अक्षय खन्ना – राखेतून पुन्हा तेजाने उठणारा ‘धुरंधर’ कलाकार…
Akshaye Khanna हा प्रतिभावान, लोकप्रिय अभिनेता काही काळ पडद्यापासून दूर राहिला. आज पुन्हा त्याच्या ‘धुरंधर’ अवताराने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं.
अमित भंडारी, डिजीटल सीईओ सोहम ग्रुप
पदार्पण चमकदार, पण करिअरला लागला ब्रेक आणि मग नवी इनिंग बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांची कारकीर्द सुरुवातीपासूनच भरधाव राहते, तर काहींची गाडी एखाद्या टप्प्यावर येऊन अडखळते. अक्षय खन्ना हा दुसऱ्या प्रकारचा कलाकार—प्रतिभावान, लोकप्रिय, पण काही काळ पडद्यापासून दूर राहिलेला. पण, आज पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे, आणि त्याच्या नवीन ‘धुरंधर’ अवताराने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे…
‘धुरंधर’चा रहमान डकैत – लोकप्रियतेचं नवं शिखर
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाने साकारलेला रहमान डकैत हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या भूमिकांपैकी एक ठरत आहे. त्याची बॉडी लँग्वेज, संवादफेक, नृत्य आणि पडद्यावरची उपस्थिती—या सगळ्याने प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर त्याच्या परफॉर्मन्सवर आधारित रील्स व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, या भूमिकेमुळे प्रेक्षकांनी पुन्हा एकदा त्याच्या ‘छावा’ मधील औरंगजेबची भूमिका आणि नॉस्टॅल्जिक होऊन प्रेक्षक त्याचा भरभरून कौतुक करत आहेत…
कामाच्या शोधातली संघर्षमय वर्ष
अक्षयच्या करिअरमध्ये 2011 ते 2016 हा काळ खूप कठीण होता. ‘दिल चाहता है’, ‘हमराज’, ‘नकाब’सारख्या दमदार सिनेमांनंतरही त्याला योग्य काम मिळेनासं झालं. 2016 मध्ये आलेला ‘ढिशूम’ हा त्याचा पुनरागमनाचा प्रयत्न अपेक्षित यश मिळवू शकला नाही. अभिनयाची जाण असलेल्या कलाकाराला कामासाठी संघर्ष करावा लागणं हा इंडस्ट्रीचा कनिष्ठ चेहरा आहे आणि अक्षयही त्याला अपवाद नव्हता.
घराणेशाहीच्या चर्चा, पण मेहनतीला पर्याय नाही…
विनोद खन्ना यांच्या मुलगा म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळणं सोपं होतं; पण टिकून राहणं अक्षयने स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर साधलं. माधुरी दीक्षित, मनीषा कोईराला, उर्मिला मातोंडकर, करीना कपूर अशा नामांकित अभिनेत्रींसोबत समतोल राखत प्रमुख भूमिका साकारण्याचं श्रेय अक्षयच्या अभिनयगुणांना जातं.
“लूक”पेक्षा अभिनय अन् मोजावी लागलेली किंमत
बॉलिवूडमध्ये ‘लूक’ ला जे महत्त्व दिलं जातं, ते अक्षयला कधीच पटलेलं नव्हतं. टक्कल झाकण्यासाठी पॅच वापरणं असो किंवा कृत्रिम मेकओव्हर—या गोष्टींपेक्षा त्याने पात्राची प्रामाणिकता महत्त्वाची मानली. काही भूमिका गमावल्या, काही निर्माते संकोचले—पण अभिनयाची धार मात्र कधी बोथट झाली नाही. अखेर, खरं सोनं उजळूनच निघतं, आणि अक्षयच्या बाबतीत ते अचूक ठरलं…
दुसरी इनिंग : व्यक्तिरेखांना ‘अक्षय टच’
अक्षयने गेल्या काही वर्षांत केलेल्या भूमिका त्याच्या दुसऱ्या इनिंगची ओळख बनल्या. ‘सेक्शन 375’ – कायद्याचा मुखवटा पांघरलेला पण निर्दयी वकील, ‘दृश्यम 2’ – तपासात माहिर, तब्बूच्या खलनायकीला तोडीस तोड भूमिका, ‘छावा’ – औरंगजेबच्या भूमिकेत भय आणि घृणा एकाचवेळी जागवणारा परफॉर्मर, ‘धुरंधर’ – करिष्मा, थरार आणि नृत्य कौशल्याचा संगम असलेला रहमान डकैत, या सर्व भूमिकांनी सिद्ध केलं की अक्षय हा केवळ अभिनेता नाही, तर व्यक्तिरेखेत विरघळून जाण्याची क्षमता असलेला कलाकार आहे.
सोशल मीडिया – नवीन पिढीपर्यंत पोहोचण्याचा पूल
आज अक्षयची जुन्या चित्रपटातील गाणी पुन्हा चर्चेत आहेत. ‘कोई कहे’, ‘बरदाश्त नहीं कर सकता’, ‘एक दिन तेरी राहों में’, ‘ओ बेबी डोन्ट ब्रेक माय हार्ट’—या गाण्यांवर आजच्या तरुण इन्फ्लुएन्सर्सनी रील्स बनवायला सुरुवात केली आहे. ज्याला कधीकाळी काम मिळत नव्हतं, तोच कलाकार … त्याचं यश आज सर्वत्र साजरं केलं जात आहे. सोशल मीडिया वरील रील याची साक्ष देतात…
आगामी काळ – दृढ सातत्याची गरज
अक्षय सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ‘दृश्यम 3’सारखा महत्त्वाचा प्रोजेक्ट त्याच्या हातात आहे. पहिल्या इनिंगमध्ये ज्या चुका झाल्या—दीर्घ विश्रांती, निवडक भूमिकांशी दुरावा—त्या टाळणं आता गरजेचं आहे. कारण, प्रेक्षक त्याच्यावर पुन्हा प्रेम करत आहेत… आणि एखाद्या जातिवंत कलावंताला आणखी काय हवं असतं…
