Happy Birthday Gulzar: गुलजार नावाचे इंद्रधनुष्य…
Gulzar-कधी गाण्यातून. कधी कवितेतून. कधी पडद्यावरच्या एखाद्या शांत चेहऱ्यातून. आणि कधी दोन ओळींच्या मध्ये असलेल्या त्या छोट्याशा अवकाशातून… जिथे शब्द थांबतात...अन् गुलजार बोलू लागतात...
Happy Birthday Gulzar: प्रतिभावंत हा शब्द खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीला लागू पडतो… व्यक्ती म्हणजे गुलजार…. जगण्याच्या गाण्याच अध्याहृत काही वर्षांपूर्वी, सारेगामाच्या सीमा मुखर्जी यांच्यासोबत गुलजार साहेबांना आणि जगजीत सिंग याना भेटण्याचा योग आला… इतकं रंजक दृश्य होतं की, नुकताच वेटर घेऊन आलेला चहा किटलीतून जगजितसिंह कपात ओतत होते… ते स्वतः गुलजार साहेबांसाठी चहा बनवत होते… त्यामध्ये त्यांनी एक प्रश्न केला… दूध किती… त्यांनी सांगितले जगण्याला रंग येईल… इतकेच…. या सुरांवर वाफाळत्या चहासोबत गप्पा सुरू झाल्या…
त्यामुळे आमच्याच भावना स्वतःच्या शब्दात सांगून त्याला इतकं गोंडस लोभस तर कधी फुल जखमांना कुरवाळणारे कसे काय बनवता येतं, हे विचारल्यावर गुलजारांनी दिलेले उत्तर फार रंजक होत… मी तर फक्त लिहत असतो… माणसं भेटतात कधी भावना तर कधी शब्द… जगण्याचा तुकडा माझा जगण्याचा तुकडा कापून देऊन लिहत असतो… तुमच्या जिगसॉ पझलमध्ये तो परफेक्ट बसतो .. आणि तिथून खरा खेळ सुरू होतो… आपल्यातील अस्वस्थतेचा अपूर्णतेचा अंश शोधायचा… कधी कधी असणाऱ्या जखमेला कुरवाळण्यापेक्षा वाहू द्यायला पाहिजे… या वाक्यात गुलजार साहेबांच्या जगण्याचे सार आहे…काही व्यक्तींची ओळख त्यांच्या नावापुरती मर्यादित राहत नाही; त्यांच्या अस्तित्वानेच एक स्वतंत्र अर्थ निर्माण होतो. त्यांच्याविषयी लिहिताना व्यक्तिचित्र लिहावे, व्यक्तिचित्र उभे करावे की त्यांच्या कलाकृतींचा मागोवा घ्यावा, हा प्रश्न पडतो. गुलजार हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक.
18 ऑगस्ट 1934 रोजी अविभाजित भारतातील झेलम जिल्ह्यातील दीना येथे संपूर्णसिंह कालरा यांचा जन्म झाला. त्यांनी लिखाणसाठी टोपणनाव घेतलं गुलजार… आज, 18 ऑगस्ट 2026 रोजी ते वयाची 92 वर्षे पूर्ण करून 93व्या वर्षात प्रवेश करत आहेत… या प्रदीर्घ प्रवासाकडे मागे वळून पाहिले, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते… गुलजारांनी केवळ वेगवेगळ्या कलाक्षेत्रांत काम केले नाही; त्यांनी ज्या क्षेत्राला स्पर्श केला, त्या क्षेत्राची अभिव्यक्ती अधिक संवेदनशील आणि समृद्ध केली.
