Samarth Panel : ‘समर्थ पॅनल’ कडून मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी आराखडा
Samarth Panel : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील
Samarth Panel : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील ‘समर्थ पॅनल’ने पत्रकार परिषदेत मराठी चित्रपटसृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी आपला दृष्टीकोन आणि विविध महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या. पत्रकार परिषदेला बिनविरोध निवड झालेले ज्येष्ठ पार्श्वगायक आनंद शिंदे, संकलक विजय खोचीकर यांच्यासह अभिनेते सुशांत शेलार, दीपक कदम, चैत्राली डोंगरे, सुभाष नकाशे, राज काझी, गणेश गारगोटे, अजित शिरोळे, सुनील महाजन आणि प्रवीण पाटील हे उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. या सर्वांनी ‘समर्थ पॅनल’च्या आगामी वाटचालीसाठी आपला पाठिंबा व्यक्त करत विविध विकासात्मक उपक्रमांची माहिती माध्यमांसमोर मांडली.
अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी ‘समर्थ पॅनल’चा जाहीरनामा मांडताना मराठी चित्रपटसृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण उपक्रमांची घोषणा केली. “आम्ही सर्वजण कलाकारांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या विभागातील जबाबदाऱ्या आणि कामांचे नियोजन आधीच निश्चित केले आहे. निर्माता असल्याने निर्मात्यांच्या अडचणी आणि वेदना मला जवळून माहीत आहेत,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी ग्रामीण भागात लहान स्वरूपाची आधुनिक सिनेमागृहे उभारणे, प्रत्येक जिल्ह्यात नियमित सिनेमहोत्सव आयोजित करणे, तसेच कलाकार आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित घटकांसाठी पर्यायी रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण करणे, या महत्त्वाच्या योजनांवर भर दिला. मराठी चित्रपटसृष्टी अधिक सक्षम, स्वावलंबी आणि व्यापक करण्यासाठी ‘समर्थ पॅनल’ कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“न्यायालयीन निर्णयापूर्वी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे सुमारे साडेसतरा हजार मतदार मतदानापासून वंचित राहणार आहेत. भविष्यात मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सिनेमागृहे उभारण्यासोबतच विक्रम गोखले यांनी महामंडळाला दिलेल्या जमिनीवर वृद्धाश्रम उभारण्याचे काम आमचे संचालक मंडळ हाती घेईल,” असे सुशांत शेलार यांनी सांगितले.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पनवेल विभागातील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सभासदांना समर्थ पॅनलच्या वतीने मतदानाचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी समर्थ पॅनलची निवडणूक निशाणी ‘पतंग’ असून सभासदांनी पतंग निशाणीसमोरील बटण दाबून पॅनलला विजयी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महामंडळाच्या निवडणुकीचे मतदान शनिवार, ७ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘आऊट ऑफ सिल्याबस’ चित्रपटाच्या टीमकडून वृक्षारोपण
समर्थ पॅनलच्या वतीने मराठी चित्रपट निर्मात्यांना शासनाच्या अनुदान योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी महामंडळामार्फत अनुदान फाईल तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मराठी चित्रपटांच्या जागतिक विक्रीसाठी विविध देशांतील फिल्म मार्केटमध्ये प्रभावी यंत्रणा उभारण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांसाठी राखीव स्क्रीन आणि प्राईम टाईम शो मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, राज्यभर सक्षम चित्रपट वितरण व्यवस्था उभारण्याचाही संकल्प करण्यात आला. याशिवाय शासन-खाजगी भागीदारीतून राज्यभर ५०० मिनी थिएटर्स उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव मांडण्यात आला.