिका काही दिवसांत संपण्याची शक्यता आहे, तर चारचाकींची मालिका पुढील दोन महिन्यांत संपेल, असा अंदाज आहे. याचा अर्थ, अनेक वर्षे पुण्याच्या रस्त्यांवर दिसणारी परिचित नंबर देण्याची पद्धत आता बदलणार आहे.
नवीन नंबर कसे असतील?
नव्या मालिकेसाठी आरटीओने दोन पर्याय तयार केले आहेत. यात पहिला पर्याय म्हणजे MH-12-AAA-1234 अशा तीन इंग्रजी अक्षरांच्या मालिकेचा. मात्र, नंबर लांब झाल्यामुळे सीसीटीव्ही आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (ANPR) प्रणालीला नंबर वाचण्यात अडचणी येऊ शकतात. तर, दुसरा पर्याय म्हणजे अक्षरे आणि अंक यांचे मिश्रण असलेली अल्फान्यूमेरिक मालिका. मात्र, हा पर्याय स्वीकारण्यासाठी ‘वाहन’ प्रणालीसह संपूर्ण डिजिटल यंत्रणेत बदल करावे लागणार असल्याने अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे.
बदल फक्त नंबरचा नाही, आठवणींचाही…
पुण्यात अनेकांच्या आयुष्यातील पहिली दुचाकी, पहिली कार, लग्नानंतर घेतलेलं पहिलं वाहन, व्यवसायासाठी घेतलेला पहिला ट्रक… या सगळ्यांवर एकच ओळख होती – MH-12. हा नंबर म्हणजे पुण्याचा एक ब्रँड बनला. बाहेरगावी गेल्यावर ‘MH-12’ पाहून पुणेकर एकमेकांना ओळखू लागले. अनेकांनी तर, आवडीचा किंवा खास नंबर मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. पण, आज शहरात वाहनांची संख्या एवढी वाढली आहे की, तीच ‘MH-12’ मालिका आता संपण्याच्या टप्प्यावर पोहोचली आहे. हा बदल तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असला, तरी अनेक पुणेकरांसाठी तो भावनिक आहे.
कारण ‘MH-12’ हा फक्त वाहन क्रमांक नाही… तो पुण्याची ओळख आहे, पुणेकरांच्या अभिमानाचा भाग आहे आणि अनेक आठवणींशी जोडलेली एक कायमची खूण आहे. आता नंबर बदलतील, मालिका बदलेल… पण ‘MH-12’ हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर उभं राहिल ते कायम पुणेच…