Lata Mangeshkar Death Anniversary : लतादीदींची गायकी ऐकून पंडित नेहरुंनाही फुटला होता अश्रूंचा बांध
भारतरत्न आणि आपल्या स्वर्गीय आवाजाच्या जादूनं प्रत्येकाच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची आज पुण्यतिथी. (Lata Mangeshkar’s death anniversary) आपल्या सुरेल स्वरांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन होऊन आज एक वर्ष पूर्ण होतंय. मागील वर्षी ६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. संगीत क्षेत्राचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा लता मंगेशकर या नावाशिवाय तो पूर्ण करता येणार नाही. त्यांच्या मधुर आवाजाने त्यांना वेगळी ओळख दिली. लतादीदींनी अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. त्यांची गाणी ऐकत कित्येक पिढ्या मोठ्या झाल्या. लता दीदींच्या (Lata Didi) आवाजात एक वेगळाच गोडवा होता. पातळ आवाज असला तरी त्या आवाजात एक तीक्षपणा होता, रेशमी पोत होता, गाण्यातील प्रत्येक शब्दांत, उच्चारात कमालीचा गोडवा होता. त्यांचे गाणे प्रत्येकाच्या हृदयाला भिडले आहे. दरम्यान, लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत या गोष्टीला बरोबर एक वर्ष पुर्ण झालं. त्याच निमित्ताने त्यांच्याविषयी जाणून घेऊया.
लतादीदींचे मूळ नाव हृदया
लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदोरमध्ये झाला. त्यांचे पाळण्यातील नाव ‘हृदया’ असे ठेवण्यात आले होते, मात्र नंतर लतादीदींच्या वडिलांनी त्यांचे नाव बदलून लता असे ठेवले. लता हे नाव दीनानाथ मंगेशकर यांनी त्यांच्या ‘भवनबंधन’ या नाटकातील लतिका या व्यक्तीरेखेवरून प्रेरणा घेऊन ठेवले होते. इतकेच नाही तर हे नाव दीनानाथ यांच्या पहिल्या पत्नी नर्मदाबेन यांच्या नावावरुन ठेवण्यात आल्याचेही सांगितल्या जाते.
लतादीदींचं गाणं चित्रपटातून वगळलं
लतादीदींचे वडील दीनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshkar) हे कोकणी शास्त्रीय गायक आणि नाट्य अभिनेते होते. तसंच अनेक विद्यार्थ्यांना ते संगीत शिकवत असत. दीदींनी वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी गायकीला सुरूवात केली. लतादीदी नऊ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांसोबत मंचावरून गाणं म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी राग खंबामती गायला होता. मात्र, आपल्या मुलीने चित्रपटांमध्ये वगैरे गाणं म्हणावं, अशी दीनानाथांची इच्छा नव्हती. परंतु, १९४२ मध्ये एका मित्राच्या विनंतीवरून पंडीत दीनानाथ मंगेशकर यांनी त्यांना यासाठी परवानगी दिली आणि मार्च १९३२ मध्ये लता यांनी एका मराठी चित्रपटासाठी गाणं म्हटलं. ‘किती हसाल’ असं त्या चित्रपटाचं नाव होतं. आणि गाण्याचे बोल नाचू या गडे… असे होते. चित्रपटाचे संगीतकार सदाशिवराव नेवरेकर होते. पण काही कारणामुळे लतादीदींनी गायलेले हे पहिले गाणं चित्रपटात घेतले गेले नाही. पुढं महिन्याभराच्या आतच दीनानाथांचा मृत्यू झाला. घरात आई, ३ लहान बहिणी आणि सर्वात छोटा भाऊ अशा सर्वांची जबाबदारी त्यांच्यावर आली. वडिलांच्या निधनानंतर लतादीदींनी घराची जबाबदारी घेतली. त्यांनी गाण्याचे कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रवासाला सुरूवात झाली.
