महाराष्ट्र शाहीर Review : विलक्षण अनुभव देणारी शाहीर साबळेंची संगीतमय संघर्षगाथा
प्रेरणा जंगम, चित्रपट समीक्षक
Maharashtra Shaheer Movie Review : एखादी बायोपीक म्हणजेच व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट पाहणं म्हणजे तो काळ, त्या व्यक्तीचा प्रवास आणि ती व्यक्ती पात्राच्या रूपातून रुपेरी पडद्यावर अनुभवणं. महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट असाच एक विलक्षण अनुभव देतोय. गायक, नाटककार, लोकनाट्य निर्माते, दिग्दर्शक, कलाकार म्हणून विविधता अनुभवलेले असे प्रतिभाशाली कलाकार म्हणजे कृष्णराव गणपतराव साबळे. एक साधा माणूस मात्र असामान्य प्रतिभा असलेल्या या कलावंताची संघर्षगाथा महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात पाहायला मिळते.
अभिनेता अंकुश चौधरी या चित्रपटात शाहीर साबळेंची भूमिका साकारतोय तर शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे यांनी दिग्दर्शनातून शाहीरांनी जगलेला तो काळ रुपेरी पडद्यावर जिवंत केलाय. अजय – अतुल यांचं सुरेल संगीत या चित्रपटाला लाभलंय. चित्रपटाच्या कथेत शाहीर साबळेंचं बालपण ते स्वातंत्र्य चळवळ आणि मग महाराष्ट्र लोकधारापर्यंतचा त्यांचा प्रवास दर्शवण्यात आलाय. त्यांची गाण्यांची आवड, आपले विचार मांडण्याची तळमळ, समाजप्रबोधन, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्यातील चढ – उतार अशा विविध गोष्टी या कथेतून मांडल्यात. या कथेचा प्रवास संगीतमय असल्याने त्या काळातील शाहिरांची गाणी ऐकणं सुखद अनुभव आहे.
Salman Khan: भाईजानचा बॉडीगार्ड शेराने दिला चाहत्यांना धक्का, व्हिडीओ पाहून म्हणाले…
शाहीर साबळे यांची भूमिका साकारण्यासाठी कलाकारही त्यांच्यासारखा दिसणारा, देहबोली असणारा असावा असं जर वाटत असेल तर तसं अभिनेता अंकुश चौधरीच्या बाबतीत अजीबात नाहीय. अंकुश हा शाहीर साबळेंसारखा दिसत नसला तरी त्यांना पडद्यावर साकारताना तसा लूक, देहबोली, हावभाव, संवादकौशल्य, अभिनय या माध्यमातून तो शाहीर साबळेच्या भूमिकेत समरस झालाय. शाहीर साबळेंच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, गाण्यांची ओढ हे बारकावे अंकुश छान सादर करतो. त्याने शाहीर साबळेंची भूमिका अक्षरक्षह: पडद्यावर जिंवत केलीय.
Guardians Of The Galaxy साठी बॉलिवूडकडून प्रेरणा मिळाली, हॉलिवूडच्या दिग्दर्शकाची कबुली
शाहीर साबळेंची पत्नी भानुमीतच्या भूमिकेत केदार शिंदे यांची कन्या सना शिंदेने चांगला प्रयत्न केलाय. संवाद कौशल्यात ती कमी पडल्याचं दिसतय. यासह माईंच्या भूमिकेत अश्विनी महांगडे, साने गुरुजींच्या भूमिकेत अमित डोलावत, बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत दुष्यंत वाघ, यशवंतराव चव्हाण यांच्या भूमिकेत अतुल काळे, शाहीरांची आई शुभांगी सदावर्ते, शाहीरांच्या आजीच्या भूमिकेत निर्मिती सावंत, शेखर फडके यांच्यासह इतर कलाकारांचं उत्तम काम पाहायला मिळतय, त्या त्या भूमिकेत हे कलाकार चोख भूमिका बजावतात. शाहीरांच्या भूमिकेतील बालकलाकारांनीही छान काम केलय.
केदार शिंदे यांनी खऱ्या आयुष्यात बघितलेले, अनुभवलेले त्यांचे आजोबा शाहीर साबळे या चित्रपटाच्या सादरीकरणातून अनुभवायला मिळतात. प्रत्येक कलाकाराकडून त्यांनी उत्तम काम काढून घेतलय. या बायोपीकला संकीताची जोड देत चित्रपटरुपातील हा प्रवास रंजक आणि खिळवून ठेवणारा बनवलाय.
अजय – अतुल यांचं संगीत या चित्रपटातील संगीतमय प्रवास सुरेल आणि सुखद करतय. त्या काळातील विविध गाणी पाहणं आनंददायी अनुभव आहे. चित्रपटाची तांत्रिक बाजू अत्यंत मजबूत वाटते. छायांकन, संकलन, पार्श्वसंगीत या सगळ्याचं बाजू कथेला न्याय देणाऱ्या आहेत. मात्र या चित्रपटातील पूर्वार्धातील सुरुवातीचा काही भाग रेंगाळलेला वाटू शकतो. पूर्वार्धाता काही सीन लांबवले असल्याचं जाणवतं ज्याने ते कंटाळवाणे वाटू शकतात. उत्तरार्ध मात्र जलद गतीने पुढे जातो आणि कथा देखील रंजक वाटू लागते.
विलक्षण अनुभव देणारी शाहीर साबळेंची संगीतमय संघर्षगाथा आवर्जुन पाहावी अशी आहे. संस्कृती आणि त्याचा अभिमान याविषयी फक्त बोलत न राहता ती संस्कृती दर्शवणारे चित्रपट पाहुन पुढच्या पिढीला शाहीर साबळेंसारख्या कलावंतांचं योगदान आणि त्यांचे विचार पोहोचवयाचे असतील तर ‘महाराष्ट्र शाहीर’ सारखे चित्रपट पाहणं महत्त्वाचं ठरेल.
रेटिंग – 3.5 स्टार्स
प्रेरणा जंगम, चित्रपट समीक्षक