गाणे लिहिताना त्यांनी कवितेला पडद्यावर आणले. कविता लिहिताना रोजच्या जगण्यातले साधे क्षण साहित्याच्या उंचीवर नेले. पटकथा लिहिताना पात्रांच्या मनोविश्वाचा वेध घेतला आणि दिग्दर्शक म्हणून दृश्यंइतकेच भावनांना अधिक महत्त्व दिले. म्हणूनच गुलजारांना केवळ गीतकार, कवी, लेखक किंवा दिग्दर्शक म्हणणे म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एका रंगापुरते थांबणे… हे एक अनोखे इंद्रधनुष्य आहे…
दीना ते मुंबई : स्थलांतरामुळे हरवलेली वेदना
गुलजारांच्या सर्जनशीलतेचा मागोवा घ्यायचा असेल, तर त्यांच्या बालपणाकडे आणि फाळणीच्या अनुभवाकडे पाहावेच लागते. फाळणीपूर्वीचे पंजाब, दीना गाव, घर, माती, नाती आणि त्यानंतर अचानक बदललेला भूगोल… या सगळ्याने त्यांच्या संवेदनशील मनावर खोल ठसा उमटवला. फाळणीने लाखो लोकांना विस्थापित केले; गुलजारही त्यातील एक होते. घर मागे राहिले, परिचित माणसे दूर गेली आणि आयुष्याला नव्याने सुरुवात करावी लागली. कदाचित म्हणूनच त्यांच्या लेखनात ‘घर’ हा शब्द केवळ वास्तू म्हणून येत नाही.
घर म्हणजे आठवण. घर म्हणजे परत जाता न येणारी जागा. घर म्हणजे एखादा आवाज, एखादा वास किंवा एखादी व्यक्ती. त्यांच्या लेखनातील विरहही केवळ प्रेमभंगाचा नसतो. त्यात हरवलेल्या काळाची, निसटलेल्या माणसांची आणि मागे पडलेल्या जगाची सावली असते.
गॅरेजमधील रंग अन् शब्दांच्या छटा…
मुंबईत आल्यानंतर गुलजारांची सुरुवात साहित्यिक म्हणून झाली नाही. मोटारी रंगवणाऱ्या गॅरेजमध्ये त्यांनी काम केले. अपघातग्रस्त गाड्यांवर पुन्हा रंग चढवताना वेगवेगळ्या रंगांच्या छटा अचूक जुळवण्याचे काम ते करत. आज त्यांच्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना हा प्रसंग जवळजवळ एका सुंदर रूपकासारखा वाटतो. कारण पुढे हाच माणूस शब्दांच्या छटांच्या सावलीत आयुष्यभर जगला…
‘दुःख’ आणि ‘उदास’ यांच्यातला सूक्ष्म फरक जाणवून देणार होता. ‘प्रेम’ आणि ‘मालकी’ यांच्यातले अंतर दाखवणार होता. ‘विरह’ आणि ‘एकटेपणा’ यांना स्वतंत्र चेहरे देणार होता. त्या काळात मात्र गुलजारांना चित्रपटसृष्टीत करिअर करण्याची इच्छा नव्हती. त्यांना साहित्यिक व्हायचे होते. साहित्याच्या बैठका, वाचन, लेखन आणि चर्चांमध्ये ते रमायचे. प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनच्या वातावरणातून त्यांची अनेक साहित्यिकांशी ओळख झाली. याच काळात त्यांची भेट शैलेंद्र यांच्याशी झाली. आणि मग त्यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग आला, ज्याने त्यांच्या पुढच्या संपूर्ण प्रवासाची दिशा बदलली.
शैलेंद्रांचा आग्रह, बिमल रॉयंचा विश्वास
‘बंदिनी’साठी गीत लिहिण्याची संधी आली तेव्हा गुलजार स्वतः तयार नव्हते. शैलेंद्रांनी मात्र त्यांचा संकोच दूर केला. गुलजार गॅरेजमध्ये काम करत असताना शैलेंद्र तिथे गेले आणि त्यांना गाणे लिहिण्याचा आग्रह केला. सुरुवातीला गुलजारांनी नकार दिला; पण अखेर शैलेंद्रांचा आग्रह त्यांनी मानला. यानंतर झाली बिमल रॉय यांच्याशी भेट. ही भेट गुलजारांच्या आयुष्यातील निर्णायक वळण ठरली. ‘मोरा गोरा अंग लई ले’ या गाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीला एक नवा गीतकार मिळाला. पण त्या गाण्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिमल रॉय यांनी गुलजारांच्या आत दडलेला लेखक ओळखला. एका टप्प्यावर गुलजार पुन्हा गॅरेजमध्ये परतण्याचा विचार करत होते. त्या वेळी बिमल रॉय यांनी त्यांना तो मार्ग सोडण्यास सांगितले. नंतर गुलजारांनी हा प्रसंग आठवताना बिमलदांच्या त्या विश्वासाला आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण मानले. बिमल रॉय त्यांच्यासाठी केवळ दिग्दर्शक नव्हते; ते गुरु होते. त्यांच्या सहवासातून गुलजारांनी केवळ चित्रपट बनवण्याची पद्धत शिकली नाही, तर माणूस आणि त्याच्या भावविश्वाकडे कॅमेऱ्याच्या नजरेतून कसे पाहायचे, हे शिकले.
गाण्याला पारंपरिक चौकटीबाहेर नेणारा गीतकार
गुलजारांच्या गीतलेखनातील खरी क्रांती त्यांच्या शब्दांच्या निवडीत आहे. त्यांनी गाण्याला केवळ यमक, ठेका आणि पारंपरिक काव्यरचनेच्या चौकटीत बंदिस्त ठेवले नाही. त्यांच्या दृष्टीने गाणे म्हणजे पात्राच्या मनातला विचार होता. कधी तो संवाद बनतो.
कधी एखादे पत्र. कधी आठवण. तर कधी स्वतःशी केलेले संभाषण. ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं’मध्ये दोन माणसांच्या नात्यातील न बोललेले अंतर जाणवते. ‘तुझसे नाराज़ नहीं जिंदगी’मध्ये जीवनाशी केलेला हळवा संवाद ऐकू येतो. ‘नाम गुम जाएगा’मध्ये माणूस निघून गेल्यानंतर त्याची स्मृती उरावी, ही आतली इच्छा आहे. आणि ‘मेरा कुछ सामान’मध्ये तर गुलजारांनी गाणे आणि कविता यांच्यातील सीमारेषाच धूसर करून टाकली.
पंचम आणि गुलजार : शब्द आणि सुरांची विलक्षण मैत्री
आर. डी. बर्मन आणि गुलजार यांची मैत्री ही केवळ एका यशस्वी गीतकार-संगीतकार जोडीची कहाणी नव्हती. ती दोन स्वतंत्र, प्रयोगशील आणि विलक्षण सर्जनशील व्यक्तिमत्त्वांच्या संवादाची कहाणी होती. दोघांची माध्यमे वेगळी होती. पंचमला संगीत ऐकू येत होते; गुलजारांना शब्दांच्या मागची शांतता ऐकू येत होती. गुलजार अनेकदा पंचमसमोर असे शब्द घेऊन जायचे, ज्यांना पारंपरिक अर्थाने ‘गाण्याचे बोल’ म्हणणेही कठीण होते. ‘मेरा कुछ सामान’चे बोल ऐकल्यावर पंचमला ते गाणे वाटलेच नाही. हा तर एखादा प्रसंग आहे, असे त्याला वाटले. वर्तमानपत्राची हेडलाइन घेऊन येशील आणि तिलाही चाल लावायला सांगशील का, अशा अर्थाची त्याची मिश्कील प्रतिक्रिया होती. मात्र आशा भोसले यांनी ते बोल गुणगुणायला सुरुवात केली आणि पंचमला त्या शब्दांमध्ये लय दिसली. ही घटना गुलजारांच्या सर्जनशीलतेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य सांगते—त्यांना चौकट मोडायची नव्हती; त्यांना चौकट अधिक व्यापक करायची होती. पंचम त्यांना चिडवायचा. गुलजार त्याच्यासमोर अवघड शब्द घेऊन जायचे. ‘नशेमन’सारख्या शब्दांचा अर्थ शोधताना पंचमचा झालेला गोंधळ किंवा ‘चाबियां’सारख्या शब्दांभोवती झालेली गंमत—या छोट्या आठवणी त्यांच्या मैत्रीतील सहजता आणि उब दाखवतात. पंचमच्या निधनानंतर गुलजारांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी त्यामुळे केवळ एका संगीतकाराच्या जाण्याची नव्हती. तो एका सर्जनशील संवादाचा अंत होता.
गीतकारापासून दिग्दर्शकापर्यंत : कॅमेऱ्यामागचा कवी
गुलजार जेव्हा दिग्दर्शक झाले, तेव्हा त्यांनी गीतकाराची संवेदनशील भाषा कॅमेऱ्याला दिली. ‘मेरे अपने’पासून सुरू झालेला त्यांचा दिग्दर्शकीय प्रवास ‘कोशिश’, ‘अचानक’, ‘खुशबू’, ‘मौसम’, ‘आंधी’, ‘अंगूर’, ‘किनारा’, ‘किताब’, ‘मीरा’, ‘इजाजत’, ‘लेकिन’, ‘माचिस’ आणि ‘हू तू तू’ अशा विविध धाटणीच्या चित्रपटांतून पुढे गेला. या चित्रपटांमध्ये घटना आहेत; पण घटना कधीच अंतिम केंद्रबिंदू ठरत नाहीत.माणूस हा त्यांच्या सिनेमाचा केंद्रबिंदू असतो. ‘कोशिश’मध्ये श्रवण आणि वाणीची मर्यादा असलेले दांपत्य आहे; पण प्रत्यक्षात तो संवादाच्या पलीकडच्या प्रेमाचा चित्रपट आहे. या भूमिकांसाठी कलाकारांनी सांकेतिक भाषा शिकण्यासाठी विशेष प्रशिक्षणही घेतले. ‘आंधी’मध्ये राजकीय संदर्भ असले तरी त्याच्या केंद्रस्थानी दोन व्यक्तींमधील नात्याची गुंतागुंत आहे. ‘मौसम’मध्ये काळाच्या ओघात बदलणाऱ्या नात्याची वेदना आहे. ‘अंगूर’मध्ये विनोद आहे; पण त्या विनोदामागे मानवी स्वभावातील विसंगती दडलेली आहे. आणि ‘इजाजत’मध्ये तर भूतकाळ वर्तमानाच्या आयुष्यात पुन्हा येऊन उभा राहतो. गुलजारांच्या पात्रांना नेहमीच पारंपरिक अर्थाने ‘हॅपी एंडिंग’ मिळत नाही. मात्र त्यांना एक गोष्ट नक्की मिळते— स्वतःच्या भावनांकडे प्रामाणिकपणे पाहण्याची संधी. गुलजारांनी स्वतः ‘इजाजत’ आणि ‘माचिस’ या आपल्या दिग्दर्शकीय कामांपैकी विशेष जवळच्या कलाकृती मानल्या होत्या.
….तिथे गुलजारांचा सिनेमा सुरू होतो
गुलजारांच्या दिग्दर्शनाची खरी ताकद कदाचित त्यांच्या संवादांपेक्षा संवाद नसलेल्या क्षणांत आहे. दोन व्यक्ती एकमेकांसमोर बसतात.
काही बोलत नाहीत. पण प्रेक्षकाला जाणवते….या शांततेच्या मागे अनेक वर्षांचा इतिहास आहे. ही संवेदना त्यांच्या कवितेतून आली असेल, त्यांच्या आयुष्याच्या अनुभवातून आली असेल किंवा दोन्हींच्या मिलाफातून. गुलजारांच्या पात्रांना आपले दुःख व का करावे लागत नाही सांगावे लागत नाही. ते ते जगतात. म्हणूनच त्यांच्या सिनेमातील विरह कधी गोंगाट करत नाही. तो हळूहळू मनात उतरतो.
गालिबपासून ‘माचिस’पर्यंत : विषय बदलले, माणूस तसाच राहिला
गुलजारांच्या सर्जनशीलतेची व्याप्ती पाहिली, तर त्यांच्या विषयांची विविधता थक्क करणारी आहे. दूरदर्शनवरील ‘मिर्झा गालिब’ हे त्याचे उत्तम उदाहरण. 1988 मध्ये प्रसारित झालेल्या या मालिकेत त्यांनी गालिबला केवळ शेरोशायरी करणारा ऐतिहासिक कवी म्हणून न दाखवता, आपल्या काळात जगणारा एक माणूस म्हणून उभे केले. नसीरुद्दीन शाह यांनी गालिबची भूमिका साकारली आणि जगजीत-चित्रा सिंह यांच्या संगीताने मालिकेला वेगळी सांस्कृतिक ओळख दिली. दुसरीकडे ‘माचिस’मध्ये पंजाबमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तरुण पिढीच्या मनात वाढणारा राग, असुरक्षितता आणि हिंसेकडे होणारी वाटचाल त्यांनी मांडली. एकीकडे गालिब. दुसरीकडे पंजाबचा हिंसाचार. विषय पूर्णपणे भिन्न. पण दोन्हीकडे गुलजारांची दृष्टी तीच—इतिहासापेक्षा माणसाचा शोध.
मीना कुमारी : प्रसिद्धीच्या पलीकडचे एक नाते
गुलजारांच्या आयुष्यातील काही नाती त्यांच्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्यासाठी महत्त्वाची ठरतात. त्यापैकी एक म्हणजे मीना कुमारी यांच्याशी असलेली त्यांची मैत्री. ‘बेनझीर’च्या काळात झालेली त्यांची ओळख पुढे अधिक जवळच्या नात्यात रूपांतरित झाली. मीना कुमारी यांच्या शेवटच्या काळातील गुलजारांच्या आठवणी अत्यंत हळव्या आहेत. त्यांच्या प्रकृतीच्या काळात गुलजारांनी त्यांच्यासाठी रोजे ठेवले होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली आहे. मीना कुमारी यांनी त्यांच्या काही मौल्यवान वस्तू गुलजारांकडे सोपवल्या होत्या. हा केवळ भावनिक किस्सा नाही. तो गुलजारांच्या स्वभावातील एका महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकतो—ते माणसांशी त्यांच्या प्रसिद्धीच्या पलीकडे जाऊन जोडले जातात.
कवी म्हणून गुलजार : शब्दांमागचा दुसरा अर्थ
गुलजारांना वाचताना सुरुवातीला त्यांची भाषा परिचित वाटते. मग अचानक एखादा शब्द येतो. आणि आपण पकडून ठेवलेला संपूर्ण अर्थ बदलतो. हीच त्यांच्या ‘त्रिवेणी’ची ताकद. दोन ओळी एका दिशेने घेऊन जातात आणि तिसरी ओळ अचानक त्या अनुभवाला वेगळा अर्थ देते. गुलजारांच्या लेखनात वस्तूंनाही स्मृती मिळते. पाऊस केवळ पाऊस राहत नाही. खिडकी केवळ खिडकी राहत नाही.
रेल्वे केवळ प्रवासाचे साधन राहत नाही. चावी केवळ चावी राहत नाही. सामान केवळ सामान राहत नाही. प्रत्येक वस्तूच्या मागे एखादे नाते, एखादा काळ, एखादी व्यक्ती, एखादे गुपित किंवा एखादी आठवण उभी राहते. म्हणूनच त्यांची कविता वाचताना अनेकदा मनात एकच भावना निर्माण होते— हा माणूस माझ्याच आयुष्याबद्दल लिहितो आहे.
भाषेचा गुलजार : हिंदी, उर्दू, पंजाबी आणि त्याही पलीकडे
गुलजारांच्या भाषेला एका भाषेच्या चौकटीत अडकवणे कठीण आहे. उर्दूची नजाकत, हिंदीची सहजता आणि पंजाबी मातीची उब त्यांच्या लेखनात मिसळलेली जाणवते. मात्र त्यांची खरी ताकद केवळ शब्दसंपदेत नाही. ती आहे शब्दांची निवड आणि त्यांना योग्य क्षणी, योग्य जागी ठेवण्याच्या विलक्षण क्षमतेत. गुलजारांचा एक शब्द अनेकदा संपूर्ण प्रसंगाचे भावनिक वजन उचलतो.म्हणूनच त्यांची गाणी केवळ ऐकली जात नाहीत; ती वाचलीही जातात. आणि त्यांच्या कविता केवळ वाचल्या जात नाहीत; त्या मनात ऐकू येतात.
सर्जनशीलतेबद्दल गुलजारांची भूमिका
गुलजारांनी अनेकदा स्पष्ट केले आहे की चित्रपटासाठी लिहिलेले गाणे हे त्या चित्रपटाची कथा, व्यक्तिरेखा आणि परिस्थिती यांच्यातून जन्माला आले पाहिजे. कथेबाहेरचे एखादे सुंदर गाणे म्हणून नव्हे, तर त्या पात्राच्या भावनेचा नैसर्गिक विस्तार म्हणून गाणे असावे, अशी त्यांची भूमिका होती. हीच दृष्टी त्यांच्या दिग्दर्शनातही जाणवते. त्यांच्यासाठी कला म्हणजे स्वतःचे प्रदर्शन नव्हते. ती कथा, पात्र आणि भावना यांना योग्य अभिव्यक्ती देण्याची प्रक्रिया होती. म्हणूनच त्यांचे काम ‘गुलजारसदृश’ वाटते; पण त्याची नक्कल करणे कठीण आहे. कारण गुलजारांची शैली ही एखादी बाह्य लकब नाही. ती माणसांकडे पाहण्याची एक विशिष्ट पद्धत आहे.
पुरस्कारांपलीकडचे यश
साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, ऑस्कर, ग्रॅमी आणि 2024 मध्ये मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार—गुलजारांच्या कर्तृत्वाला मिळालेली मान्यता मोठी आहे. ‘स्लमडॉग मिलियनेअर’मधील ‘जय हो’साठी मिळालेला ऑस्कर आणि त्यानंतरचा ग्रॅमी हा त्यांच्या जागतिक ओळखीचा महत्त्वाचा टप्पा ठरला. पण गुलजारांची खरी कमाई पुरस्कारांच्या यादीत नाही. ती लोकांच्या स्मरणात आहे. एका पिढीने त्यांचे गाणे ऐकून प्रेम समजून घेतले. दुसऱ्या पिढीने त्यांच्यात विरह शोधला. तिसऱ्या पिढीने त्यांच्या कविता सोशल मीडियावर शेअर केल्या. आणि आजची पिढीही त्यांच्या शब्दांमध्ये स्वतःच्या भावनांचे प्रतिबिंब शोधते.
कलाकाराच्या अमरत्वाची यापेक्षा मोठी खूण कोणती?
93व्या वर्षातही जिवंत असलेले कुतूहल…गुलजारांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांत सुंदर पैलू म्हणजे त्यांच्यातील कुतूहल. वय वाढले.
काळ बदलला. माध्यमे बदलली. संगीत बदलले. चित्रपटांची भाषा बदलली. पण गुलजारांची निरीक्षणशक्ती अधिक सघन झाले… त्यांनी एका संभाषणात माणूस एका आयुष्यात अनेक आयुष्ये जगतो, अशी भावना व्यक्त केली होती. वेगवेगळ्या वयोगटांतील माणसांशी संवाद साधताना त्याचे वेगवेगळे पैलू समोर येतात. कदाचित म्हणूनच त्यांच्या लेखनात अनेक पिढ्यांना स्वतःचा आवाज ऐकू येतो. गुलजारांचा वारसा त्यांच्या गाण्यांच्या संख्येत नाही. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांच्या यादीत नाही. मिळालेल्या पुरस्कारांमध्येही नाही. त्यांचा खरा वारसा म्हणजे त्यांनी भारतीय लोकप्रिय संस्कृतीला दिलेली संवेदनशील भाषा… त्यांनी शिकवले की प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठमोठ्या शब्दांची गरज नसते. विरह सांगण्यासाठी आक्रोशाची गरज नसते. राजकारण मांडण्यासाठी भाषणाची गरज नसते. नाते तुटताना आरडाओरड करण्याची गरज नसते. आणि दुःख सांगताना सतत दुःखी दिसण्याचीही आवश्यकता नसते. कधी एखादी खिडकी पुरेशी असते. कधी पावसाचा आवाज. कधी रेल्वेची शिट्टी. कधी टेबलावर पडलेले एखादे जुने पत्र. कधी एखादी चावी. आणि कधी… ‘मेरा कुछ सामान…’ गुलजार : एक अनुभव गुलजारांचा प्रवास दीना गावापासून सुरू झाला. फाळणीने त्यांना घरापासून दूर केले. मुंबईने संघर्ष दिला.
गॅरेजने रंग शिकवले.
शैलेंद्रांनी पहिली संधी दिली. बिमल रॉय यांनी प्रतिभेला दिशा दिली. पंचमने शब्दांना लय दिली. मीना कुमारीसारख्या संवेदनशील माणसांनी त्यांच्या भावविश्वाला स्पर्श केला. सिनेमाने त्यांना विस्तीर्ण कॅनव्हास दिला. आणि साहित्याने स्वतःचे स्वतंत्र आकाश. या सगळ्या प्रवासात मात्र एक गोष्ट कायम राहिली… माणसाला समजून घेण्याची त्यांची इच्छा. म्हणूनच गुलजारांचे शब्द कालबाह्य होत नाहीत.काळ बदलतो. तंत्रज्ञान बदलते. शहरांचे चेहरे बदलतात. नाती व्यक्त करण्याच्या पद्धती बदलतात. पण माणूस प्रेम करताना अजूनही तितकाच गोंधळलेला असतो. विरहात अजूनही तितकाच शांत असतो. आठवणी जपताना अजूनही एखादी जुनी वस्तू हाताशी ठेवतो. आणि कुणीतरी आयुष्यातून निघून गेल्यानंतर त्याचे ‘काही सामान’ मनात कुठेतरी पडूनच राहते. गुलजारांनी याच न दिसणाऱ्या सामानाला शब्द दिले. म्हणून ते केवळ गीतकार नाहीत. ते केवळ कवी नाहीत. ते केवळ लेखक किंवा दिग्दर्शकही नाहीत. गुलजार म्हणजे भारतीय संवेदनशीलतेचा एक स्वतंत्र शब्दकोश आहे… ज्यात प्रेमाला अनेक अर्थ आहेत. विरहाला अनेक छटा आहेत. आठवणींना अनेक चेहरे आहेत.आणि शांततेलाही स्वतःची एक भाषा आहे. कधी गाण्यातून. कधी कवितेतून. कधी पडद्यावरच्या एखाद्या शांत चेहऱ्यातून.
आणि कधी दोन ओळींच्या मध्ये असलेल्या त्या छोट्याशा अवकाशातून… जिथे शब्द थांबतात…अन् गुलजार बोलू लागतात…
– अमित भंडारी, चित्रपट समीक्षक