‘पारू’च्या जोडीची आता पाकिस्तानात ‘स्पायगिरी’! भरत दाभोळकरांच्या अनोख्या नाटकात विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक

इंग्लिश, हिंदी, गुजराती रंगभूमी गाजवणारे, 'हिंग्लिश' नाटकांचे जनक आणि प्रसिद्ध 'अॅड गुरु' भरत दाभोळकर आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design (11)

‘Paru’ duo now ‘spying’ in Pakistan : अनेक दशके इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमी गाजवणारे, ‘हिंग्लिश’ नाटकांचे जनक आणि प्रसिद्ध ‘अॅड गुरु’ भरत दाभोळकर आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिहेरी भूमिकेतून ते ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ या नाटकाद्वारे प्रथमच मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवत आहेत. अभिनेते आकाश भडसावळे यांच्या ‘सवाईगंधर्व’ आणि ‘अभिजात’ या दोन संस्थांची ही निर्मिती आहे.

विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक यांची ‘केमिस्ट्री’

‘झी मराठी’वरील ‘पारू’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक ही जोडी या नाटकाचे मुख्य आकर्षण आहे. अभिनेते विजय पटवर्धन म्हणतात, “कॅरी ऑन SPYगिरी हे माझं 58 वं व्यावसायिक नाटक. या नाटकातून मी नि मुग्धा कर्णिक पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहोत. मुळात मुग्धा आणि माझी गट्टी ‘घोळात घोळ’ या नाटकापासून जमली. आम्हाला एकमेकांच्या कामाच्या पद्धतीची आणि ‘टायमिंग’ची अचूक कल्पना असल्याने, ‘कॅरी ऑन SPYगिरी’ मध्येही प्रेक्षकांना आमची तीच सहज केमिस्ट्री पाहायला मिळेल.

मालिका आणि नाटकात जमीन-अस्मानचा फरक असतो; नाटकाचा प्रेक्षक पूर्णपणे तुमच्या समोर असतो, त्याला दोन तास खिळवून ठेवणं हे नटाचं खरं कसब असतं. आजच्या टेन्शनने भरलेल्या आयुष्यात विनोदी नाटक हा सर्वोत्तम विरंगुळा आहे. ‘कॅरी ऑन SPYगिरी’ नाटकात भरत सरांसोबत काम करण्याचा अनुभव भन्नाट असून त्यांच्या ‘ब्लॅक ह्युमर’ची शैली प्रेक्षकांचा नक्कीच हशा वसूल करेल.

अभिनेत्री मुग्धा कर्णिक सांगते, “मराठी रंगभूमीला सध्या सुगीचे दिवस असून हे नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवायला तयार आहे. विजय आणि मी ‘पारू’ मालिकेमुळे गेल्या दोन वर्षांपासून एकत्र आहोत, ज्याचा फायदा नाटकाच्या तालमीतही होतोय. मात्र, मालिकेतली आमची पात्रं आणि या नाटकातली पात्रं एकमेकांच्या पूर्णपणे टोकाची आहेत. या नाटकाला दाभोळकरी ‘पॅटर्न’ मिळाल्यामुळे हे नाटक अजून खुलून निघालं आहे. भरत सरांची काम करण्याची पद्धत अत्यंत अभ्यासू असून त्यांच्या लिखाणातील ‘राजकीय भाष्य’ नाटकाला एक वेगळीच उंची देतं. नाटकाच्या तालमींदरम्यान त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळत आहे.”

या नाटकात मोहन आझाद, विजय पटवर्धन, मुग्धा कर्णिक, राहुल पेठे, आकाश भडसावळे, सुयश पुरोहित, गीतांजली गणगे, गौरव निमकर आणि स्वतः भरत दाभोळकर अशा तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. 10 एप्रिल 2026 रोजी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई येथे; तर 18 एप्रिल 2026 रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत. अस्सल ‘दाभोळकरी’ शैलीतील हे स्पाय-कॉमेडी नाटक मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहे.

follow us