स्वातंत्र्यवीर सावरकरांवर येणार व्हर्च्युअल चित्रपट, क्राउड फंडिंगच्या माध्यमातून निर्मिती
पुणे – तंत्रज्ञान अतिशय पुढे जात असताना व्हर्च्युअल रियालिटी ( VR) तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिल्या चित्रपटाची निर्मिती पुणेकर करत असून हा चित्रपट स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांचा ऐतिहासिक चारित्रपट असणार आहे, अशी माहिती सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संचालक संतोष रासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण (Yogesh Soman) म्हणाले, सावरकर यांच्या जीवनावरील या ४५ मिनिटांच्या व्हर्चुअल रिअल चित्रपटात स्वा. विनायक दामोदर सावरकर यांना दोन जन्मठेपांची शिक्षा झाली होती पैकी १९११ ते १९२१ या काळात सावरकर पोर्ट ब्लेअर वरील सेल्युलर जेल येथे बंदीवासात होते. सेल्युलर जेलमध्ये सावरकर बंधूंनी अनन्वित अत्याचार सहन केले, त्याशिवाय सावरकरांनी राजबद्यांची क्रांतिकारकांची संघटना बांधली, साक्षरतेचा प्रसार केला, हिंदू शुद्धीकरणाची मोहीम राबवली, इतकंच नाही तर पहिल्या महायुद्धाच्या काळात युरोपातील अभिनव भारतच्या क्रांतिकारकांनी सावरकरांची मुक्तता करण्यासाठी एमडेन नावाची युद्ध नौका धाडली होती. त्या सुमारास सावरकरांनी मार्सेलीस सारखा निसटण्याचा प्रयत्न केला असेल का? हे सगळं चित्रण आमच्या या ४५ मिनिटांच्या चित्रपटात बघायला मिळेल.
‘राणे साहेब मुख्यमंत्री झाले आपण कायम भावी’, Nitesh Rane यांचा अजित पवारांवर पलटवार
यावेळी बोलताना संतोष रासकर म्हणाले, मनोरंजनाच्या क्षेत्रात आज आमूलाग्र बदल झाला आहे. सध्याच्या काळात व्हर्च्युअल रियालिटी आणि मेटावर्स ही शब्द आपण ऐकतो आहोत. वास्तवाचा आभास निर्माण करू शकणाऱ्या व्हर्च्युअल रियालिटी तंत्रदणायच्या मदतीने जगात काही चित्रपट निर्माण करण्यात आले आहेत. VR तंत्रज्ञानावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या हेडसेट बॉक्सची गरज असते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांची जगाला ओळख करून देताना आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. सृजन निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन योगेश सोमण करणार आहेत. प्रसिद्ध अॅनिमेटर चंद्रकांत पाटील या चित्रपटाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक असणार आहेत तर रवी बारापत्रे, बाळू काटे, संतोष जाधव, उमेश कोकाटे आणि अंशूल रासकर या चित्रपटाची तांत्रिक बाजू सांभाळणार आहेत. रिलायन्स अनिमेशन स्टुडिओचे कलाकार देखील या मध्ये सहकार्य करणार आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील या चित्रपटाच्या निर्मिती मध्ये अॅनिमेशन क्षेत्रातील अनुभवी कलाकारा सोबत सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे विद्यार्थी सहभागी आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी मोठा खर्च असून त्यासाठी एका ट्रस्टच्या माध्यमातून क्राउड फंडिंग (निधी) उभारण्यात येणार आहे, त्यामध्ये नागरिकांनी, सावरकरप्रेमींनी आपले योगदान द्यावे असे आवाहन संतोष रासकर यांनी याप्रसंगी केले.
या प्रसंगी प्रसिद्ध अभिनेते आणि या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण, तेजोनिधी भंडारे (सीईओ -रिलाइन्स अॅनिमेशन ), अमित नाडकर्णी – (उपाध्यक्ष सृजन विद्याव्रत), बाळू काटे(स्टोरी बोर्डिंग आर्टिस्ट), रवी बारापत्रे(टेक्निकल दिग्दर्शक) आदी मान्यवर उपस्थित होते.