नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण’ आणि जिओहॉटस्टारची हातमिळवणी; डिजिटल माध्यमातून देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार महाकाव्य
Ramayana : एका ऐतिहासिक उपक्रमांतर्गत, जिओहॉटस्टार आणि प्राइम फोकस स्टुडिओज यांनी नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण: पार्ट वन’ या चित्रपटाला
Ramayana : एका ऐतिहासिक उपक्रमांतर्गत, जिओहॉटस्टार आणि प्राइम फोकस स्टुडिओज यांनी नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण: पार्ट वन’ या चित्रपटाला भारतातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भागीदारी केली आहे. चित्रपटाच्या विशेष थिएटर प्रदर्शनानंतर ही भागीदारी भारताच्या अजरामर महाकाव्याच्या भव्य सिनेमॅटिक सादरीकरणाला जिओ हॉटस्टारच्या तंत्रज्ञानाची आणि व्यापक पोहोचाची जोड देणार आहे. या माध्यमातून देशभरातील कोट्यवधी प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचवला जाणार आहे. जिओहॉटस्टारच्या प्लॅटफॉर्मवर प्रथमच पे-पर-व्ह्यू सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, या सुविधेद्वारे प्रेक्षकांना चित्रपट स्वतंत्रपणे खरेदी करून पाहता येणार आहे.
हा चित्रपट 5 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, त्यामध्ये IMAX 3D चा समावेश आहे. चित्रपटाच्या विशेष थिएटर प्रदर्शनाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर भारतातील प्रेक्षकांना जिओहॉटस्टारवर विशेष ऑन-डिमांड खरेदी पर्यायाद्वारे हा चित्रपट पाहता येईल. जिओहॉटस्टारच्या तांत्रिक क्षमता आणि व्यापक पोहोच यांचा लाभ घेत, या भागीदारीचा उद्देश देशभरातील प्रेक्षकांपर्यंत सर्व समर्थित उपकरणांवर सर्वोत्तम शक्य गुणवत्तेत हा चित्रपट पोहोचवणे हा आहे.
जिओस्टारच्या अध्यक्षा नीता एम. अंबानी म्हणाल्या, “रामायण हा भारताच्या महान सांस्कृतिक वारशाचा एक अविभाज्य भाग आहे. ही अशी कथा आहे, जिने शतकानुशतके आपल्या सामूहिक जाणिवांना आकार दिला आहे, आपल्या कल्पनाशक्तीला प्रेरणा दिली आहे आणि आपल्या जीवनाला दिशा दिली आहे. भारत कथाकथनाच्या एका नव्या युगात प्रवेश करत असताना, आपल्या सांस्कृतिक वारशाला पुढे नेण्याची एक असाधारण संधी आपल्यासमोर आहे. जिओहॉटस्टारमध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वोत्तम कथा प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवणे, हे आमचे ध्येय आहे. ‘रामायण’च्या या भव्य सिनेमॅटिक सादरीकरणाद्वारे देशभरातील कुटुंबांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. यासोबतच, नव्या पिढीला कर्तव्य, प्रेम, धैर्य आणि सद्गुण या महाकाव्याच्या केंद्रस्थानी असलेल्या शाश्वत मूल्यांची ओळख करून देता येईल.”
चित्रपटाचे निर्माते, चित्रपट निर्माते तसेच प्राइम फोकसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नमित मल्होत्रा म्हणाले, “माझ्या मते, ‘रामायण’चा अनुभव सर्वात मोठ्या पडद्यावर आणि IMAX 3D मध्येच घेतला पाहिजे. मात्र, आपल्या देशातील चित्रपटगृहांची पायाभूत सुविधा अद्याप या महाकाव्याशी भावनिक नातं जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही. ‘रामायण’ हे प्रत्येक भारतीयाचं आहे आणि आमची महत्त्वाकांक्षाही याच विचाराचं प्रतिबिंब असायला हवी. जिओहॉटस्टारने क्रीडा आणि मनोरंजनाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर करून संपूर्ण देशाला जोडण्याचं काम वारंवार केलं आहे. त्यामुळेच ते आमच्यासाठी एक स्वाभाविक भागीदार ठरले. चित्रपटाच्या थिएटर प्रदर्शनानंतर ‘रामायण’ लोकांच्या हातात आणि त्यांच्या घराघरांत पोहोचवण्यासाठी जिओहॉटस्टार आम्हाला मदत करेल.”
प्राइम फोकस स्टुडिओजच्या निर्मितीतील ‘रामायण’ हा चित्रपट आठ ऑस्कर पुरस्कार पटकावलेल्या प्रॉडक्शन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स स्टुडिओ DNEG तसेच यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेली ही दोन भागांची लाइव्ह-अॅक्शन सिनेमॅटिक प्रस्तुती असून, वाल्मीकी रामायणावर आधारित या चित्रपटाची पटकथा श्रीधर राघवन यांनी लिहिली आहे.
चित्रपटाच्या संगीताची धुरा ऑस्कर विजेते संगीतकार हान्स झिमर आणि ए. आर. रहमान यांनी सांभाळली आहे. तर रवी बन्सल आणि रॅमसे एव्हरी यांनी चित्रपटाचे प्रॉडक्शन डिझाइन केले आहे. टेरी नॉटरी आणि गाय नॉरिस यांनी अॅक्शन कोरिओग्राफीची जबाबदारी सांभाळली आहे. IMAX आणि इतर प्रीमियम सिनेमॅटिक फॉरमॅट्सचा विचार करून तयार करण्यात आलेला हा चित्रपट भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज प्रतिभांना एकत्र आणतो. ‘रामायण’चे विश्व अभूतपूर्व भव्यता आणि व्यापकतेसह पडद्यावर साकारण्याचा या चित्रपटाचा प्रयत्न आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान राम, साई पल्लवी सीता, यश रावण, सनी देओल हनुमान आणि रवी दुबे लक्ष्मण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अरुण गोविल, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंग, विवेक ओबेरॉय, कुणाल कपूर आणि काजल अग्रवाल यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
‘रामायण: पार्ट वन’ हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत, 5 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.