‘हम आपके हैं कौन’ च्या शूटिंगदरम्यान सूरज बडजात्या यांच्या या सवयीमुळे नव्या बुटांची व्हायची ‘मोजडी’
Madhuri Dixit : 'सोनी मराठी' वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना माधुरी दीक्षित आपल्या सहज सुंदर शैलीनं
Madhuri Dixit : ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना माधुरी दीक्षित आपल्या सहज सुंदर शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. नुकत्याच झालेल्या एका भागात, हॉट सीटवर ‘हम आपके हैं कौन’ चित्रपटातील तिच्या सह-कलाकार रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या तिघींनी जेव्हा चित्रपटाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, तेव्हा माधुरीने दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्याबद्दलची एक मजेशीर आठवण सांगितली. माधुरी म्हणाली, “मला सूरजजींबद्दल एक गोष्ट चांगलीच आठवते. जेव्हा जेव्हा नवीन शेड्युल सुरू व्हायचं, तेव्हा ते नवीन बूट घालून यायचे. आणि सीन समजावून सांगताना पायाच्या पुढच्या बोटांवर उभं रहात ते सीन समजवायचे ती त्यांची सवय होती. दहा दिवसांनंतर ते बूट सैल होऊन पुढच्या बाजूला वळू लागायचे. आम्ही सगळे मिळून त्याची मस्करी करायचो.”
याला दुजोरा देत रेणुका शहाणे म्हणाल्या, “आणि पंधरा दिवसांनंतर तर ते आणखीनच सैल होऊन पुढे वळलेले असायचे!” माधुरी पुढे म्हणाली, “हळूहळू त्या बुटांचा आकार बदलत जायचा आणि शूटिंग संपेपर्यंत त्याची अगदी मोजडी व्हायची!” शूटिंगच्या दरम्यान घडलेल्या या छोट्याशा मजेशीर किश्शानं मंचावर पुन्हा एकदा हशा पिकवला, ज्यानं प्रेक्षकांना ‘हम आपके हैं कौन’च्या टीममधील अतूट बंधांची आणि सुखद आठवणींची एक सुंदर झलक दाखवून दिली. पहात रहा, ‘कोण होणार करोडपती’, सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी आणि सोनी लिव वर.