Circuitt Review : काळजाचे ठोके चुकवणारा उत्तरार्ध, डगमगणारा पूर्वार्ध…
रेटिंग – 2.5 स्टार्स
प्रेरणा जंगम, चित्रपट समीक्षक
Circuitt Movie Review : माणसाचा स्वभाव आणि सवयी कधीतरी त्यालाच कशी घातक ठरू शकतात हे पाहायला मिळतं सर्किट चित्रपटात. एक हटके प्रेम कहाणी असणारा हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. आकाश पेंढारकर दिग्दर्शित हा चित्रपट ‘कली’ या साऊथ चित्रपटाचा रिमेक आहे. ज्यात डूलकीर सलमान आणि साई पल्लवी हे कलाकार झळकले होते. अभिनेत्री ऋता दूर्गुळे आणि अभिनेता वैभव तत्ववादी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. तर प्रसिध्द दिग्दर्शक मधुर भांडारकर या चित्रपटाचे निर्माते असून त्यांचं हे मराठीतील पदार्पण आहे.
चित्रपटाची कथा आहे सिद्धार्थ मोहिते आणि आरोही प्रधानची. कॉलेजमध्ये दोघांची ओळख होते आणि मग मैत्री होते. या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं, तर दोघं लग्नही करतात. सिध्दार्थचा स्वभाव आरोहीला आवडतो मात्र त्याच्या आयुष्यातील एक रहस्य जेव्हा तिला कळतं तेव्हा काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरतं. सिद्धार्थचं छोट्या छोट्या गोष्टींवर चिडणे, रागावणे हे त्यांच्या नात्यात अडथळा आणते आणि यातूनच त्यांच्या आयुष्यातली कधी न विसरता येणारी ती रात्र येते. काय आहे त्या रात्रीचं रहस्य? सिध्दार्थ आणि आरोही सोबत त्या रात्री काय घडतं हे चित्रपटाला वेगळं वळण देणारं आहे.
अभिनेत्री ऋताने आरोहीच्या पत्रातील बारकावे उत्तम सादर केले आहेत. गायनाची आवड असणारी आरोही, तिचं सिध्दार्थला समजून घेणं यांच्यातील एक हळवी बाजू तिने सुंदर सादर केलीय. तर अभिनेता वैभवने रागीट स्वभावातील पैलू सहज सादर केलेत. या चित्रपटातील ऋता आणि वैभवची जोडी ही एकमेकांना कॉम्पलीमेंट देणारी आहे. दोघांची केमिस्ट्री छान जुळली आहे. अभिनेते मिलिंद शिंदे यांची भूमिका उत्तरार्धात रोमांच वाढवते. कोणतेही संवाद नसताना त्यांचं पात्र एक वेगळी छाप सोडते. तर रमेश परदेशीही नकारात्मक भूमिकेतून प्रभाव पाडतात.
या चित्रपटात काय खटकतं ? तर चित्रपट कुठेतरी अपूर्ण वाटतो.चित्रपटाचा मूळ विषय आणि प्रसंग समोर येण्यासाठी उत्तरार्धची वाट पाहावी लागते. पूर्वार्धात आरोही आणि सिध्दार्थच्या नात्यातील गोष्ट लांबवल्याचे जाणवते. उत्तरार्धातील थरार मात्र काळजाचे ठोके चुकवणारा आहे. असं असलं तरी कथेतील महत्त्वाच्या भागाचा प्रसंग मात्र फार कमी कालावधीत मोठा प्रभाव करतो. त्याचा कालावधी आणखी असता तर चित्रपटाचा हा थरार आणखी रंजक ठरला असता.
Apurva Nemlekar: अपूर्वाचा अनोखा अंदाज, ‘रावरंभा’ चित्रपटात ‘शाहीन आपा’च्या भूमिकेत
चित्रपटाचं पार्श्वसंगीत थ्रील कायम ठेवण्यात महत्त्वाची धुरा सांभाळतं. चित्रपटाची गाणीही चांगली झाली आहेत. छायांकनात कथेच्या दृष्टिकोनातून बराच वाव होता असं जाणवतं. संवादही आणखी खुलवता आले असते असं जाणवतं. चित्रपटाच्या पूर्वार्धात सादरीकरणात, संकलनातही काही त्रुटी जाणवतात. सीनमधील सलगता हरवलेली जाणवते. चित्रपटाचं लेखन कमकुवत असल्याने पाया भक्कम नसल्याने चित्रपट सुरुवातीपासून डगमगता वाटतो.मात्र कलाकारांचा कमाल परफॉर्मन्स, हटके ट्विस्ट आणि उत्तरार्धातील थरार चित्रपटाची जमेची बाजू आहे.