मास्टर विनायक यांनी दिला मदतीचा हात
संघर्षाच्या काळात लतादीदींना अभिनेत्री नंदा यांचे वडील आणि वडिलांचे मित्र असलेले दिग्दर्शक मास्टर विनायक यांची मदत मिळाली. त्यांनी लतादीदींना चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी दिली आणि उस्ताद अमान अली खान यांच्याकडे संगीत शिकता येईल अशीही तजवीज केली. त्यातून पुढे लता मंगेशकरांना मराठी चित्रपटांमध्ये गायचीही संधी मिळाली. मग त्यांच्या समोर इतर वाटा खुल्या झाल्या. त्यानंतर मास्टर विनायक यांनी लतादीदींना ‘पहली मंगळागौर’ नावाच्या चित्रपटात अभिनयाची पहिली संधी दिली. एका वर्षानंतर ‘गजाभाऊ’ (१९४३) या चित्रपटासाठी त्यांनी पहिले हिंदी गाणं गायले. हे गाणं पंडित इंद्र लिहले तर संगीत दत्ता डावजेकर यांनी दिले होते. मास्टर विनायक यांची कंपनी १९४५ साली मुंबईत आली आणि त्यामुळे लतादीदींना देखील मुंबईत यावे लागले. मुंबईतील सुरुवातीच्या काळात त्यांना खुप संघर्ष करावा लागला. काम मिळवण्यासाठी त्या अनेक स्टुडिओमध्ये जायच्या. प्रवासासाठी पैसे नसल्याने त्या पायी चालत जायच्या.
मुंबईत शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरूवात
मुंबईतील भेंडी बाजार येथे एक प्रसिद्ध गायक उस्ताद अमान अली खान होते. लतादीदींनी त्यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. मास्टर विनायक यांच्या मदतीने काही गाणी आणि अभिनयाची काम मिळत होती. त्या काळात चित्रपटसृष्टीत आणखी एक गुणी संगीतकार होते त्याचे नाव मास्टर गुलाम हैदर. लतादीदींच्या आवाजाने ते प्रचंड खूश झाले आणि त्यांना मुंबईत प्रमोट करण्याची जबाबदारी हैदर यांनी स्वत:वर घेतली. ते लता दीदींना प्रमोट करत राहिले. १९४८ साली गुलाम हैदर यांनी दीदींना मजबूर या चित्रपटातील गाणं दिले. गाण्याचे बोल होते- दिल मेरा तोड, हो मुझे कहीं का छोडा, तेरे प्यारने… चित्रपट हिट झाला, संगीत हिट, गाणं देखील हिट आणि तेव्हापासून लता मंगेशकर देखील हिट झाल्या…
दीदींची पहिली कमाई होती २५ रुपये
लतादीदींनी आपल्या वयाच्या १३ व्या वर्षी पहिले गीत गायले. त्यावेळी त्यांना २५ रुपये मिळाले होते. त्यांच्याकडे अनेक उत्तम कार होत्या. लतादीदींकडे सुमारे ३७० कोटी रुपयांची एकूण संपत्ती होती. त्यांना यातील अधिकांश कमाई रॉयल्टीद्वारे प्राप्त झाली होती. तसेच त्यांनी चांगली गुंतवणूकही केलेली होती.
लतादीदीचं गाण ऐकून नेहरुंना फुटला अश्रूंचा बांध
तरुणांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत सर्वांना लतादीदींच्या आवाजाची मोहिनी घातली आहे. लतादीदींची सर्वच गाणी अजरामर झाली आहेत. ऐ मेरे वतन के लोगो हे गाणं आजही लाखो रसिकांच्या हृदयाला स्पर्शून जाते. हे गाणं ऐकताना आपसूकच डोळ्यातून पाणी येते. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना सुद्धा अश्रू रोखता आले नाही. १९६२ ला चीनसोबत झालेल्या युद्धात भारत भारताचा पराभव झाला होता. या युद्धात हजारो भारतीय सैनिक शहीद झाले होते. तर, कितीतरी सैनिक बेपत्ता झाले होते. या युद्धानंतर भारतावर दुःखाचे सावट पसरले होते. सैनिकांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लतादीदींनी ऐ मेरे वतन के लोगों हे गाणं गायल होतं. रामचंद्र के ऑर्केस्ट्रावर सुरू असलेल्या या गाण्याने तिथे उपस्थित असलेल्या रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. हे गाणं ऐकतांना पंडित नेहरु यांनाही आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. गाणं सुरू असतानाच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता.