उद्यापासून अमेरिकेत तीन दिवस मराठी चित्रपटसृष्टीचा जागतिक जल्लोष !
NAFA Film Festival 2026:
NAFA Film Festival 2026 : मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल 2026 (NAFA Film Festival 2026) यंदा 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याचे नाफा संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनी जाहीर केले आहे.
पहिला दिवस : रेड कार्पेट, फॅशन शो आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा
शुक्रवार, 7 ऑगस्ट रोजी महोत्सवाची सुरुवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेटने होईल. सायंकाळी अतिथी नोंदणी, माध्यमांसाठी मीडिया लाऊंज, रेड कार्पेट आगमन, आकर्षक फॅशन शो आणि त्यानंतर रंगणारा Awards Night Gala हे पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे.
दुसरा दिवस : वर्ल्ड प्रीमिअर्स, सेलिब्रिटी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचा मेळावा
शनिवार, 8 ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये ‘ना आवडती गोष्ट’, ‘तू मी आणि अमायरा’ आणि ‘द्विधा’ या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas, Hyphen आणि NAFA निर्मित विशेष लघुपट यांचेही प्रीमिअर होणार आहेत.
या दिवशी प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री गिरीजा ओक, श्रुती मराठे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे विशेष मास्टरक्लासेस आयोजित करण्यात आले आहेत. उदयोन्मुख कलाकार, लेखक आणि चित्रपट अभ्यासकांना या सत्रांमधून थेट दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे.
याशिवाय अर्चना जोगळेकर, अजिंक्य देव, महेश कोठारे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि गार्गी कुलकर्णी यांच्यासोबत ‘Meet & Greet’ कार्यक्रम होणार असून रसिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळेल. कार्यशाळांमध्ये अतुल कुलकर्णी यांचे Micro Drama, अर्चना जोगळेकर यांचे विशेष सत्र, महेश कोठारे, नागराज मंजुळे आणि अजिंक्य देव यांचा Director’s Grid तसेच ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्यासोबत Coffee with Kaushik हा विशेष संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तिसरा दिवस : नवीन चित्रपट, विद्यार्थी लघुपट आणि समारोप सोहळा
रविवार, 9 ऑगस्ट रोजी महोत्सवाच्या अंतिम दिवशीही चित्रपटप्रेमींसाठी विशेष कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे. ‘Undocumented.PDF’ या लघुपटासह ‘पारो’ आणि ‘Frames’ या चित्रपटांचे प्रीमिअर्स होणार असून Andesha, Panha, Baburao in Love with Ella, H1B or Not Be, Keki आणि Those Left Behind या लघुपटांचे विशेष प्रदर्शन होणार आहे. यामध्ये विद्यार्थी दिग्दर्शकांच्या कलाकृतींनाही महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अंतिम दिवशीही महेश कोठारे, अतुल कुलकर्णी, नागराज मंजुळे, अजिंक्य देव, गिरीजा ओक आणि रोहिणी हट्टंगडी यांचे मास्टरक्लासेस आणि संवाद सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. तीन दिवसांच्या चित्रपट पर्वाचा समारोप भव्य Closing Ceremony ने होणार असून जागतिक स्तरावर मराठी चित्रपटसृष्टीचा गौरव करणाऱ्या या महोत्सवाची सांगता उत्साहात होईल.
मराठी चित्रपटसृष्टीच्या जागतिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा
चित्रपट प्रदर्शनाबरोबरच निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, विद्यार्थी, माध्यम प्रतिनिधी आणि जगभरातील मराठी रसिक यांना एकत्र आणणारा हा महोत्सव मराठी सिनेमाला जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण करून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. जागतिक प्रीमिअर्स, दर्जेदार चर्चासत्रे, अनुभवी कलाकारांचे मार्गदर्शन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांमुळे यंदाचा नाफा फिल्म फेस्टिव्हल हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी संस्मरणीय ठरेल, असा विश्वास संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनी व्यक्त केला आहे.