इंटरनॅशनल मेन्स डे निमित्त गौरव खन्नाचा पुरुषांना भावनिक सवाल, म्हणाला, ‘शेवटचं स्वतःचं स्वप्न कधी पूर्ण केलं?’
प्रत्येकाची काळजी घेणारे, कुटुंबाच्या आनंदासाठी सतत धडपडणारे पुरुष स्वतःच्या स्वप्नांसाठी वेळ कधी काढतात, यावर गौरवने प्रकाश टाकला आहे.
Gaurav Khanna’s emotional question to men : इंटरनॅशनल मेन्स डे अर्थात जागतिक पुरुष दिनानिमित्त अभिनेता गौरव खन्ना याने पुरुषांच्या मनातील भावनांना हात घालणारा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. ‘शेवटचं तुम्ही स्वतःची एखादी इच्छा कधी पूर्ण केली होती?’ असा सवाल त्याने पुरुषांना केला आहे. घरातील प्रत्येकाची काळजी घेणारे, कुटुंबाच्या आनंदासाठी सतत धडपडणारे पुरुष स्वतःच्या स्वप्नांसाठी वेळ कधी काढतात, यावर गौरवने प्रकाश टाकला आहे.
स्टार प्लसवरील आगामी मालिका ‘दिल की बेवफाइयाँ’च्या एका खास व्हिडीओमध्ये गौरव खन्ना आपल्या मानव या व्यक्तिरेखेतून पुरुषांच्या आयुष्यातील ही भावनिक बाजू मांडताना दिसत आहे. चाळिशी पार केलेल्या मानवला आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आवड, इच्छा आणि गरज माहिती आहे. आई-वडिलांची औषधं कधी आणायची, पत्नीच्या करिअरला कशी साथ द्यायची, मुलांच्या शिक्षणासाठी काय करायचं आणि कुटुंबासोबत सुट्टीला कुठे जायचं, या सगळ्याच गोष्टींचं नियोजन तो करतो. मात्र, स्वतःच्या इच्छांचा विचार करण्याची वेळ येते, तेव्हा त्याच्याकडे उत्तर नसतं.
पुण्यात रोज JCB धडाडणार! दबाव आणल्यास नाव अन् फोन नंबर जाहीर करणार, आयुक्तांचा थेट इशारा
मानव आपल्या आयुष्यातील विविध जबाबदाऱ्यांबद्दल सांगतो. मुलगा म्हणून आई-वडिलांची काळजी घेणं, पती म्हणून पत्नीच्या स्वप्नांना पाठिंबा देणं आणि वडील म्हणून मुलांच्या भवितव्याची चिंता करणं, अशा अनेक भूमिका तो एकाच वेळी पार पाडत असतो. कुटुंबातील प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करण्यात त्याला आनंद मिळतो. मात्र, या सगळ्यात स्वतःची स्वप्नं कुठेतरी मागे पडतात. ‘त्यांचं स्वप्न पूर्ण करणं हेच माझं स्वप्न बनतं,’ अशी भावना तो व्यक्त करतो. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडताना मानव स्वतःच्या बकेट लिस्टमधील इच्छा मात्र पुढे ढकलत राहतो. एकदा करू, नंतर करू, असा विचार करताना वर्षं निघून जातात. वयाच्या एका टप्प्यावर आल्यानंतर त्याला जाणवतं की, स्वतःची स्वप्नं आजही अपूर्णच आहेत.
एकता कपूर यांच्या आगामी कौटुंबिक मालिकेत ‘दिल की बेवफाइयाँ’मध्ये हाच भावनिक प्रश्न मानव आणि जानकी यांच्या नात्यातून मांडण्यात येणार आहे. या मालिकेत गौरव खन्ना आणि श्रद्धा आर्या पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. दोघेही 20 वर्षांचा संसार केलेल्या जोडप्याची भूमिका साकारत आहेत. जानकीला रोजच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो. दोघांनी मिळून उभं केलेलं कुटुंब आणि संसार हेच तिच्यासाठी समाधानाचं कारण आहे. मानवचंही आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. मात्र, त्याच्या मनात स्वतःच्या अपूर्ण इच्छांबद्दल एक खंत कायम आहे.
नरेंद्र मोदींचा बारामती दौरा तूर्तास रद्द! शरद पवार 12 डिसेंबरला करणार प्रेरणास्थळाचे उद्घाटन
लग्नाच्या 20 वर्षांनंतर मानवच्या मनातील ही अपूर्ण इच्छा त्यांच्या नात्यावर काय परिणाम करणार? कुटुंबासाठी जगताना स्वतःसाठी जगण्याची इच्छा त्याला पुन्हा जाणवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, ‘दिल की बेवफाइयाँ’ ही मालिका 24 नोव्हेंबरपासून रात्री 9 वाजता स्टार प्लस आणि जिओहॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.