दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे उद्घाटन
Dadasaheb Phalke Chitrapat Rasaswad Mandal : मराठी मनोरंजन क्षेत्रात निर्माण झालेल्या दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी

Dadasaheb Phalke Chitrapat Rasaswad Mandal : मराठी मनोरंजन क्षेत्रात निर्माण झालेल्या दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या (Dadasaheb Phalke Chitrapat Rasaswad Mandal) व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, पु. ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे, जेष्ठ लेखक दीपक करंजीकर, विष्णुपंत दामले यांच्या पणती तन्वी दामले आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्तम निर्मिती मूल्य आणि दिग्दर्शन असलेले अनेक चित्रपट आपण आई-वडिलांसोबत पाहिलेले आहेत. या चित्रपटांनी संस्कार आणि राष्ट्र निर्मितीची भावना जागृत केली आहे. मराठी माणसांसाठी असे ऐतिहासिक मूल्य असलेले चित्रपट पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ॲड. शेलार (Ashish Shelar) यांनी केले.
प्रगतीत गती असते, परंतु प्रगतीच्या वेगात सांस्कृतिक, संवेदनशील आणि सकारात्मक समाजाच्या निर्मितीकडे दुर्लक्ष होता कामा नये, हे लक्षात घेऊनच कला, साहित्य, संस्कृती नाटक, चित्रपट आदि क्षेत्रात शासन भरीव काम
करत असल्याचे शेलार यांनी नमूद केले.महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी प्रास्तविक केले. पु. ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी स्वागत केले.
दरम्यान प्रभात निर्मित संत तुकाराम या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. त्याला रसिकानी उत्तम प्रतिसाद दिला. त्याच बरोबर दीपक करंजीकर यांचे व्याख्यानही संपन्न झाले. तसेच पु.ल.देशपांडे कला अकादमी तर्फे नवा भारत: सांस्कृतिक महासत्ता या विषयातर्गत प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याचेही उद्घाटन मंत्री शेलार यांनी केले.
रसास्वाद मंडळाचे सदस्य होण्याचे आवाहन
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे सदस्य होण्यासाठी सदस्यत्व शुल्क म्हणून त्रैवार्षिक पाचशे रुपये आकारण्यात येणार आहे. या अत्यल्प शुल्का मध्ये महाराष्ट्रातील सर्व रसिकांना चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे.
हे सदस्यत्व तीन वर्षासाठी असणार आहे. यामध्ये सदस्यांना किमान महिन्याला एक चित्रपट मंडळामार्फत विनामूल्य दाखवण्यात येईल. महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. त्याच बरोबर पहिल्या ७५ भाग्यवान सदस्यांना वन टाईम एन.डी. टुडिओची विनामूल्य टूर आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या भ्रमंती शुल्कामध्ये वन टाइम ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९७०२२७०८२१ यावर संपर्क साधता येईल.
मोठी बातमी, ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन