Kanika Kapoor : कनिका कपूरचे लग्न अवघ्या 4 वर्षांतच मोडले; ‘बेबी डॉल’ गायिका पतीपासून वेगळी

Kanika Kapoor : बॉलिवूड गायिका कनिका कपूरने लग्नाच्या चार वर्षांनंतर पती गौतम हाथीरमानीपासून वेगळे होत असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Kanika Kapoor

Kanika Kapoor : बॉलिवूड गायिका कनिका कपूरने लग्नाच्या चार वर्षांनंतर पती गौतम हाथीरमानीपासून वेगळे होत असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. ‘बेबी डॉल’ फेम गायिकेने या कठीण काळात सर्वांना तिच्या प्रायव्हसीचा आदर करण्याची विनंती देखील सोशल मीडियावर केली आहे. पती गौतम हाथीरमानीसोबत चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला असून यात तिसऱ्या व्यक्तीचा कोणताही हस्तक्षेप नसल्याची माहिती देखील कनिका कपूरने आपल्या पोस्टमध्ये दिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा देखील सोशल मीडियावर जोराने सुरु होत्या.

कनिका कपूरने आपल्या पोस्टमध्ये काय लिहिले?

कनिका कपूरने (Kanika Kapoor) इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे पती गौतम हाथीरमानीपासून (Gautam Hathiramani) वेगळे होत असल्याची बातमी दिली. तिने लिहिले, “प्रिय मित्र आणि कुटुंबीयांनो, खूप विचार केल्यानंतर, मी आणि माझ्या पतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकत्र घालवलेल्या वेळेबद्दल मी कृतज्ञ आहे आणि त्याच्या भविष्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा देते. आता आम्ही आमच्या आयुष्यात पुढे जात असताना, माझी विनंती आहे की तुम्ही आमच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करावा.” ही पोस्ट शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल झाली.

तर दुसरीकडे गेल्या काही काळापासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येत होत्या. काही चर्चांनुसार, तिचा पती नायजेरियातील लागोसमध्ये राहतो आणि कनिकाला तिथे राहायचे नव्हते, असा दावाही केला जात होता. मात्र, कनिकाने या सर्व चर्चा चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. तिने स्पष्ट केले की, तिच्या आयुष्यात किंवा तिच्या पतीच्या आयुष्यात दुसरी कोणतीही व्यक्ती नाही. हा निर्णय पूर्णपणे परस्पर संमतीने घेण्यात आला आहे.

लग्न कधी झाले होते?

कनिका कपूर आणि गौतम हाथीरमानी 20 मे 2022 रोजी लंडनमध्ये एका भव्य समारंभात विवाहबंधनात अडकले होते. या लग्नाला त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. गायिकेने लग्नाचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. कनिकाचे हे दुसरे लग्न होते. याआधी तिचे लग्न डॉ. जसप्रीत सिंग चंडोक यांच्याशी झाले होते, परंतु 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि ते वेगळे झाले होते. कनिकाला तिच्या पहिल्या लग्नापासून तीन मुले आहेत. आयाना, समारा आणि युवराज.

follow us